सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
Showing posts with label मराठी साहित्य. Show all posts
Showing posts with label मराठी साहित्य. Show all posts

Saturday, June 30, 2012

अभिजनांची संस्कृती आणि बहुजनवाद

-महावीर सांगलीकर

कोणत्याही संस्कृतीचे अनेक घटक असतात. त्यात भाषा, धर्म, तत्वज्ञान, रीतीरिवाज, खाद्य संस्कृती, वेशभूषा, कला, संगीत वगैरे अनेक गोष्टींचा समावेश होतो. समाजातील प्रत्येक घटकाची एक संस्कृती असते आणि त्या सगळ्यांची मिळून एक कॉमन संस्कृतीही असते. बहुतेकदा समाजातील अभिजन वर्गाची संस्कृती ही त्या देशाची, त्या राज्याची संस्कृती असे मानले जाते. त्यामुळे अभिजन वर्गाची भाषा, तत्वज्ञान, रीतीरिवाज, खाद्य संस्कृती, वेशभूषा, कला, संगीत वगैरे गोष्टींना जास्त महत्व असते. ह्या वर्गाची संस्कृती ही दर्जेदार मानली जाते. त्यांच्या संस्कृतीपुढे इतरांची संस्कृती ही दुय्यम ठरते. संस्कृतीमध्ये भाषेला फार महत्व असते, आणि अभिजनांची भाषा ही प्रमाणभाषा मानली जाते. या प्रमाण भाषेचे नियमन अभिजन वर्गच करतो. भाषेच्या सहाय्याने हा वर्ग संपूर्ण समाजावर सांस्कृतिक वर्चस्व गाजवतो.

आता हा अभिजन वर्ग म्हणजे नेमका कोण? अनेक बहुजनवाद्यांचा असा समज आहे की अभिजन वर्ग म्हणजे ब्राम्हण लोक. पण अभिजन वर्गाशी जातीचा अथवा धर्माचा कांही संबंध नसतो. या वर्गात वेगवेगळ्या जातींचे व धर्माचे दर्जेदार कलाकार, संगीतकार, गायक, अभिनेते, अभिनेत्र्या, चित्रकार, लेखक, विचारवंत, बुद्धीजीवी वगैरेंचा समावेश होतो. ते सगळे आर्थिक दृष्ट्या उच्च वर्गातीलच असतात असे नव्हे, तर ते मध्यमवर्गीय आणि अगदी कनिष्ट मध्यमवर्गीय देखील असतात. तेथे गुलाम अली आणि जगजीत सिंह यांना सारखाच सन्मान मिळतो. तेथे बिस्मिल्ला खान आणि ए. आर. रेहमान यांचेही कौतुक होते. या क्षेत्रात कसलेही आरक्षण नसते, राखीव जागा नसतात. प्रत्येकजन आपल्या गुणांच्या जोरावर पुढे जात असतो. हे लोक स्पर्धेला घाबरत नाहीत.

महाराष्ट्रात अभिजन वर्गात ब्राह्मणांचे प्रमाण थोडे जास्त दिसत असले तरी तिथे इतर समाजातील लोकही भरपूर आहेत. पण बहुजनवादी लोक अभिजन वर्गाला ब्राम्हणवादी मानतात, आणि सगळ्याच अभिजात गोष्टीपासून फटकून वागतात. त्यांचे हे वागणे त्यांनाच नुकसानकारक ठरले आहे.

अभिजन वर्गात आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतरभाषिक लग्नांचे प्रमाण मोठे असते, याउलट बहुजनवादात जातीअंताच्या लढाईची भाषा करत जाती कशा संघटीत आणि मजबूत होतील हेच पाहिले जाते.

अभिजन वर्गाला जातीशी कांही देणे-घेणे नसते. पण बहुजन समाजातील लोक त्यांच्या जातीची एखादी व्यक्ती अभिजन वर्गात प्रसिद्ध असेल तर ते मोठ्या अभिमानाने त्या व्यक्तीचे कौतुक करत बसतात, पण या लोकांना त्या व्यक्तीच्या कलेशी, निर्मितीशी कसलेही देणे-घेणे नसते, कारण त्यांना त्यातले कांही कळत नसते.

बहुजनवादी लोक अभिजनांच्या संस्कृतीला ब्राम्हणी संस्कृती ठरवून तिला नावे ठेवत आपल्या संस्कृतीचे कौतुक करत बसतात, या तथाकथित ब्राम्हणी संस्कृतीला संपवण्याच्या बाता करतात, पण संस्कृतीमध्ये भर पडेल अशी कोणतीही निर्मिती करत नाहीत. साधे साहित्याचे उदाहरण घ्या. मराठी साहित्यात शेकडो विषयांवर हजारो दर्जेदार पुस्तके लिहिली जातात. ही पुस्तके मुख्यत्वे अभिजात वर्गातील लेखकांकडून लिहिली जातात. या पुस्तकांत अर्थशास्त्रापासून प्रवासवर्णनापर्यंत, खगोलशास्त्रापासून डार्विनच्या सिद्धांतापर्यंत, साहित्यशास्त्रापासून समीक्षेपर्यंत, गांधीपासून हिटलर पर्यंत अनेक विषयांची पुस्तके असतात. दुसरीकडे बहुजनवादी लोकांकडून कोणत्या प्रकारची साहित्य निर्मिती होते हे आपण पहातोच. ते केवळ आपल्या जातीचा इतिहास, आपल्या जातीच्या एखाद्या व्यक्तीचे चरित्र आणि फारतर फुले-शाहू-आंबेडकर या विषयांभोवतीच फिरत असतात. हे लिखाणही फारसा अभ्यास न करता, पुस्तक कसे असू नये याचे मापदंड स्थापन करत लिहिलेले असतात.

खरे म्हणजे बहुजनवाद्यांकडून अभिजात गोष्टींच्या निर्मितीची अपेक्षा धरणे हेच मुळात चुकीचे आहे. कारण पहिली गोष्ट म्हणजे त्यांना उत्कृष्ट दर्जाचे काय असते हेच मुळात कळत नाही, मग ते संगीत असो, साहित्य असो कि कला असो. मी अनेक असे बहुजनवादी लोक बघितले आहेत की ज्यांना चांगल्या दर्जाचे साधे विनोदही कळत नाहीत. त्यांना आवडणारे आणि कळणारे विनोद प्रामुख्याने लैंगिक अवयवांशी संबधित असावे लागतात.

अभिजन वर्गाला समाजातील उपेक्षितांबद्दल कणव असते आणि आपल्या परीने ते उपेक्षितांच्या उन्नतीसाठी शक्य ती मदत करतात. याउलट बहुजनवादी लोक बहुजन समाजात अभिजन वर्गाविषयी द्वेष पसरवण्याचे काम करत असतात.

एक छोटेसे उदाहरण देवून मी हा लेख पूर्ण करतो. ज्यांना गांधीजी आवडत नाहीत असे बहुजनवादी लोक त्यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जावून, एकेरी उल्लेख करत त्यांची बदनामी करत असतात. याउलट अभिजन वर्गातील ज्या लोकांना गांधी तत्वज्ञान रुचत नाही, ते देखील गांधीजींचा आदरार्थीच उल्लेख करतात. ज्याच्याशी मतभेद असतात त्याला शत्रू मानणे हे अभिजातांच्या संस्कृतीत बसत नाही. याउलट आपल्या संस्कृतीचे गोडवे गाणारे बहुजनवादी लोक थोडेसे कुणाशी मतभेद झाले की त्यांना आपले शत्रू घोषित करतात.

हाच फरक आहे अभिजात संस्कृतीत आणि बहुजनवादात.

हेही वाचा:
बहुजनवाद: शिक्षणबंदीचे सत्यशोधन
धर्म आणि विज्ञान
कोण म्हणतय श्रीमंत लोक क्रांती करू शकत नाहीत?
माणसाला धर्माची गरज आहे काय?

महाविचार LATEST

Popular Posts This Week