सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Friday, January 24, 2014

जैन समाजास राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा

-महावीर सांगलीकर

जैन समाजाला राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळाल्याने भलेभले लोक चक्रावलेले दिसतात. 'जैनांना कशाला हवा अल्पसंख्याक दर्जा' यासारखे प्रश्न अनेकांना पडलेले दिसतात. पण असे प्रश्न पडण्यामागचे कारण अल्पसंख्याक दर्जा आणि जैन समाज  या दोन्ही गोष्टींविषयी समाजात असलेले प्रचंड अज्ञान ही गोष्ट आहे. सामान्य लोकांना असे अज्ञान असणे एकवेळ समजू शकते, पण जेंव्हा कांही लेखक-पत्रकार मंडळी आपले अज्ञान दाखवतात तेंव्हा हसू येते. असो.

अल्पसंख्याक दर्जा कोणाला?
ज्या धर्मांचे अनुयायी संख्येने बहुसंख्याकांच्यापेक्षा कमी आहेत त्यांना भारतीय घटनेत अल्पसंख्याक दर्जा देण्याची शिफारस आहे. त्यानुसार मुस्लीम, ख्रिस्ती, शीख, बौद्ध, पारशी आणि जैन हे सर्वजन अल्पसंख्याक ठरतात. (भारतात जैन धर्मीयांची संख्या २००१च्या जनगणनेनुसार केवळ ४२ लाख आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येत ते अर्धा टक्काही नाहीत ) पण अल्पसंख्याक आयोगाच्या निर्मितीनंतर जैन धर्मियांना या सूचित स्थान दिले गेले नाही.

इथे हे लक्षात घ्यायला पाहिजे की अल्पसंख्याक दर्जा आणि समाजाची आर्थिक स्तिथी यांचा कसलाही संबंध नाही. ज्यांना तसे वाटते त्यांनी त्यांना माहीत असणा-या जैनांपेक्षा श्रीमंत असलेल्या पारशी आणि शीख समाजाला असा दर्जा आहे ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे.

जैन धर्मीयांचा लढा
या अन्यायाविरोधात जैन धर्मीयांच्या अनेक संघटना आणि संस्था कायदेशीर लढा देत होत्या. दक्षिण भारत जैन सभेने तर या अन्यायाविरोधात सुप्रीम कोर्टापर्यंत धाव घेतली. 20 वर्षांच्या अवधीत भारतातील 14 राज्यांनी जैनांना राज्य स्तरावर अल्पसंख्याक दर्जा देवूनही टाकला. पण केंद्र सरकार असा दर्जा देण्याचे टाळत होते. त्याचे एक कारण म्हणजे दक्षिण भारत जैन सभेने सुप्रीम कोर्टात केलेली केस. जोपर्यंत ही केस निकालात निघत नाही तोपर्यंत असा दर्जा देता येणार नाही असे केंद्राचे म्हणणे होते. शेवटी तडजोड होवून आधी  दक्षिण भारत जैन सभेने सुप्रीम कोर्टातील केस मागे घेतली आणि केंद्राने जैन धर्मियांना अल्पसंख्याक दर्जा देवून टाकला.

जैन कोण?
जैन हा धर्म आहे, जात नव्हे. जे जैन धर्माचे अनुयायी आहेत ते जैन. भारतातील अनेक समूह, ज्यात शेतकरी, कारागीर, व्यापारी, आदिवासी आणि पूर्वाश्रमीचे दलित असे अनेक घटक आहेत, ते जैन धर्माचे अनुयायी आहेत. जैन म्हणजे व्यापारी असा समज केवळ अज्ञानातून आलेला आहे. पुण्या-मुंबई सारख्या ठिकाणी तर सगळ्याच गुजराती आणि राजस्थानी व्यापा-यांना  जैन समजण्याची प्रथा आहे. पण प्रत्यक्षात त्या व्यापा-यांच्यात जैनांची संख्या फारतर 10 टक्के असते. असो. सांगायचा मुद्दा हा की जी धर्मियांना अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यामुळे केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ त्यांनाही मिळणार आहे. अर्थातच तो जैन समाजातील शेतकरी, कारागीर, व्यापारी, आदिवासी आणि पूर्वाश्रमीचे दलित यांनाच जास्त प्रमाणात मिळणार आहे.

त्याच प्रमाणे रंगनाथ मिश्र समितीच्या शिफारसी नुसार आता बौद्ध आणि शीख यांच्या बरोबरच जैनांनाही हिंदू कायद्यातून वगळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यामुळे आणखी एक फायदा असा होणार आहे की जैन समाज आपल्या 'जैन' या ओळखीबद्दल आज पर्यंत गाफील रहात होता, व त्याचा गैरफायदा घेवून शाळेतील क्लार्क पासून जनगणना करणा-या कर्मचा-यापर्यंत सगळेजण जैनांची नोंद जाणूनबुजून 'हिंदू' अशी करत होते, आता याला आळा बसेल. (येथे हेही लक्षात घ्यायला पाहिजे की जैन हेच हिंदूंचे खरे मित्र आहेत. पण याचा अर्थ हिंदूंनी (पेक्षा हिंदुत्ववाद्यांनी) जैनांवर हिंदू धर्म लादावा असा होत नाही).


हेही वाचा:
दलित-आदिवासींचे जैन धर्मांतर

2 comments:

  1. Jain dharmiyana kharach aplsankhakancha darja milayachi garaj hoti. Loksankhenehi ha samaj far kami aahe tasech hindu pekshyahi aadhik sahushn aahe.. to aaj tyana milala tyamule aanand vatala...

    ReplyDelete
  2. जैन समाजाला अल्पसंख्यांकाच्या यादीत समावेश करून कॉंग्रेसने भविष्यातील एक महत्वाची तरतूद केली आहे. नजीकच्या लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी राष्ट्राचे प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांचे निकटवर्ती श्री. अमित शहा हे राष्ट्राचे अल्पसंख्यांक कल्याण मंत्री बनू शकतात, तर बजरंग दलाचे माजी प्रमुख श्री. प्रदीप जैन हे अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष बनवले जातील. एक नक्की त्यामुळे अल्पसंख्य नावाखाली देशद्रोही प्रवृत्तीला खतपाणी घालणे तरी बंद होईल.

    ReplyDelete

महाविचार LATEST

Popular Posts This Week