-महावीर सांगलीकर
मी हिंदू धर्माचा कट्टर विरोधक म्हणून ओळखला जातो. पण मी हिंदू धर्माचा विरोधक नसून वैदिक धर्माचा विरोधक आहे. हिंदू धर्म आणि वैदिक धर्म या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे जाणकारांना सांगण्याची गरज नाही. वैदिक लोक मजबूरीमुळे किंवा धोरणीपणामुळे आपणास हिंदू म्हणवून घेतात, पण आपण हिंदू नाही आहोत हे त्यांना माहीत आहे.
माझा ब्राम्हणांना देखील इतर लोक करतात तसा सरसकट विरोध नाही आहे, तर केवळ त्या ब्राम्हणांना विरोध आहे जे हिंदू धर्माच्या आडोश्याने वैदिक धर्माचा उदो-उदो करतात, इतर धर्म व इतर धर्मियांना तुच्छ मानतात, समाजात इतर धर्म व
इतर धर्मीयांबद्दल गैरसमज आणि द्वेष पसरवण्याचे काम करतात.
त्यामुळे हिंदू धर्म, त्या धर्माच्या देव-देवता यांना सरसकट नावे ठेवणे, त्या धर्माला तुच्छ लेखणे हे चुकीचे आहे असे मी मानतो. इतकेच नाही, तर कांही लोक, जे हिंदू धर्माच्या मुळावरच उठले आहेत, ते घटनाविरोधी वागत आहेत असे माझे स्पष्ट मत आहे. भारतीय घटनेने प्रत्येकाला त्याला पाहिजे तो धर्म पाळण्याची मुभा दिलेली आहे. त्यामुळे हिंदू धर्मियांनाही त्यांचा धर्म पाळण्याची पूर्ण मुभा आहे. घटनेचा ठेका घेतल्यासारखे वागणारे, ज्यांनी हिंदू धर्म स्वखुशीने सोडला आहे असे कांही लोक हिंदूंना हा अधिकार नसल्याचे समजत आहेत व घटनेला हरताळ फासत आहेत.
खरे पहाता या देशातील सगळ्यात जास्त लोक स्वत:ला हिंदू मानणारे आहेत. जेंव्हा तुम्ही हिंदू धर्माला, हिंदू समाजाला शिव्या घालता, तेंव्हा या देशातील सगळ्यात मोठ्या समाजाला शिव्या देवून त्यांना दुखावण्याचे काम तुम्ही करत असता. हिंदू धर्मात अनेक चुकीच्या रूढी होत्या व आजही आहेत, पण या धर्मात आणि धर्मियांत गेल्या शंभर वर्षात प्रचंड सुधारणा झाल्या आहेत. या सुधारणा होण्यामागे राजा राम मोहन रॉय, स्वामी दयानंद सरस्वती, गोपाल गणेश आगरकर, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, महात्मा गांधी व इतर अनेकांनी भरघोस प्रयत्न केले आहेत. आजही हिंदू समाजातील अनेक सुधारक अशा प्रकारचे काम करत आहेत. हिंदू धर्माला व हिंदू समाजाला इतरांच्या सल्ल्याची गरज नाही, त्या समाजातील सुधारक काय करायचे ते बघून घेतील. जे हिंदू नाहीत त्यांनी हिंदू धर्माला नावे ठेवत रहाणे, तेही शिवीगाळ करत व खालच्या पातळीवर जावून, हे मूर्खपणाचे आणि संस्कारहीनतेचे लक्षण आहे.
हे हिंदू धर्म विरोधी लोक हिंदू धर्म सोडल्या नंतरही हिंदूंच्या प्राचीन अशा शिव, हनुमान, गणपती वगैरे देवतांना घाणेरड्या शब्दात नावे ठेवतांना दिसतात. खरे पहाता शिव, हनुमान, गणपती हे तीनही दैवते अवैदिकांची. बामसेफी भाषेत मूळनिवासींची. हिंदू समाजातील सगळ्यात जास्त लोक या तीन दैवतांची उपासना करणारे आहेत. त्यांच्या भावना दुखावणारे लोक स्वत:विषयी तिरस्कार निर्माण करण्यापेक्षा दुसरे कांहीही साधू शकत नाहीत. हिंदू देव-देवतांना, हिंदू धर्माला, हिंदू लोकांना सातत्याने शिव्या घालण्यापेक्षा या लोकांनी आपण स्वीकारलेल्या धर्माचे व्यवस्थित पालन कसे करता येईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यामुळे त्याना मानसिक शांती मिळेल व कुणाला शिव्या देण्याची गरज भासणार नाही. शिवाय त्यामुळे त्यांची लौकिक प्रगतीही होईल.
हिंदू समाजातील उपेक्षित जातींनी आपल्या उन्नतीसाठी हिंदू धर्म सोडून द्यायलाच पाहिजे असे नाही. तसेच ज्या उपेक्षित हिंदू जातींना हिन्दू धर्म नको आहे त्यांनी बौद्ध धर्मच स्वीकारायला पाहिजे असेही नाही. हिंदू धर्म न सोडता अनेक उपेक्षित जातींनी गेल्या शंभर-दीडशे वर्षांमध्ये आपली उन्नती केल्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच असेही अनेक समाज आहेत की ज्यांनी हिंदू धर्म सोडून बौद्ध धर्माऐवजी इतर धर्म स्वीकारले व आपली उन्नती साधून घेतली.
मला असे वाटते की सर्वच धर्मियांनी आपल्या धर्माचा उपयोग राजकीय कारणासाठी, इतर धर्मियांवर कुरघोडी करण्यासाठी करणे थांबवले पाहिजे. जग नास्तिकतेच्या दिशेने चालले असताना आमचाच धर्म श्रेष्ठ असे म्हणणे चुकीचे आहे. पण ज्यांना धर्माची अजूनही गरज आहे, त्यांनी त्याचा उपयोग वैयक्तिक आणि समाज हितासाठीच केला पाहिजे, दुस-या धर्माला आणि त्याच्या अनुयायांना तुच्छ लेखण्यासाठी नव्हे.
हेही वाचा:
उपेक्षितांसाठी जैन धर्मच जास्त योग्यबामसेफने दलितांच्या धर्मांतराविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी