सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
Showing posts with label समाजवाद. Show all posts
Showing posts with label समाजवाद. Show all posts

Thursday, December 6, 2012

विकासाचे पारंपारिक मारेकरी

-महावीर सांगलीकर 

आपल्या भारतात समाजाचा एक मोठा भाग असा आहे की तो नेहमी नव्याने येवू घातलेल्या प्रत्येक गोष्टीला विरोध करत असतो. १८५२ साली भारतात इंग्रजांनी पहिली रेल्वे सुरू केली तेंव्हा तिला समाजातील अनेकांनी विरोध केला. त्यांच्या पुढच्या पिढ्यांनी देखील नव्याने येणा-या गोष्टींना विरोध केला. धरणांना विरोध, हायब्रीड धान्ये व बियाणांना विरोध, कॉम्प्यूटरला विरोध, रस्त्यांना विरोध, पहिली पासून इंग्रजीला विरोध, पवन चक्क्यांना विरोध,  अणुउर्जेला विरोध,  एफ.डी.आय.ला विरोध  अशी विरोध करण्यात आलेल्या गोष्टींची कितीतरी मोठी यादी देता येईल.

आज ग्यास सिलिंडरचे भाव वाढले म्हणून ओरड करणारांचे दोन पिढ्यांपूर्वीचे पूर्वज ग्यासवर अन्न शिजवणे या प्रकारालाच विरोध करत असत. ग्यासवर शिजवलेले अन्न ते खात नसत, त्यांना चुलीवर किंवा कोळश्याच्या शेगडीवर शिजवलेलेच अन्न चालत असे. असेही लोक होवून गेलेत की  रॉकेल आणि स्टोव्ह या गोष्टी त्यांना चालत नसत. 

मला आठवते, मी जेंव्हा दुसरी-तिसरीत होतो तेंव्हा शाळेत आम्हा विद्यार्थ्यांना टाकानेच लिहिण्याची सक्ती होती. कोणी फौंटन पेनाने लिहिल्यास ते चालत नसे. का तर म्हणे टाकाने अक्षराला वळण लागते. (त्याही आधी टाकही  चालत नसत, बोरूने लिहिण्याची सक्ती असे). पुढे टाक मागे पडून फौंटन पेनचा वापर वाढला, पण  तेवढ्यात Ball Pen  हा प्रकार आला. पण आम्हाला Ball Pen वापरू देत नसत. का? पुन्हा तेच कारण. म्हणे फौंटन पेनने अक्षराला वळण लागते, Ball Pen ने अक्षर खराब होते. सगळा बिनडोकपणा.

अशा बिनडोकपणाचा कहर म्हणजे सातारा जिल्ह्यात कोयना नदीवर एक मोठे धरण बांधण्यात आल्यावर लोक त्या नदीचे पाणी पीत नसत. या धरणातील पाण्याच्या दाबाच्या शक्तीवर वीज बनवण्यात येते. धरणाला विरोध करणा-यांनी असा 'शोध' लावला की त्या धरणात कोयना नदीतल्या  पाण्यातील वीज काढून घेतलेली जाते, त्यामुळे कोयनेचे  पाणी पिण्यायोग्य नसते. धन्य ते शोधकर्ते आणि त्यांचे ऐकून 'जलत्याग' करणारी महान जनता.  

लोकांच्या अशा विकास विरोधी मानसिकतेमागे काय कारण असावे? कारण साधे-सोपे आहे. परंपरावाद हेच त्याचे मुख्य कारण आहे. या परंपरावादातूनच प्रत्येक नव्या गोष्टीला विरोध होत असतो. नवीन गोष्टी स्वीकारायच्या म्हणजे नवीन कांहीतरी शिकायला लागते, आणि नवीन कांही शिकायची बहुतांश लोकांची इच्छा नसते. मागे जेंव्हा बॅंकांचे कॉम्पुटरीकरण करण्याचे ठरले तेंव्हा बँक कर्मचा-यांनी देशव्यापी संप पुकारला. कारण दिले गेले कॉम्पुटरीकरणामुळे नोकरकपात होईल आणि देशात बेरोजगारी वाढेल. पण हे सांगायचे कारण होते, खरे कारण हेच होते की आता सगळ्यांना कॉम्प्यूटर चालवणे शिकावे लागेल. अर्थात अनेक नव्या गोष्टींच्या बाबतीत लोकांना कांहीच शिकण्याची गरज नसते, तरीही ते विरोध  करतात. कारण त्यांच्या परंपरावादी मानसिकते मुळे  त्यांना कसलेही नवीन बदल चालत नाहीत. ठेवले अनंते तैसेची रहावे. याशिवाय विरोधासाठी विरोध हा प्रकारही असतोच.

अशा मानसिकतेचे लोक हे विकासाचे मारेकरीच असतात. त्यांना कम्युनिस्ट-समाजवादी लोक खतपाणी घालतात आणि आपले राजकारण साधून घेत असतात. पण हळूहळू जनतेच्या या मानसिकतेमध्ये फरक पडत आहे ही समाधानाची गोष्ट आहे. पण परंपरावादी मानसिकतेच्या राजकारण्यांचे काय करायचे हा एक प्रश्नच आहे.


Tuesday, July 3, 2012

शारीरिक कष्टाचे कौतुक अजून किती दिवस ?

-महावीर सांगलीकर

आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपल्या शरीराची मोठ्या प्रमाणात हालचाल होणे गरजेचे असते. बौद्धिक कष्ट करणा-या लोकांच्या शरीराची हालचाल कमी प्रमाणात होत असते. त्यामुळे हे लोक आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम करतात. यात चालणे, सायकलिंग, पोहणे, जिममध्ये जाणे अशा अनेक प्रकारांचा समावेश होतो. दुसरीकडे कष्टकरी माणसांना अशा प्रकारच्या वेगळ्या व्यायामाची गरज नसते, ते आपल्या कामात दिवसभर राबत असतात, त्यातून त्यांच्या शरीराला आपोआपच व्यायाम घडत असतो.

शारीरिक कष्ट करणारे लोक गरीबी, कमी शिक्षण, बेरोजगारी अशा अनेक कारणांने कष्टाची कामे करतात. त्यांना आपल्या मुलांनीही अशाच प्रकारची कामे करावीत असे मूळीच वाटत नसते. त्यामुळे ते आपल्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात.

पण मजेची गोष्ट अशी की कांही बहुजनवादी लोक शारीरिक कष्टाचे वारेमाप कौतुक करत असतात, आणि बौद्धिक कष्ट करणा-यांच्या विरोधात बोलत असतात. त्याहूनही मजेची गोष्ट ही की, असे कौतुक करणारे लोक स्वत: मात्र शारीरिक कष्टाची कामे करत नाहीत. ते उच्चशिक्षित असतात आणि चांगल्या पगारावर एखाद्या सरकारी किंवा निमसरकारी खात्यात काम करत असतात. कांहीजण शिक्षक, प्राध्यापक असतात. अनेकजन पूर्णवेळ एखाद्या संघटनेचे काम करत असतात. असे असताना शारीरिक कष्टाचे कौतुक करण्याचा यांचा नेमका हेतू काय असतो हे तपासायला पाहिजे. बहुधा कष्टकरी समाज कायमचा कष्टकरी रहावा अशीच त्यांची इच्छा दिसते.

खरे म्हणजे माणूस हा विचार करणारा प्राणी आहे. आपले पोट भरण्यासाठी कष्टाची कामे करणे हे माणसाला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. माणसाने आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर बैल, घोडा, हत्ती यांसारख्या प्राण्यांना आपल्या काबूत आणून त्यांच्याकडून कामे करून घेतली, अजूनही घेत आहे. माणसाने ज्याप्रमाणे या प्राण्यांना आपले गुलाम करून घेतले, तसाच कांहीसा प्रकार माणसाला कष्टाची कामे करायला लावण्यात होत आहे. ही एक प्रकारची गुलामगिरी आहे. अशा गुलामगिरीचे कौतुक करणा-यांची कीव करावीशी वाटते.

'मानवाने विचार करायला पाहिजे, यंत्रांनी कामे करायला पाहिजेत' अशा अर्थाचे एक इंग्रजी वाक्य आहे. ('People should think, machines should work'). बुद्धिमान मानवाने अनेक प्रकारची यंत्रे तयार करून मानवाची कामे हलकी व सोपी केली आहेत. ही यंत्रे शोधणारे लोक विचार करणारे, आपल्या बुद्धीचा वापर करणारे होते. या आघाडीवर भारतीयांचे योगदान शून्य आहे. त्यांना कोणत्याही नवीन यंत्राचा शोध लावता आला नाही, आणि आजही परदेशी लोकांनी बनवलेल्या यंत्राची कॉपी करण्यापलीकडे त्यांची मजल गेली नाही. अनेक बहुजनवादी लोक तर यंत्र या प्रकारालाच विरोध करत राहिले. कारण काय तर यंत्रांमुळे रोजगार कमी होतील. पण खरे कारण हे नसून नवीन गोष्टींना विरोध करण्याची पारंपारिक खोड आणि कष्टक-यांनी कष्टकरीच राहावे ही त्यांची सुप्त इच्छा.

युरोपमध्ये, अमेरिकेत समाजात कष्टक-यांचे प्रमाण फार कमी आहे. याउलट भारतात ते फारच जास्त आहे. ही आशादायक गोष्ट नाही आहे. जेंव्हा भारतात कष्टक-यांची टंचाई भासू लागेल, तेंव्हाच भारतीय समाज प्रगत झाला असे म्हणता येईल.

हेही वाचा:
अभिजनांची संस्कृती आणि बहुजनवाद
माणसाला धर्माची गरज आहे काय?

महाविचार LATEST

Popular Posts This Week