सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
Showing posts with label वंशवाद. Show all posts
Showing posts with label वंशवाद. Show all posts

Wednesday, July 4, 2012

मूळनिवासीवाद भारतीय घटनेच्या विरोधात

-महावीर सांगलीकर

भारतातील कांही संघटना ब्राम्हणांना विदेशी ठरवत ब्राम्हण सोडून इतर लोक भारतातील मूळनिवासी लोक आहेत असा जोरदार प्रचार करत आहेत. त्याही पुढे जात या विदेशी ब्राम्हणांना भारतातून हाकलून काढण्याची भाषा करत आहेत.

ब्राम्हण भारतात उपरे आहेत आणि आपण इथले स्थानिक लोक आहोत असे म्हणणारे लोक मानवाची उत्क्रांती आणि त्याचे स्थलांतर याविषयी कांहीही जाणत नाहीत. तसेच भारतामध्ये प्राचीन काळापासून अनेक प्रकारचे लोक येत राहिले आणि त्यात या तथाकथित मूळनिवासीयांचे पूर्वज देखील होते हे त्यांना माहीत नाही.

मानवाचा जन्म आफ्रिकेतला
मुळात मानव या प्राण्याचा जन्म आफ्रिकेत झाला हे मानववंशशास्त्रज्ञांनी सिद्ध करून दाखवले आहे. मानववंशशास्त्रज्ञांच्या या दाव्याला कांही लोकांचा विरोध असला तरी तो विरोध भावनिक पातळीवरचा आहे, त्यामुळे त्या विरोधाला कांही अर्थ नाही. मानवाची उत्पत्ती आफ्रिकेतील आजच्या इथिओपिया देशात झाली व तेथून तो उत्तर आफ्रिकेत, तेथून आजच्या अरबस्थान या भागात गेला. पुढे त्यांच्यातील कांही समूह पश्चिमेकडे युरोपमध्ये गेले, दुसरे कांही समूह भारतीय उपखंडात आले. कांही समूह चीनकडे वळले. या स्थलांतराला लाखो वर्षे लागली. मानववंशशास्त्रज्ञांनी मानवाचा हा प्रवास कसा आणि कधी झाला हे मानवाच्या सापडलेल्या सांगाड्यांच्या कार्बन डेटिंग वरून तसेच आजच्या मानव समूहाचे जिनेटिक परीक्षण करून सिद्ध केली आहे.

भारतात सगळेच उपरे
जर मानवाची उत्पत्तीच भारताबाहेरची आहे, तर भारतातील कोणताच समूह मूळनिवासी असू शकत नाही, ही गोष्ट सूर्य प्रकाशाइतकी स्वच्छह आहे. हे झाले प्राचीन मानवाबद्दल. आता भारताचा गेल्या पाच हजार वर्षाचा इतिहास बघितला तर संस्कृतीचा प्रवाह पश्चिमेकडून पूर्वेकडे झालेला दिसतो. सिधू संस्कृतीतील लोक पुढे पंजाबकडे, मग गंगा-यमुनेच्या खो-यात आणि मग दक्षिणेकडे सरकले असे दिसते. मूळनिवासीवादी लोक स्वत:ला सिधू संस्कृतीचे वारसदार समजतात. मग ते सध्या जिथे रहातात तिथे ते सिंधू संस्कृतीच्या प्रदेशातून आले असे मानावे लागेल. बरे हे सिंधू संस्कृतीतील लोक तेथे आले कोठून? ते तेथे जमिनीतून तर उगवले नव्हते, आणि गंगा-यमुनेच्या खो-यातूनही तिकडे गेले नव्हते. अर्थातच त्यांचे मूळ आणखी पश्चिमेकडे, इराण-इराक या भागात असले पाहिजे. म्हणजे तथाकथित मूळनिवासी हे भारतातील मूळनिवासी नाहीत हे सिद्ध होते.

भारताच्या माहीत असलेल्या इतिहासात येथे भारताबाहेरून अनेक टोळ्या आल्या आणि पुढे इथेच स्थायिक झाल्या. त्यात ग्रीस वरून आलेले ग्रीक, तिबेटमधून आलेले मंगोलोईड वंशाचे लोक, इजिप्त, अरब प्रदेश, इराण या भागातून आलेले शक, याशिवाय हूण, कुशाण, मोगल, ताझिक, उझबेक, अरब, इराणी, आफ्रिकेतून आलेले हबशी अशा अनेकांचा समावेश होतो. या लोकांचे एकमेकांशी लग्न संबंधही झाले. त्यामुळे आजचा भारतीय समाज हा वेगवेगळे वंश आणि टोळ्या यांचे अजब मिश्रण आहे. त्यामुळे कोणी स्वत:ला मूळनिवासी आणि ब्राम्हणांना विदेशी समजत असेल तर तो एक मूर्खपणा आहे.

मूळनिवासीवादी लोकांना नागवंशाचे फार कौतुक आहे. हे नागवंशी लोक म्हणजे दुसरे-तिसरे कुणी नसून तिबेटमधून भारतात आलेले मंगोलोइड वंशाचे लोक होत. त्यामुळे नागवाशीयांना मूळनिवासी मानणे हास्यास्पद आहे.

मूळनिवासीवाद भारतीय घटनेच्या विरोधात
भारतीय घटना मूळनिवासीवादाचे समर्थन करत नाही हे मूळ निवासीवाद्यांच्या लक्षात येत नाही. ते जेंव्हा ब्राम्हणांना विदेशी ठरवून भारताबाहेर हाकलण्याच्या गोष्टी करतात तेंव्हा घटना पायदळी तुडवत असतात हे त्यांना कळत नाही. खुद्द बाबासाहेब आंबेडकर यांनीही ब्राम्हणांना भारताबाहेर हाकलण्याची गोष्ट कधीच केली नाही, आणि मूळनिवासीवादाचे समर्थनही केले नाही. त्यामुळे मूळनिवासीवादी लोक भारतीय घटनेचा आणि बाबासाहेबांचा सातत्याने अपमान करत आहेत असेच म्हणावे लागेल.

बौद्ध धर्मात कुणालाही परके मानले जात नाही. पण बौद्ध धर्म आचरणात आणण्याऐवजी त्याचा राजकारणासाठी उपयोग करणा-यांकडून आपण काय अपेक्षा करणार?

मूळनिवासीवाद म्हणजे वंशवाद आहे. या वंशवादाला वेळीच आवर घातला पाहिजे.

महाविचार LATEST

Popular Posts This Week