सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम

Tuesday, July 3, 2012

शारीरिक कष्टाचे कौतुक अजून किती दिवस ?

-महावीर सांगलीकर

आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्या शरीराची मोठ्या प्रमाणात हालचाल होणे गरजेचे असते. बौद्धिक कष्ट करणा-या लोकांच्या शरीराची हालचाल कमी प्रमाणात होत असते. त्यामुळे हे लोक आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात. यात चालणे, सायकलिंग, पोहणे, जिममध्ये जाणे अशा अनेक प्रकारांचा समावेश होतो. दुसरीकडे कष्टकरी माणसांना अशा प्रकारच्या वेगळ्या व्यायामाची गरज नसते, ते आपल्या कामात दिवसभर राबत असतात, त्यातून त्यांच्या शरीराला आपोआपच व्यायाम घडत असतो.

शारीरिक कष्ट करणारे लोक गरीबी, कमी शिक्षण, बेरोजगारी अशा अनेक कारणांने कष्टाची कामे करतात. त्यांना आपल्या मुलांनीही अशाच प्रकारची कामे करावीत असे मूळीच वाटत नसते. त्यामुळे ते आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात.

पण मजेची गोष्ट अशी की कांही बहुजनवादी लोक शारीरिक कष्टाचे वारेमाप कौतुक करत असतात, आणि बौद्धिक कष्ट करणा-यांच्या विरोधात बोलत असतात. त्याहूनही मजेची गोष्ट ही की, असे कौतुक करणारे लोक स्वत: मात्र शारीरिक कष्टाची कामे करत नाहीत. ते उच्चशिक्षित असतात आणि चांगल्या पगारावर एखाद्या सरकारी किंवा निमसरकारी खात्यात काम करत असतात. कांहीजण शिक्षक, प्राध्यापक असतात. अनेकजन पूर्णवेळ एखाद्या संघटनेचे काम करत असतात. असे असताना शारीरिक कष्टाचे कौतुक करण्याचा यांचा नेमका हेतू काय असतो हे तपासायला पाहिजे. बहुधा कष्टकरी समाज कायमचा कष्टकरी रहावा अशीच त्यांची इच्छा दिसते.

खरे म्हणजे माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. आपले पोट भरण्यासाठी कष्टाची कामे करणे हे माणसाला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. माणसाने आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर बैल, घोडा, हत्ती यांसारख्या प्राण्यांना आपल्या काबूत आणून त्यांच्याकडून कामे करून घेतली, अजूनही घेत आहे. माणसाने ज्याप्रमाणे या प्राण्यांना आपले गुलाम करून घेतले, तसाच कांहीसा प्रकार माणसाला कष्टाची कामे करायला लावण्यात होत आहे. ही एक प्रकारची गुलामगिरी आहे. अशा गुलामगिरीचे कौतुक करणा-यांची कीव करावीशी वाटते.

'मानवाने विचार करायला पाहिजे, यंत्रांनी कामे करायला पाहिजेत' अशा अर्थाचे एक इंग्रजी वाक्य आहे. ('People should think, machines should work'). बुद्धिमान मानवाने अनेक प्रकारची यंत्रे तयार करून मानवाची कामे हलकी व सोपी केली आहेत. ही यंत्रे शोधणारे लोक विचार करणारे, आपल्या बुद्धीचा वापर करणारे होते. या आघाडीवर भारतीयांचे योगदान शून्य आहे. त्यांना कोणत्याही नवीन यंत्राचा शोध लावता आला नाही, आणि आजही परदेशी लोकांनी बनवलेल्या यंत्राची कॉपी करण्यापलीकडे त्यांची मजल गेली नाही. अनेक बहुजनवादी लोक तर यंत्र या प्रकारालाच विरोध करत राहिले. कारण काय तर यंत्रांमुळे रोजगार कमी होतील. पण खरे कारण हे नसून नवीन गोष्टींना विरोध करण्याची पारंपारिक खोड आणि कष्टक-यांनी कष्टकरीच राहावे ही त्यांची सुप्त इच्छा.

युरोपमध्ये, अमेरिकेत समाजात कष्टक-यांचे प्रमाण फार कमी आहे. याउलट भारतात ते फारच जास्त आहे. ही आशादायक गोष्ट नाही आहे. जेंव्हा भारतात कष्टक-यांची टंचाई भासू लागेल, तेंव्हाच भारतीय समाज प्रगत झाला असे म्हणता येईल.

हेही वाचा:
अभिजनांची संस्कृती आणि बहुजनवाद
माणसाला धर्माची गरज आहे काय?

2 comments:

  1. sharirik katshta che kotuk mhanaje gadhav kasaritiche samrthan nahi.Sports,army he sagale sharirik kashta ahe.
    nusate karkuni work mhanaje buddhimatta va intellegence nahi.
    yantra vaparale mhanaje sharirik kashta ajibat hot nahi ha bet chukicha ahe,agadi pragat rastrat suddha.
    sharirik kashtala smart work chi aavashakyata ahe ase mhanayala pahije .

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्याला लेखाचा मुद्दा कळलाय असे दिसत नाही.

      Delete

महाविचार LATEST

Popular Posts This Week