सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Saturday, June 30, 2012

माणसाला धर्माची गरज आहे काय?

-महावीर सांगलीकर

माणसाला धर्माची गरज आहे काय? हा प्रश्न विचारी माणसाला पडू शकतो. त्याचे सोपे उत्तर 'होय, माणसाला धर्माची गरज आहे' किंवा 'कशाला पाहिजे तो धर्म, माणूस धर्माशिवाय जगू शकतो' असे कोणतेही एक देता येईल, पण प्रत्यक्षात या प्रश्नांचे 'हो' किंवा 'नाही' असे ऑप्शनल उत्तर देता येणार नाही. कारण या प्रश्नाला अनेक पैलू आहेत.

जगातील सगळी माणसे बौद्धिक आणि भावनिक दृष्टीने सारख्या गुणवत्तेची नाहीत. प्रत्येकावर त्याच्या आयुष्यात अनेक संकटे, अडचणी येत असतात. प्रत्येकजण आपल्याला येणा-या अडचणींचा मुकाबला स्वबळावर, खंबीरपणे करू शकत नाही. संकटकाळात मित्र, नातेवाईक, समाज मदतीला धावून येवू शकतो, पण अशा काळात माणसाला देव आणि धर्म या दोन गोष्टींमुळे भावनिक आधार मिळू शकतो. त्यामुळे देव मग तो प्रत्यक्षात अस्तित्वात नसला तरी, आणि धर्म, मग त्यात कितीही अंधश्रद्धा आणि हास्यास्पद गोष्टी असल्या तरी, सामान्य माणसाच्या मानसिक व भावनिक गरजा पूर्ण करतात.

संकटाने ग्रासलेल्या माणसाला देवाची, धर्माची गरज जरा जास्तच भासते. त्यामुळेच ज्या घरात देव-देवतांच्या फोटोंची संख्या जास्त असते, अंधश्रद्धा वाढवणा-या पोथ्या-पुराणे दिसतात, त्यांची पारायणे चाललेली असतात, त्या घरातील लोक कोणत्या तरी तणावाखाली वावरत आहेत आणि त्यामुळेच ते इतके देव-देव करत आहेत असे समजावे.

दुस-या बाजूला जगात अशीही अनेक माणसे आहेत की ते देव आणि धर्म यांच्या आधाराशिवाय व्यवस्थित जगू शकतात. आपण त्यांना नास्तिक किंवा निरीश्वरवादी म्हणतो.

साधारणपणे आस्तिक म्हणजे देव-धर्म मानणारी माणसे पापभिरू, सज्जन वगैरे असतात, तर नास्तिक माणसे पापी असतात असे मानले जाते. पण त्यात कांही तथ्य नाही. उलट नास्तिक माणसात नैतिकतेने वागणा-यांचे प्रमाण जास्त असल्याचे आढळून येते. दुसरीकडे भ्रष्टाचारी, गुंड, चोर-दरोडेखोर, काळे धंदे करणारे यांच्यातील बहुतेक सगळे लोक हे प्रचंड देवभक्त आणि धार्मिक असतात हे दिसून येते. पण याचा अर्थ असा नव्हे की सगळे देवभक्त आणि धार्मिक लोक अशा प्रकारचे असतात. सर्वसामान्य लोक, मग ते आस्तिक असो वा नास्तिक, ब-यापैकी नैतिकतेने जगत असतात.

वर म्हंटल्याप्रमाणे समाजातील मोठ्या वर्गाला देव आणि धर्माची गरज असते. या दोन गोष्टी त्यांचे जीवन सुसह्य करतात. जोपर्यंत त्यांची गरज पूर्ण करणारे हे घटक इतरांच्यावर लादले जात नाहीत, इतरांना त्याचा त्रास होत नाही, तोपर्यंत देव-धर्म या गोष्टींना इतरांनी विरोध करायचे कांही कारण नाही. जर एखादा धर्म स्वीकारल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा, कुटुंबाचा अथवा समाजाचा सर्वांगीण विकास होत असेल, तर त्यालाही कोणी विरोध करण्याचे कारण नाही. पण अलीकडे देव आणि धर्म या दोन्ही गोष्टींचा, विशेषत: धर्माचा उपयोग इतरांना त्रास देण्यासाठी, समाजा-समाजात भांडणे लावण्यासाठी होवू लागला आहे. याला आळा घालण्याचे काम देव-धर्म मानणा-यांनीच केला पाहिजे, नाहीतर समाजा-समाजातील कलह वाढत जाईल.

वेगवेगळे धर्म मानणा-या समाजातील कलह कमी करण्याचा एक उपाय मला सुचला आहे. तो म्हणजे धर्म मानणा-या प्रत्येकाने आधी आपल्या धर्माच्या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. त्याबरोबरच इतर धर्माचे तत्वज्ञानही अभ्यासावे. पण मजेची गोष्ट अशी की बहुतेक सगळ्या धार्मिक आणि स्वधर्माभिमानी लोकांना आपल्या स्वत:च्या धर्माच्या तत्वज्ञानाविषयी ओ की ठो माहिती नसते. त्यात त्यांचा कांही दोष नाही, कारण त्यांना तत्वज्ञान जाणून घ्यायची गरजच नसते, त्यांना फक्त धर्माचा आधार पाहिजे असतो. याउलट अनेक नास्तिक लोक वेगेवेगळ्या धर्माच्या तत्वज्ञानाची मूलभूत माहिती जाणून घेतात असा माझा अनुभव आहे.

आता जेंव्हा सामान्य माणसाला देवाधर्माचा आधार हवा आहे, पण तत्वज्ञान नको आहे त्यांनी एक काम करायला कांहीच हरकत नाही. त्यांनी सर्व धर्मांविषयी समभाव ठेवायला शिकायला पाहिजे. इतर धर्मियांचे सण, उत्सव यात भाग घेतला पाहिजे. आपल्या धर्माच्या तीर्थक्षेत्रांना जशा भेटी देतो तशा इतर धर्मांच्या तीर्थ क्षेत्राना देखील भेटी दिल्या पाहिजेत, निदान जवळपासच्या तरी.

अनेक लोकांना आपल्या मायबोली बरोबरच किमान एकतरी दुसरी भाषा येत असते. एका अर्थाने भारतातील बहुतेक लोक द्विभाषिक आहेत. अनेकजण त्रिभाषिकही आहेत. मग माणूस जर द्विभाषिक अथवा त्रिभाषिक असू शकतो, तसा द्वि-धर्मी अथवा त्रिधर्मी असायला काय हरकत आहे? धर्म जर भावनिक आधारासाठीच पाहिजे असेल, तर एक से भले दो, दो से भले तीन या न्यायाने त्याने दोन-तीन धर्म 'आपलेच' म्हणून पाळायला काय हरकत आहे? खरे म्हणजे भारतीयांची मानसिकता अनेक धर्म पाळण्याचीच आहे, आणि आमचाच धर्म श्रेष्ठ म्हणणारे देखील एकाचवेळी अनेक धर्म पाळत असतात, कारण भारतातील सगळ्याच धर्मांनी इतर धर्मातील चांगल्या आणि उपयोगी गोष्टी आपल्यात सामावून घेतल्या आहेत.

एक गोष्ट तर सगळ्याच धर्मियांनी पाळली पाहिजे, ती म्हणजे आपल्या धर्माचा राजकारण्यांकडून होणा-या दुरुपयोगाला आळा घातला पाहिजे.

अर्थातच हा सगळा उपदेश ज्यांना धर्माची गरज भासते त्यांच्यासाठी आहे. जे देवा-धर्माशिवाय जगू शकतात ते नक्कीच ग्रेट आहेत. नास्तिकता ही देव-धर्म यांच्याप्रमाणे परंपरेने किंवा अनुकरणाने येणारी गोष्ट नाही. केवळ विचारी माणसेच नास्तिक बनू शकतात, आणि आपणास माहीत आहेच की माणूस हा विचार करणारा प्राणी असला तरी सगळीच माणसे विचार करत नसतात.

हेही वाचा:
धर्म आणि विज्ञान
वारकरी संप्रदायाचे मूळ कोठे आहे?
उपेक्षितांसाठी जैन धर्मच जास्त योग्य

2 comments:

  1. कित्येक वर्षापूर्वी कार्ल मार्क्स ने धर्म हि अफूची गोळी असे म्हटले होते. धर्माचा उपयोग सामान्य माणूस आपल्या मनामध्ये असलेल्या दुखावर फुंकर घालण्यासाठी व तणावाला दूर करण्यासाठी करतो. अनेकदा तो "देव बघत आहे तो मला मदत करेल" असे म्हणून एक आशेचा किरण निर्माण करतो व हा आशेचा किरण त्याला लढण्यासाठी मदत हि करतो. त्यामुळे त्याचा देवावरची श्रद्धा अजून दृढ होते. पण यातून समस्या अशी निर्माण होतो की याने त्या माणसाचा देवावरचा विश्वास दृढ होतो पण स्वतःवरच्या विश्वासाचे काय? आपल्या आयुष्यातले प्रश्न सोडवायला किती दिवस आपण या देव नावाच्या टेकुचा वापर करणार. नंतर हा टेकूच दादागिरी करायला लागतो व नवस उपासतापास याच्यात माणूस गुंतून जातो व मूळ प्रश्नावर काम न करता या गोष्टींवर शक्ती व पैसे वाया घालवू लागतो याचे कारण तोपर्यंत त्याचा मनात श्रद्धेची जागा भीतीने घेतलेली असते की आपण जर उपासतापास किंवा व्रत वैकल्ये केली नाही तर आपल्याला या गोष्टीत यश मिळणार नाही किंवा आपला हा प्रश्न सुटणार नाही. मग हा एक मानसिक कुमकवतपणा होतो. हा तुमचा कुमकवतपणा इतरांच्या लक्षात आला की त्याचा फायदा अनेक अपप्रवृत्तीकडून केला जातो. याचे सुंदर चित्रण जोगवा, देवूळ यासारख्या अनेक चित्रपटामध्ये केलेले आहे.
    आपण ताकदवान होण्यासाठी इतरांना कुमकवत करावे लागते व राजकारण हा ताकादिचाच खेळ असतो. इतिहासाकडे पहिले तर mass Hysteria म्हणजे समाजामध्ये भीती पसरवून त्याचा फायदा आपली पोळी भाजून घेण्यासाठी अनेकांनी केला आहे. देवदासी किंवा जोगतीण हि अशीच एक प्रथा, अनेक बडव्यांनी आणि ताकद्वरांनी आपल्या कामवासनेच्या पूर्ति साठी काढलेली अनिष्ठ प्रथा. आत्तासुद्धा राजकारणी लोक हिंदू मुस्लीम, ब्राह्मण - अब्राह्मण, उत्तरभारतीय - दक्षिणभारतीय अश्या अनेक भिन्नतेचा वापर वाद किंवा भीती निर्माण करण्यासाठी वापरतात. मी असे म्हणत नाही आहे की हे वादांच्या मुळाशी प्रश्नच नसतात, प्रश्न असतात पण ते त्या भिन्नतेमुळे नसतात तर ते त्या त्या समाजातील अपप्रवृत्तींमुळे असतात. कोणीही मला असा एक समाज दाखवावा की ज्यामध्ये अपप्रवृत्ती नाहीत. पण अराजकारणी, ताकदवर, धूर्त लोक याचा वापर Mass Hysteria म्हणजे समाजामध्ये भीती पसरवण्यासाठी करतात व स्वतची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करतात. खरे प्रश्न अपप्रवृत्तींचे असतात कुण्या एका समाजाचे नसतात. आजकाल मेडिया व इंटरनेट वर अनेक लोक भडक लेखन करतात व आपल्या वाहिनीची टीआरपी किंवा ब्लोगचे ट्राफिक वाढविण्यासाठी करतात. व आपण मुर्खासारखे या सर्व गोष्टींना बळी पडतो. भीती हे एकच तुमचे शोषण होण्याचे कारण आहे. मार्केटिंग वाले पण अशी भीती किंवा नसलेली गरज निर्माण करून तुमच्या गळ्यात उत्पादने मारून जातात.
    प्रश्नांची उत्तरे सत्याचा उजेडात शोधणे ह्याच या सगळ्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. देव आहे की नाही याचे उत्तर मला माहित नाही, मी अज्ञानी (Agnostic) आहे. पण एवढे सांगतो की देवाला किंवा धर्माला मी माझ्या कुमकवतपणाचे कारण कधीच बनू देणार नाही, आणि खरेच देव असेल तर मला वाटते की त्याला हि असेच वाटेल.

    ReplyDelete
  2. अतिशय समर्पक विचार..

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week