-महावीर सांगलीकर
येथे मी स्पष्ट करतो की माझा सामूहिक धर्मांतर या प्रकारास पूर्ण विरोध आहे. सामुहिक धर्मांतर हे केवळ समाजकारण आणि राजकारण असते. त्यामुळेच सामुहिक धर्मांतर करणारे लोक ‘धार्मिक’ झाल्याचे दिसून येत नाही.
धर्म ही वैयक्तिक बाब आहे आणि ती वैयक्तिकच राहिली पाहिजे. तसेच आपण केवळ एखाद्या समाजात जन्मलो म्हणून त्या समाजाचा धर्म आपणास चिकटवून घेणे हे चुकीचे आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणताही धर्म पाळण्याची मुभा पाहिजे. ज्याने त्याने आपल्याला आवडेल, पटेल तो धर्म स्वीकारावा. हा स्वीकारलेला धर्म कसा चांगला आहे हे इतरांना सांगत बसण्याचा प्रकार अजिबात करू नये. इतर धर्म कसे चुकीचे आहेत हे सांगत बसणे म्हणजे मूर्खपणाच आहे. आपल्याला आवडलेल्या धर्माचे आपल्या कुवतीनुसार पालन करणे हीच गोष्ट महत्वाची आहे. खरी धार्मिकता आपल्या धर्माचे पालन करणे आणि इतर धर्मांविषयी आदर बाळगणे यातच आहे.
धर्मांतर हे आर्थिक अथवा भौतिक आमिषामुळे, तसेच एखाद्या धर्माच्या द्वेषातून करणे हेही चुकीचे आहे.
आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जर आपण एकापेक्षा अधिक भाषा बोलू शकतो, म्हणजे बहुभाषिक असतो, त्याच धर्तीवर आपण ‘बहुधार्मिक’ असायला काय हरकत आहे? म्हणजे एखाद्या व्यक्तीचा धर्म हिंदूही आहे, मुस्लिमही आहे आणि ख्रिस्तीही आहे असे व्हायला काय हरकत आहे? याचा अर्थ असा नाही की त्या व्यक्तीने रोज मंदिरात, मशिदीत आणि चर्चमध्ये जायला पाहिजे. धार्मिक असण्यासाठी तुम्ही प्रार्थना स्थळाला भेट द्यायलाच पाहिजे असे कांही नाही.
वर म्हंटल्याप्रमाणे धर्म ही वैयक्तिक बाब आहे आणि ती वैयक्तिकच राहिली पाहिजे. तरी देखील संघटीत धर्म अर्थात त्या धर्माचे अनुयायी कांही चांगले काम करत असतील (शैक्षणिक, आरोग्य विषयक, सेवा, सामाजिक वगैरे) तर त्यात तन-मन-धनाने सहभाग घ्यायला पाहिजे.
कोणताही धर्म स्वीकारायचा असेल तर आपण पुढील गोष्टी करायला पाहिजेत:
त्या धर्माच्या तत्वज्ञानाची अधिकृत माहिती देणा-या पुस्तकांचे वाचन
त्या धर्माच्या आचरण विषयक नियमांचे पालन
धर्म हा प्रार्थना स्थळ आणि कर्मकांड यात नसतो हे जाणून घेवून त्या गोष्टींपासून दूर रहाणे
साधू, गुरू, पुरोहित, मध्यस्थ, फादर, मुल्ला-मौलवी यांच्यापासून जाणीवपूर्वक दूर रहाणे
आपली वेशभूषा वगैरे गोष्टीतून आपण अमुक धर्माचे आहोत याचे प्रदर्शन करू नये
येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कोणी कितीही म्हणत असले की ‘सर्व धर्म हे एकाच ईश्वराकडे जायचे वेगवेगळे मार्ग आहेत’ तरी ही गोष्ट तद्दन खोटी आहेत. मुळात कांही धर्म ईश्वरच मानत नाहीत, जे धर्म ईश्वराचे अस्तित्व मानतात त्यातील कांही धर्म अनेक ईश्वरांना मानतात तर कांही धर्म एकच ईश्वर आहे असे मानतात. जे धर्म एकच ईश्वर आहे असे मानतात त्यांचा ईश्वर वेगवेगळा असतो. या गोष्टी लक्षात घेवून कोणता धर्म स्वीकारायचा ते ज्याने-त्याने ठरवायचे आहे.
कांही लोक म्हणतील की धर्माची गरजच काय? तर याचे उत्तर असे आहे की ज्यांना धर्माची गरज नाही त्यांनी कोणताच धर्म स्वीकारू नये, पण ज्यांना धर्माची गरज आहे, त्यांना अडवण्याचा ‘अधार्मिकांना’ कसलाच अधिकार नाही.
हेही वाचा:
No comments:
Post a Comment