-महावीर सांगलीकर
ऑफिसमध्ये, दुकानात, चौका-चौकात, फेसबुकवर नुसत्या राजकारणाच्या गप्पा. अरे यांना दुसरी कांही कामे आहेत की नाही? बोलण्यासारखे दुसरे कांही विषय यांच्याकडे नाहीत का? की दुसरे विषय यांना कळत नाहीत? या सगळ्यांच्यावर मानसोपचाराची गरज आहे, कारण यांच्या या राजकीय गप्पांमागे घरातली मानसिक अशांतता आहे.
कुणी माझ्याशी राजकारणावर बोलायला लागले की मी त्यांची फिरकीच घेतो. आज एक हॉटेलवाला मित्र आज मला बघून गल्ल्यावरनं उठून माझ्याकडे आला. मी त्याला म्हणालो, माझ्याशी राजकारणावर अजिबात बोलायचं नाही. तुझ्या हॉटेलचे आणि घराचे कांही प्रॉब्लेम्स असतील तर मला सांग, मी ते सोडवू शकतो. त्याचा चेहरा पडला. तो दुस-या एका टेबलाव गेला आणि तिथं राजकारणावर गप्पा मारू लागला.
त्याच्या घरात इस्टेटीवरनं भावा-भावांची प्रचंड भांडणे चालू आहेत. अगदी मारामारीपर्यंत. एकमेकांशी बोलणे होत नाही. सतत उदास चेहरे. त्यांचे चेहरे बघितल्यावर बहुधा त्यांना अवघड जागी ढेकूण चावत असावा की काय अशी शंक येते. त्यांचे हॉटेल भर हमरस्त्यावर, पण नीट चालत नाही. हे हॉटेल म्हणजे अनेक लोकांसाठी राजकारणावर गप्पा मारण्याचा अड्डा झाले आहे. एक कप चहा प्या दोघात, आणि गपा मारा तासभर.
परवा दुसरा एक मित्र म्हणाला, ‘आज बैठक आहे अमुक पक्षाची, पाठिंबा द्यायचा का नाही यासाठी’.
मी पटकन म्हणालो, ‘मग जाणार आहेस का तू?’ त्याचा चेहरा बघण्यासारखा झाला.
मग मी म्हणालो, ‘अरे काय त्या लोकांचं सांगत असतोस सारखं? तुझं कांही तरी सांग’.
म्हणाला, ‘मी फोर कलर ऑफसेट मशीन घेतोय’
‘मग हे सांग की. मी तुला कामे देवू शकतो’
हा बाबा 50 वर्षे झाली तरी अजून स्ट्रगल करतोय. आता प्रायॉरि टी राज कारण असल्यावर दुसरे काय होणार?
असे कितीतरी किस्से. बाहेर राजकारणावर जोरजोरात गप्पा मारतील, आपले ज्ञान पाजळतील, पण घरात गेल्यावर तोंडाला कुलूप. संवाद बंद. नाहीतर मग एकमेकांवर भुंकणे. मग हा राग घराबाहेर गेल्यावर एकाद्या नेत्याला शिव्या देवून शमवायचा. या लोकांना प्रत्यक्षात राजकारणात कसलेही स्थान नसते.
राजकारणावर बोलणे हा त्यांचा व्यवसाय असेल तर ठीक आहे. म्हणजे मेडियावाले. पण या लोकांना प्रत्यक्षात राजकारणात कसलेही स्थान नसते.
खरे राजकारणी राजकारणावर फारसे बोलत नसतात.
यातून बाहेर पडणे तसे सोपे आहे. फक्त बाहेर पडण्याची इच्छा पाहिजे.
No comments:
Post a Comment