सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
Showing posts with label Undeernama. Bokaji Rao. Show all posts
Showing posts with label Undeernama. Bokaji Rao. Show all posts

Friday, January 13, 2012

उंदीरनामा (पुस्तक परिचय)


-महावीर सांगलीकर

बोकाजी राव यांचे नवे पुस्तक उंदीरनामा काल जिजाऊ जयंतीच्या दिवशी सिंदखेडराजा व पुणे येथे प्रकाशित करण्यात आले. पुण्यात ते हायकोर्टाचे माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. हे छोटेसे पुस्तक म्हणजे उंदरांची उत्पत्ती, संस्कृती, धर्म, स्वभाव, इतिहास यांचे खुमासदार विडंबन आहे. वानगीदाखल पुढील मजकूर बघा:

उंदरांची मूळ भाषा चिंकृत ही आहे. जगातील सर्व भाषा चिंकृत पासून तयार झाल्या असे उंदरांना मनापासून वाटते. चिमण्या चिवचिव करतात, पाली चुकचुकतात, डुकरे चिं चिं करतात, सुतार पक्षी चक चक करतो, हत्ती चित्कारतात, माणसे चिडतात याचा अर्थ या सर्वांच्या भाषा चिंकृत पासून तयार झाल्या आहेत हे शेंबडा उंदीरही सांगू शकतो.

उंदीरनामा या पुस्तकात लेखकाने उंदरांच्या प्रत्येक गोष्टीचे विडंबन केले आहे. पुस्तकात मजेशीर घटना, भाष्ये यांची रेलचेल आहे. पुढील मजकूर पहा:

बोकाजीराव हे या वाघाची मावशी म्हणून प्रसिद्ध असणा-या नामवंत लेखिका मनीताई बोके यांचे लाडके सुपुत्र आहेत........वाघाचा सुगावा तर लागला, पण त्याने एका उन्दरीनीशी लग्न केल्याने त्याची पार शेळी झाली असल्याचे कळले.... उंदरांचे काळे उंदीर आणि पांढरे उंदीर असे दोन प्रकार आहेत. पांढरे उंदीर इराण मधून भारतात आले.....उंदरांच्या खानावळीत 'एक शेंगदाणा दोघात खाऊ नये' अशी पाटी अवश्य दिसते....उंदीर गोगल गायीला आपली माता मानतात.... एखाद्या उंदरास आपल्या प्रेयसीकडून प्रेम पत्र आले तर तो आनंदात तरंगण्या ऐवजी त्या प्रेम पत्रातील शुद्ध लेखनाच्या चुका काढता बसतो...वगैरे

या पुस्तकात उंदरांनी मांजरांच्या विरोधात केलेल्या बंडाचे वर्णन मुळातच वाचण्यासारखे आहे. त्यातील हा मजकूर विडंबनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे:

या बंडाला सत्तावनचे बंड म्हणतात. असे का म्हणतात याविषयी उंदीर इतिहास संशोधकांमध्ये मतभेद आहेत. काहींच्या मते या बंडात सत्तावन्न उंदरांनी भाग घेतला म्हणून याला सत्तावनचे बंड म्हणतात, दुस-या मतानुसार..

लेखकाने या संशोधनात्मक पुस्तकाच्या शेवटी संदर्भ ग्रंथांची जी यादी दिली आहे तीही मजेशीर आहे. २० पुस्तकांच्या यादीतील ही तीन नावे मी नमुना म्हणून येथे देत आहे:

वैदिक काळातील उंदरांचे विज्ञानाला योगदान: उन्दरोपंत शास्त्री
उंदरांना आणखी किती झोडपणार: मूषकेंद्र गोरे

European Origin of Indian Rats: Dr. Undra Chuhosky Mushakov


एकूणच हे पुस्तक आत्ता पर्यंत लिहिल्या गेलेल्या उंदीरविरोधी पुस्तकांहून एकदमच वेगळे आहे, आणि प्रत्येक उंदीर विरोधी वाचकाने आणि प्रत्येक उंदरानेदेखील वाचलेच पाहिजे असे आहे.

उंदीरनामा
लेखक: बोकाजी राव
प्रकाशक: जिजाई प्रकाशन
५८४ नारायण पेठ, कन्या शाळा बस स्टोप
जिजापूर, पुणे ४११ ०३०
फोन: २०-२४४७६५३९
पाने ४८, किंमत २० रुपये

महाविचार LATEST

Popular Posts This Week