सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Saturday, March 10, 2012

दलित-आदिवासींचे जैन धर्मांतर

-महावीर सांगलीकर


महाराष्ट्रातील लाखों दलितांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने बौद्ध धर्म स्वीकारला. आजही दरवर्षी मोठ्या संख्येने दलित समाजातील कांही समूह बौद्ध धर्म स्वीकारत असलेले दिसते. भारतातून हद्द्पार झालेला बौद्ध धर्म बाबासाहेबांनी येथे पुन्हा रुजवला ही एक फारच मोठी गोष्ट आहे.

दलितांनी बौद्ध धर्म स्वीकाराला ही गोष्ट जगजाहीर आहे. पण गेल्या सुमारे ७० वर्षांच्या काळात उत्तर भारतात दलित-आदिवासींच्या कांही समूहांनी फार मोठ्या प्रमाणावर जैन धर्म स्वीकारला आहे आणि ही प्रक्रिया आजही चालू आहे, हे फारसे कोणाला माहीत नाही. याचे कारण म्हणजे या जैन धर्मांतराचा कोठेही गाजावाजा केला जात नाही.

दलित-आदिवासींच्या या धर्मांतराची माहिती घेण्याअगोदर आपणास ही गोष्ट माहीत असणे गरजेचे आहे की म्हणजे भारतात आज जे अनेक दलित-आदिवासी-मागासवर्गीय समाज आहेत, त्यातील अनेक समूह हे एकेकाळी जैन धर्माचे अनुयायी होते. असे समूह भारतभर पसरले आहेत आणि एकेकाळी त्यांचा जैन धर्माशी असलेला संबंध अनेक साहित्यिक, शिलालेखिय व इतर पुरावे देवून सिद्ध करता येतो. त्याविषयी मी वेगळा लेख लिहित आहे. असो.

दलित आदिवासींचे जैन धर्मांतर

मध्य प्रदेश आणि राजस्थान या दोन राज्यांच्या सीमावर्ती भागात बलाई या दलित समाजातील लाखों लोकांनी अलिकडील काळात जैन धर्म स्वीकारला आहे. हे धर्मांतर गेली साठ-सत्तर वर्षे चालू आहे. धर्मांतरीत बलाइंना धर्मपाल जैन या नावाने ओळखले जाते. याच काळात याच भागात हिंदू खाटिक समाजातील एका घटकाने मोठ्या संख्येने जैन धर्म स्वीकारला आहे. त्यांना वीरवाल जैन या नावाने ओळखले जाते. या दोन्ही समाजात सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक क्रांती झालेली असून आता हे समाज 'पुढारलेले समाज' म्हणून ओळखले जातात.

गुजरात मधील पंचमहल आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील आदिवासी समाजात जैन धर्माचा प्रचार मोठ्या प्रमाणात झाला आहे. सुमारे नव्वद वर्षांपूर्वी या भागातील एक आदिवासी युवक जैन मुनी झाला व त्याने त्याच्या समाजातील व्यसने, वाईट चाली-रिती, भांडणे या विरोधात प्रबोधन सुरू केले. पुढे तो आदिवासी युवक जैन धर्मातील सर्वोच्च ’आचार्य’ झाला. त्यांचे कार्य दोन संस्थांतर्फे पुढे चालू आहे. या चळवळीसाठी पंजाब, गुजरात व मुंबईच्या कांही जैन उद्योगपतींकडून भक्कम आर्थिक मदत मिळत असते. या आदिवासी समाजात आचरण विषयक, आर्थिक आणि शैक्षणिक क्रांती झाली आहे.

तिकडे झारखंड, प. बंगाल, उडिसा, बिहार या भागात सराक नावाचे आदिवासी आहेत. हे प्राचीन काळी जैन होते, पण त्या भागात जैन धर्माचा पाडाव झाल्यावर अनेक जैन कुटुंबे जंगलात निघून गेली. हे सराक लोक त्या प्राचीन जैनांचे वंशज आहेत. हे आदिवासी आहेत. त्यांच्यात अजूनही प्राचीन जैनांच्या कांही चालीरीती दिसून येतात, पण काळाच्या ओघात ते जैन धर्मापासून दूर गेले होते. त्यांचा मुख्य जैन प्रवाहाशी संबध राहीला नव्हता. पण गेल्या पन्नास वर्षात जैन साधू व उद्योगपतींनी यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे मोठे काम केले आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश या भागातील जैन कार्यकर्ते सराक एरियात जावून सामाजिक काम करत असतात. या कामाचे स्वरूप सराकांच्या ज्या गावात दवाखाना, शाळा, वीज, पाणी, रस्ते वगैरे नाहीत तेथे त्यांची सोय केली जाते. समाजातील गरजू लोकांना आर्थिक मदत केली जाते. युवकांना स्वत:च्या पायावर उभे केले जाते, त्यासाठी मदत केली जाते.

अशाच प्रकारचे काम झारखंड मधील शिखरजी या प्रसिद्ध जैन तीर्थ क्षेत्राच्या आसपासच्या १४ गावात चालू आहे. जैन समाजाने ही १४ गावे पूर्णपणे व्यसनमुक्त आणि शाकाहारी बनवली आहेत, शिवाय या सगळ्या गावात शाळा, दवाखाने, रस्ते, वीज, पाणी यांची सोय केली आहे. दहा वर्षांपूर्वी अत्यंत मागासलेली ही गावे आणि तेथील लोक यांच्यात सर्वांगीण सुधारणा होत आहे.

असेच काम मध्य प्रदेश-छत्तीस गढ सीमेवरील नक्षलवादी भागातील आदिवासींमध्ये चिन्मय सागर नावाचे जैन मुनी करत आहेत. त्यांना जंगलवाले बाबा म्हणून ओळ्खले जाते.

..........आणि दलित युवक जैन मुनी झाला!

अगदी अलीकडची घटना.. राजस्थान मधील चंदाराम मेघवाल हा दलित युवक मुंबईला काम शोधण्यासाठी आला होता. तो ज्या धर्मशाळेत उतरला होता तेथे एका जैन आचार्यांचे रोज प्रवचन चालू असे. ते ऐकून त्यालाही आपण मुनी व्हावे असे वाटू लागले. त्याने त्या जैन आचार्यांपुढे तशी इच्छा व्यक्त केली. आचार्यांनी त्याला अगोदर जैन धर्माचा अभ्यास करायला सांगितले. त्या युवकास मग अहमदाबाद येथे पाठवण्यात आले. तेथे त्याने दोन वर्षे राहून अभ्यास केला. मग त्याला राजस्थान मधील त्याच्या गावीच जैन मुनी दीक्षा देण्यात आली.

असेच दुसरे उदाहारण आपल्या महाराष्ट्रातील आहे. वाशीमचा विशाल दामोदर हा दलित समाजातील इंजिनीअर. २८ वर्षांचा हा इंजिनीअर हैदराबाद येथे चांगल्या पगारावर नोकरी करत असे. त्याने दोन वर्षांपूर्वी जैन मुनी दीक्षा घेतली.

या प्रकारे जैन धर्म प्रचाराचे काम दोन पातळीवर चालू आहे. पहिले म्हणजे समाज प्रबोधन करून व दूसरे म्हणजे ज्यांना मुनी व्हायाचे आहे त्यांना दीक्षा देवून. हे जैन मुनी कसलाही चमत्कार वगैरे करत नाहीत, किंवा कसलेही आमिष दाखवत नाहीत. जैन आचरण (Jain Code of Conduct) चा प्रचार करणे हाच त्यांचा मुख्य उद्देश असतो.

References /हेही वाचा:
Adivasi Conversions To Jainism
Recent Conversions to Jainism
Dalit Engineer Becomes a Jain Monk
Dalit Youth Turns Jain Monk

2 comments:

  1. it's an very good news that we will now see majority of people belonging to Jainism and Buddhism and these people will give glory to India once again which India had during era of Buddhism and Jainism i.e. great samana religions of India.
    Now people will able to escape from irrational vedik religion which is always harsh to majority of Indians.

    ReplyDelete
  2. your understanding on this truly appreciated .. also the last point you mensioned upon the "JAIN CODE OF CONDUCT" is well written word instead of mere a religious procedure. i personally think that Jainism is not a religion but practically a WAY OF LIVING.

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week