सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Monday, July 16, 2012

सुनीताची गगनभरारी आणि भारतीयांची मानसिकता

-महावीर सांगलीकर

व्यक्तिपूजक भारतीय मेडीयामध्ये सध्या अमेरिकन अंतराळ वीरांगना सुनीता विल्यम्स हिची जोरदार चर्चा चालू आहे. या चर्चेचा विषय अंतराळ मोहीम ही नसून सुनीता विल्यम्सचे तथाकथित भारतीय वंशाचे असणे हा आहे.

पण मुळात सुनीता विल्यम्स ही भारतीय नाही, आणि भारतीय वंशाचीही नाही. भारतीय वंश नावाचा कोणताही वंश जगात अस्तित्वात ही नाही. तसेच Indian Origin या इंग्रजी शब्दाचे भाषांतर भारतीय वंश असे होवूच शकत नाही. सुनीताचे वडील दीपक पांड्या हे मूळचे गुजरातचे असले तरी ते अमेरिकन नागरिक आहेत. सुनीताची आई बोनी ही मूळची स्लोवेनियन आहे. सुनीताचा जन्म १९६५ मध्ये अमेरिकेत झाला, व ती अमेरिकेची नागरिक आहे. अमेरिकन पद्धतीनुसार सुनीताविल्यम्स इंडिअन-स्लोवेनियन-अमेरिकन ठरते.

अमेरिकन नौदलात अधिकारी असलेल्या सुनीताने एफ. बी.आय. मधील पोलीस अधिकारी मायकेल जे. विल्यम्स यांच्याशी लग्न केले. तिने तिथल्या एखाद्या भारतीय तरुणाशी लग्न केले नाही, यातच सर्व कांही आले. एका सर्वेनुसार अमेरिकेतील सुमारे ३०% भारतीय मुली भारतीय तरुणांशी लग्न करण्याचे टाळतात, त्या ऐवजी भारतीय नसलेल्या अमेरिकन तरुणांशी लग्न करतात. भारतात जन्मलेली कल्पना चावला, जी पुढे अमेरिकेत जावून नासाची प्रसिद्ध अंतराळवीर झाली, तिने देखील जीन पिअरे हॅरीसन या फ्लाईट इन्स्ट्रक्टरशी लग्न केले होते. अमेरिकेतील जिनिअस भारतीय तरुणी भारतीय पुरुषांशी लग्न करत नाहीत हे कटू (आणि गोडही) सत्य आहे. गोड याच्यासाठी की या तरुणी भारतीय जातीवादी मानसिकतेतून पूर्ण बाहेर पडल्या आहेत. असो.

सध्या सुनीता ज्या मोहिमेवर अंतराळात गेली आहे, ती मोहीम रशिया, अमेरिका आणि जपान या तीन देशांची संयुक्त मोहीम आहे. या मोहिमेत भारताचा कसलाही सहभाग नाही. एखादा भारतीय अंतराळवीर (म्हणजे खरोखरचं भारतीय, भारताचा नागरिक असणारा) भारतीय किंवा इतर देशाच्या यानातून अंतराळात गेला असता तर त्याचे भारतीय मेडीयाने कौतुक करणे ठीक होते, पण असे कांही नसताना आपल्या भारतीय असण्याचा इगो कुरवाळण्यासाठी सुनीताचे अवाजवी कौतुक करणे हा मूर्खपणा आहे.

हे कौतुक करताना हा मेडीया ही मोहीम नेमकी कशासाठी आहे, तेथे कसले प्रयोग किती दिवस करण्यात येणार आहेत याची कसलीही चर्चा करत नाही, या मोहिमेत सहभागी झालेल्या इतर दोन अंतराळवीरांची नावेही घेत नाही. हा सगळा दुभंगलेल्या भारतीय मानसिकतेचा परिणाम आहे.

मी दुस-या एका लेखात उल्लेख केलेली 'महान लोक विचारांवर चर्चा करतात, दुस-या दर्जाचे लोक घटनांची चर्चा करतात आणि मूर्ख लोक व्यक्तींबद्दल चर्चा करतात'' (Great minds discuss ideas. Average minds discuss events. Silly minds discuss people -Eleanor Roosevelt), ही उक्ती भारतीय मेडीयाच्या बाबतीतही खरी ठरते.

2 comments:

  1. "दुस-या दर्जाचे लोक घटनांची चर्चा करतात आणि मूर्ख लोक व्यक्तींबद्दल चर्चा करतात"
    तुम्ही काय वेगळे करत आहात?

    ReplyDelete
  2. तुमची मानसिकता नकार्थी आहे .दुसा-यांना मुर्ख मानण्यातच तुम्हाला शहाणपण वाटतय.

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week