-महावीर सांगलीकर
भाषिक राज्ये ही देशाच्या अखंडतेला धोका बनली आहेत. राज्याच्या सिमेपलीकडचे लोक परके झाले आहेत. महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक, कर्नाटक विरुद्ध तमिळनाडू, बिहार विरुद्ध महाराष्ट्र, हिंदी विरुद्ध मराठी, तमिळ विरुद्ध हिंदी, कन्नड विरुद्ध मराठी, तमिळ विरुद्ध कन्नड हे सर्व भाषिक राज्यांचेच प्रताप आहेत.
भाषिक राज्ये तयार करण्यामागे जनतेची आणि प्रशासनाचे सोय व्हावी हा महत्वाचा हेतू होता. पण तो हेतू बाजूला पडून ही राज्ये प्रादेशिक आणि भाषिक अस्मितेला खतपाणी घालण्याचे काम करू लागली आहेत. इतर राज्यातील लोकांना तुच्छतेने बघण्यापर्यंत मजल गेली आहे. प्रत्येक राज्यातील इतर भाषिक नागरिक हे त्या-त्या राज्याचे दुय्यम नागरिक ठरवण्यात येवू लागले आहेत.
पाकिस्तान नावाचा शत्रू नसता तर राज्या-राज्यात युद्धे झाली असती. त्यामुळे पाकिस्तानचे अस्तित्व भारताच्या दृष्टीने एक वरदानच ठरले आहे.
मोठ्या आकाराचे राज्ये उद्या मोठी डोकेदुखी ठरू शकतात. त्यामुळे सगळ्या मोठ्या राज्यांचे तुकडे करायला पाहिजेत, म्हणजे देशाचे तुकडे होणार नाहीत.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भाषिक राज्यांच्या निर्मितीला प्रचंड विरोध होता. पण त्यांचे कोणी ऐकले नाही. बाबासाहेबांनी आकाराने मोठ्या राज्यांना देखील विरोध केला होता.
उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री मायावती यांनी त्या राज्याचे चार तुकडे करण्याचा प्रस्ताव तेथील विधान सभेत पास केला हे बरेच झाले. अशाच प्रकारे महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, तमिळ नाडू, आंध्र. बंगाल या सगळ्याच राज्यांचे तुकडे करायला पाहिजेत.
महाराष्ट्राचे किमान तीन-चार तुकडे व्हायला पाहिजेत. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण वगैरे. मुंबईचेही वेगळे राज्य व्हायला पाहिजे.
भारत देश वाचवायचा असेल तर हे करायलाच पाहिजे. नाहीतर उद्या मोठी गंभीर परिस्तिथी निर्माण होवून ती हाताबाहेर जावू शकते.
No comments:
Post a Comment