-महावीर सांगलीकर
आपल्या भारतात समाजाचा एक मोठा भाग असा आहे की तो नेहमी नव्याने येवू घातलेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध करत असतो. १८५२ साली भारतात इंग्रजांनी पहिली रेल्वे सुरू केली तेंव्हा तिला समाजातील अनेकांनी विरोध केला. त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी देखील नव्याने येणा-या गोष्टींना विरोध केला. धरणांना विरोध, हायब्रीड धान्ये व बियाणांना विरोध, कॉम्प्यूटरला विरोध, रस्त्यांना विरोध, पहिली पासून इंग्रजीला विरोध, पवन चक्क्यांना विरोध, अणुउर्जेला विरोध, एफ.डी.आय.ला विरोध अशी विरोध करण्यात आलेल्या गोष्टींची कितीतरी मोठी यादी देता येईल.
आज ग्यास सिलिंडरचे भाव वाढले म्हणून ओरड करणारांचे दोन पिढ्यांपूर्वीचे पूर्वज ग्यासवर अन्न शिजवणे या प्रकारालाच विरोध करत असत. ग्यासवर शिजवलेले अन्न ते खात नसत, त्यांना चुलीवर किंवा कोळश्याच्या शेगडीवर शिजवलेलेच अन्न चालत असे. असेही लोक होवून गेलेत की रॉकेल आणि स्टोव्ह या गोष्टी त्यांना चालत नसत.
आज ग्यास सिलिंडरचे भाव वाढले म्हणून ओरड करणारांचे दोन पिढ्यांपूर्वीचे पूर्वज ग्यासवर अन्न शिजवणे या प्रकारालाच विरोध करत असत. ग्यासवर शिजवलेले अन्न ते खात नसत, त्यांना चुलीवर किंवा कोळश्याच्या शेगडीवर शिजवलेलेच अन्न चालत असे. असेही लोक होवून गेलेत की रॉकेल आणि स्टोव्ह या गोष्टी त्यांना चालत नसत.
मला आठवते, मी जेंव्हा दुसरी-तिसरीत होतो तेंव्हा शाळेत आम्हा
विद्यार्थ्यांना टाकानेच लिहिण्याची सक्ती होती. कोणी फौंटन पेनाने
लिहिल्यास ते चालत नसे. का तर म्हणे टाकाने अक्षराला वळण लागते. (त्याही
आधी टाकही चालत नसत, बोरूने लिहिण्याची सक्ती असे). पुढे टाक मागे पडून फौंटन
पेनचा वापर वाढला, पण तेवढ्यात Ball Pen हा प्रकार आला. पण आम्हाला Ball Pen वापरू देत नसत. का? पुन्हा तेच कारण. म्हणे फौंटन पेनने अक्षराला वळण लागते, Ball Pen ने अक्षर खराब होते. सगळा बिनडोकपणा.
अशा बिनडोकपणाचा कहर म्हणजे सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर एक मोठे धरण बांधण्यात आल्यावर लोक
त्या नदीचे पाणी पीत नसत. या धरणातील पाण्याच्या दाबाच्या शक्तीवर वीज
बनवण्यात येते. धरणाला विरोध करणा-यांनी असा 'शोध' लावला की त्या धरणात कोयना नदीतल्या
पाण्यातील वीज काढून घेतलेली जाते, त्यामुळे कोयनेचे पाणी पिण्यायोग्य नसते.
धन्य ते शोधकर्ते आणि त्यांचे ऐकून 'जलत्याग' करणारी महान जनता.
लोकांच्या अशा विकास विरोधी मानसिकतेमागे काय कारण असावे? कारण साधे-सोपे आहे. परंपरावाद हेच त्याचे मुख्य कारण आहे. या परंपरावादातूनच प्रत्येक नव्या गोष्टीला विरोध होत असतो.
नवीन गोष्टी स्वीकारायच्या म्हणजे नवीन कांहीतरी शिकायला लागते, आणि नवीन
कांही शिकायची बहुतांश लोकांची इच्छा नसते. मागे जेंव्हा बॅंकांचे
कॉम्पुटरीकरण करण्याचे ठरले तेंव्हा बँक कर्मचा-यांनी देशव्यापी संप
पुकारला. कारण दिले गेले कॉम्पुटरीकरणामुळे नोकरकपात होईल आणि देशात
बेरोजगारी वाढेल. पण हे सांगायचे कारण होते, खरे कारण हेच होते की आता
सगळ्यांना कॉम्प्यूटर चालवणे शिकावे लागेल. अर्थात अनेक नव्या गोष्टींच्या बाबतीत लोकांना कांहीच शिकण्याची गरज नसते, तरीही ते विरोध करतात. कारण त्यांच्या परंपरावादी मानसिकते मुळे त्यांना कसलेही नवीन बदल चालत नाहीत. ठेवले अनंते तैसेची रहावे. याशिवाय विरोधासाठी विरोध हा प्रकारही असतोच.
अशा मानसिकतेचे लोक हे विकासाचे मारेकरीच असतात. त्यांना कम्युनिस्ट-समाजवादी लोक खतपाणी घालतात आणि आपले राजकारण साधून घेत असतात. पण हळूहळू जनतेच्या या मानसिकतेमध्ये फरक पडत आहे ही समाधानाची गोष्ट आहे. पण परंपरावादी मानसिकतेच्या राजकारण्यांचे काय करायचे हा एक प्रश्नच आहे.
fear of unknown and insecurity
ReplyDelete