सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Monday, December 24, 2012

शंभर टक्के मतदानाचे दिवास्वप्न

-महावीर सांगलीकर 

मतदान करणे हे सक्तीचे असायला पाहिजे , प्रत्येक नागरिकाने  मतदान केलेच पाहिजे आणि जे नागरिक मतदान करणार नाहीत त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे अशा प्रकारचा अतिरेकी विचार कांही लोक मांडत असतात. हा विचार आदर्श असला तरी व्यवहार्य नाही. सक्तीच्या मतदानाची गरज ही कमी प्रमाणात होणा-या मतदानामुळे तयार झाली आहे, पण प्रत्यक्षात मतदानाचे दिसणारे कमी प्रमाण हे केवळ मतदारांच्या उदासीनतेमुळे नसून त्यामागे इतरही  अनेक कारणे आहेत.

सदोष मतदार याद्या ही आपल्या निवडणूक पद्दतीतील मोठा प्रश्न आहे. एखाद्या मतदार संघातील मतदार यादीत ज्यांची नावे असतात, त्यातील अनेक जण तो मतदार संघ सोडून निघून गेले असतात, बरेच जण मयत झालेले असतात. मतदार यादी अद्यावत ठेवणे हे संबधित यंत्रणेला जमत नाही.  त्यामुळे मतदार संघ सोडून जाणा-या आणि मयत मतदारांची नावे मतदार यादीत तशीच राहिलेली असतात.

कांही महिन्यांपूर्वी आमच्या वार्डधील मतदार यादीची दुरुस्ती करण्यासाठी निवडणूक आयोगाचे लोक फिरत होते. त्यांच्याकडे जी यादी होती त्यातील ५०% पेक्षा जास्त नावांवर फुल्या मारलेल्या दिसल्या. कारण ते मतदार आमच्या वार्डमध्ये पूर्वी  होते, पण त्यातील अनेकजण बदली झाल्यामुळे, दुसरीकडे राहायला गेल्यामुळे तसेच कांहीजण मयत झाल्यामुळे ते आता इथे अस्तित्वातच नव्हते. तसेच त्या मतदार यादीत आमच्या वार्डमध्ये कधीच रहात नव्हते अशाही अनेक मतदारांची नावे होती.  

मतदार याद्या बनवणारी यंत्रणा त्या याद्या अद्यावत ठेवण्यात कमी पडतात याचे आणखी एक उदाहरण म्हणजे, एखाद्या मतदाराने मतदार यादीत नाव येण्यासाठी अर्ज दिला, तरी त्याचे नाव त्या यादीत येईल याची कसलीच शाश्वती नसते. मी असे कांही लोक पाहिले आहेत की ज्यांनी तीन-तीनदा अर्ज देवूनही त्यांच्या नावाची नोंदणी मतदार यादीत झालेली नाही.

अशा स्थितीत, समजा एखाद्या गावातील/मतदार संघातील सगळ्या मतदारांनी मतदान केले तरी मुळात तिथल्या मतदार यादीत त्या गावात अस्तित्वात नसणा-या लोकांची नावेही असतात. म्हणजे समजा एखाद्या मतदार संघाच्या मतदार यादीत १५०० लोक आहेत, पण प्रत्यक्षात त्यातील ५०० लोक अस्तित्वातच नाहीत. जे १००० लोक अस्तित्वात आहेत त्या सगळ्यांनी  मतदान केले तरी टेक्निकली ते १००% नसते, तर ६६.६६% असते. आणि हाच प्रकार सगळीकडे घडत आहे.

मतदार यादी आणि मतदान ओळख पत्रात असणा-या नाव, पत्ता, वय, लिंग यांच्या चुका तर भयानक असतात. त्या पाहिल्या की हसावे की रडावे ते कळत नाही.  अशा चुका वारंवार अर्ज देवूनही दुरुस्त होत नाहीत.

त्यामुळे उदासीन कोण आहेत, मतदार की निवडणूक यंत्रणा? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.

मतदान हा अधिकार आहे, कर्तव्य नव्हे 
१००% मतदानाचे स्वप्न बघणा-यांनी आणि त्यासाठी मतदानाची सक्ती करण्याची मागणी करणा-यांनी  ही गोष्टही लक्षात घ्यायला पाहिजे की मतदान हा अधिकार आहे, कर्तव्य नव्हे, त्यामुळे मतदानाची सक्ती करणे चुकीचे ठरेल. 

मतदानाची सक्ती करणे म्हणजे कित्येकदा दहा चोरांपैकी एखाद्याला निवडून देण्याची सक्ती करण्यासारखे ठरेल. खरे म्हणजे मतदानाच्या अधिकारात मतदान न करण्याचा अधिकार देखील आहे. एखाद्या गावातील लोक मतदानावर सामूहिक बहिष्कार टाकतात, तेंव्हा ते चुकीचे कांही करत नसतात. जर राजकारण्यांना त्या गावातील मतेच पाहिजेत, पण त्या गावाच्या प्रश्नांशी कांहीच देणे-घेणे नसेल, तर त्या गावक-यांच्याकडे दुसरा जालीम उपाय नसतोच.

मतदानाच्या दिवशी कित्येक मतदार दुस-या ठिकाणी असतात आणि त्यांचे तेथील काम मतदानापेक्षा महत्वाचे असू शकते, असते. कांही अडचणी असू शकतात. आपल्या इथे 'कोठूनही' मतदान करता येण्याची सोय नाही. त्यामुळे अशा मतदारांनी मतदान करण्याचा प्रश्नच येत नाही.

प्रगत देशातील मतदानाची टक्केवारी

भारताच्या लोकसभा निवडणूकांमधील मतदानाची सरासरी टक्केवारी ५८ आहे. त्याच्या तुलनेत  प्रगत लोकशाही देशांमध्ये, जेथे मतदार याद्या अद्यावत असतात, जे देश आकाराने किंवा लोकसंख्येने मोठे आहेत तेथे  मतदानाची सरासरी टक्केवारी काय असते ते आपण पाहूया:

अमेरिका (यु.एस.): ४८%
रशिया: ६१%
जपान: ७१%
स्पेन: ७३%
कॅनडा: ७४%
ग्रेट ब्रिटन : ७६
फ्रांस: ७६%
जर्मनी: ८६%
(संदर्भ: Voter Turnout Since 1945: A Global Report Editors: Rafael López Pintor and Maria Gratschew, Publisher: International Idea )

अमेरिकेसारख्या शक्तीशाली आणि अतिशय प्रगत देशात मतदानाची सरासरी टक्केवारी फक्त ४८% आहे आणि ती भारताच्या सरासरी मतदानापेक्षा (५८%) चक्क दहा टक्के कमी आहे.

इतर प्रगत देशांपेक्षा भारतात मतदानाची टक्केवारी कमी दिसत असली तरी त्याचे मुख्य कारण सदोष मतदार याद्या हे आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. नुकत्याच झालेल्या गुजरात विधान सभेच्या निवडणुकात मतदार याद्या अद्यावत केल्यामुळे(च) मतदानाची टक्केवारी ७०च्या पुढे गेली यावरूनही हेच सिद्ध होते.

अर्थात, जगात कोणत्याही लोकशाही देशात १००% मतदान होत नसते. १००% मतदानाची स्वप्ने बघाणा-यांनी आणि मतदानाची सक्ती करण्याची इच्छा बाळगणा-यांनी याचा विचार केला पाहिजे.

1 comment:

  1. पण काही स्वार्थी लोक गावोगाव फिरून मतदान होवूच देत नाहीत अश्या नालायक देशद्रोही लोकांचे काय करायचे ?

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week