सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
Showing posts with label डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. Show all posts
Showing posts with label डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. Show all posts

Friday, September 7, 2012

मेकर्स ऑफ युनिव्हर्स......................

-महावीर सांगलीकर

नासामधील ५० टक्के शास्त्रज्ञ हे भारतीय आहेत.......नासाने केली २००० संस्कृत तज्ञाची नेमणूक......गौतम बुद्ध, महावीर, अशोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ऑक्सफोर्ड युनिव्हर्सीटीने मेकर्स ऑफ युनिव्हर्स जाहीर केले.... या तीन गोष्टी आपल्या कानावर आल्याच असतील. या तीन गोष्टीत एक मोठे साम्य आहे, त्या म्हणजे या निव्वळ अफवा आहेत. यातील पहिल्या दोन अफवा सोडणारे आणि तिसरी अफवा सोडणारे लोक वेगवेगळ्या गटातले आहेत एवढाच काय तो फरक.

आपण नासाच्या वेबसाईटवर जावून सर्च केल्यास तेथे भारतीय शास्त्रज्ञ मोठ्या प्रमाणावर तर सोडाच, छोट्या प्रमाणावर देखील सापडणार नाहीत. तसेच नासाने संस्कृत तज्ञांची नेमणूक केल्याची बातमीही तेथे सापडणार नाही. पण अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला अनेक भारतीय वेबसाईट्स वाचायला मिळतील. कांही दैनिकांच्या वेब साईट्सनी देखील अशा बातम्यांची शहानिशा न करता त्या प्रकाशित केलेल्या दिसतात. या खोट्या बातम्यांचे निर्माते अर्थातच 'उजव्या' विचारसरनीचे लोक असतात.

वर दिलेल्या अफवांपैकी तिसरी अफवा 'गौतम बुद्ध, महावीर, अशोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ऑक्सफोर्ड युनिव्हर्सीटीने मेकर्स ऑफ युनिवर्स जाहीर केले' ही देखील अशीच मजेशीर आहे. मेकर्स ऑफ युनिवर्सच्या जगातील शंभर लोकांच्या यादीत हे चार जण आहेत, तेही पहिल्या चार स्थानांवर. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सीटीची ही बातमी तिच्या वेबसाईटवर कोठेच नाही. पण वरील दोन अफवांप्रमाणे ही अफवा देखील अनेक भारतीय वेबसाईट्स आणि इंटर नेटवरील कांही भारतीय वर्तमान पत्रे यांनीच प्रकाशित केली आहेत. या बातमीचा निर्माता बहुजनवाद्यांचा एक गट आहे.

ऑक्सफोर्ड किंवा इतर कोणत्याही पाश्च्यात युनिव्हर्सीटीने १०० मेकर्स ऑफ युनिवर्स जाहीर केले तर त्यात पहिल्या चार स्थानात येशू ख्रिस्त, महमद पैगंबर, महात्मा गांधी या तिघांची नावे हमखास येतील. गौतम बुद्ध, महावीर, अशोक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महान असले तरी आणि १०० लोकांच्या यादीत समावेश होण्यासारखे असले तरी ते पहिल्या चार स्थानावर येवू शकत नाहीत, कारण त्यांचा जागतिक प्रभाव फारसा नाही. अफवा सोडणा-यांनी शंका येवू नये म्हणून यात महावीरांचे नाव घुसडलेले दिसते, पण या चौघांना पहिले चार ठरवून शंकेला जागा ठेवली.

उजव्या विचारसरनीचे काय किंवा बहुजनवादी काय, असल्या अफवा का सोडतात? तर त्याचे कारण असे आहे की त्यांना आपला इगो कुरवळायचा असतो. त्यांच्यामध्ये हा इगो न्यूनगंडातून तयार झालेला असतो. ज्या गोष्टी प्रत्यक्षात येवूच शकत नाहीत, त्यांची ते स्वप्ने बघतात. आपले स्वप्न पुरे होवू शकणार नाही हे त्यांना आधी पासूनच माहीत असते, त्यामुळे कोणत्या तरी एका क्षणी ते अफवांचा आश्रय घेतात. मग या अफवा त्या त्या गटाच्या अनुयायांमध्ये वा-यासारख्या पसरत जातात. अनुयायीच ते, कसलीही शहानिशा न करता ते अशा अफवांवर डोळे झाकून विश्वास ठेवतात, तिचा प्रचारही करत सुटतात. कारण ती अफवा नसून बातमी आहे असेच त्यांना वाटते.

हेही वाचा:
वैचारिक विकासातील मानसिक अडथळे
चिकित्सा नको असणारे लोक
सुनीताची गगनभरारी आणि भारतीयांची मानसिकता
वैचारिक विकासातील मानसिक अडथळे

Friday, August 31, 2012

चिकित्सा नको असणारे लोक

-महावीर सांगलीकर

माझा भारतीय घटनेचे शिल्पकार........... हा लेख माझ्या महाविचार या ब्लॉगवर प्रकाशित झाल्यावर आणि त्याची लिंक मी माझ्या फेसबुकवर टाकल्यावर हा लेख केवळ दोन दिवसात एक हजार पेक्षा जास्त वाचकांनी वाचला. या लेखावर फेसबुक आणि ब्लॉग या दोन्ही ठिकाणी अनेक उलट सुलट प्रतिक्रिया आल्या. लेखाच्या विरोधात ज्या प्रतिक्रिया आल्या, त्यात विचारपूर्वक लिहिलेल्या, मी मांडलेल्या मुद्यांचे सभ्य भाषेत खंडण करणा-या प्रतिक्रिया फारच कमी होत्या. या उलट बहुतेक प्रतिक्रिया या शिवीगाळ करणा-या, धमक्या देणा-या होत्या. अशा प्रतिक्रिया देणारे स्वत:ला डॉक्टर आंबेडकरांचे आणि बौद्ध धर्माचे अनुयायी म्हणवून घेतात याची त्यांना नसली तरी मला लाज वाटते.

गंमत म्हणजे वयाने कमी असणारे लोक, म्हणजे पोरे-टोरे खालच्या दर्जाला जावून प्रतिक्रिया देतात, तेंव्हा त्यांना संस्काहीन म्हणून त्यांच्याकडे एकवेळ दुर्लक्ष करता येते, पण या लेखावरील प्रतिक्रियांच्या बाबतीत सांगायचे तर वयाने आणि शिक्षणाने वाढलेली कांही मंडळी खालच्या दर्जाला गेलेली दिसली. यात एक स्वत:ला उद्योजक म्हणवून घेणारा आणि एक प्रोफेसरही होता. हे लोक फारच दांभिक आहेत असे मला दिसून आले. यांच्या कंपूतील कांही लोक महात्मा गांधी, नेहरू आणि अगदी छ. शिवाजी महाराज यांची निंदा-नालस्ती करत असतात, पण कोणी अगदी सभ्य भाषेत भारतीय घटनेची आणि डॉक्टर आंबेडकर यांची चिकित्सा करायला लागले तर अक्षरश: पिसाळतात. अर्थात त्यांचे पिसाळणे आणि शिवीगाळ करणे या गोष्टी त्यांच्या पराभवाची लक्षणे आहेत. मुद्दे खोडता आले नाहीत तर कांही लोक गुद्यांची भाषा बोलू लागतात.

मागे मी याच ब्लॉगवर या कंपूतील डॉक्टर विनोद अनाव्रत यांनी लिहिलेल्या शिवाजीचे उदात्तीकरण: पडद्यामागचे वास्तव या पुस्तकाचे परीक्षण लिहिले होते, व ते फेसबुकवर प्रमोटही केले होते. छ. शिवाजी महाराजांविषयी अत्यंत तुच्छता पूर्वक भाषेत लिहिलेल्या या पुस्तकाचा, त्याच्या लेखकाचा किंवा प्रकाशकाचा सध्या माझ्यावर तुटून पडलेल्या या कंपूतील एकाही महाभागाने निषेध केला नाही, किंवा त्याचे खंडन केले नाही. कारण एकच. त्या पुस्तकाचा लेखक व प्रकाशक 'त्यांचा' माणूस आहे.

त्यांना जर डॉक्टर आंबेडकर, बौद्ध धर्म वगैरेची चिकित्सा होणे मान्य नसेल तर त्यांनी अगोदर इतरांची चिकित्सा करणे बंद केले पाहिजे.

माझ्या भारतीय घटनेचे शिल्पकार........... या लेखावर जे प्रमुख आक्षेप आहेत त्यांची उत्तरे मी पुढील लेखात देत आहे.

Tuesday, August 28, 2012

भारतीय घटनेचे शिल्पकार...........

-महावीर सांगलीकर


कांही लोक भारतीय घटनेच्या निर्मितीचे संपूर्ण श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देत आहेत. त्यांना भारतीय घटनेचे एकमेव शिल्पकार म्हणून गौरवत आहेत. भारतीय घटनेऐवजी ती कोणी लिहिली याचेच कौतुक होत आहे.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्वान होते, त्यांनी भारतीय घटनेच्या निर्मितीत आपले योगदान दिले, या गोष्टी खऱ्याच आहेत, पण त्यांचे अंधभक्त घटना निर्मितीचे सर्व श्रेय बाबासाहेबांना देवून, त्यांना घटनेचे शिल्पकार ठरवून घटनेचा, घटना समितीचा आणि खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मोठा अपमान करत आहेत.

भारतीय घटनेमध्ये कोठेही बाबासाहेबांचा उल्लेख घटनेचे शिल्पकार म्हणून केला गेलेला नाही, आणि बाबासाहेबांनीही स्वत:ला कधीच भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणवून घेतले नाही.

भारतीय घटनेचे शिल्पकार कोण?
मग भारतीय घटनेचे शिल्पकार कोण? असा प्रश्न आपल्या मनात आला असेल. भारतीय घटनेची निर्मिती हे एक टीम वर्क होते. भारताची घटना तयार करण्यासाठी घटना समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे त्या समितीचे सगळेच सभासद भारतीय घटनेचे शिल्पकार ठरतात.

संविधान सभेमध्ये एकूण 299 सभासद होते. हे सभासद भारताच्या वेगवेगळ्या भागातून अप्रत्यक्ष मतदानाद्वारे निवडून आले होते. हे सभासद कोणी सोमेगोमे नव्हते, तर पंडित जवाहर लाल नेहरू, सरदार वल्लभ भाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, मौलाना आझाद, चक्रवर्ती राजगोपालाचारी, टी.टी. कृष्णम्माचारी, जगजीवन राम यांच्या सारखे अनेक दिग्गज होते. हे सभासद उच्च शिक्षित होते आणि  त्यातील बरेचजण तर इंग्लंड- अमेरिकेत शिकले होते.

9 डिसेंबर 1946 ते 26 नोव्हेंबर 1949 या सुमारे तीन वर्षाच्या काळात या घटना समितीची एकूण 11 अधिवेशने झाली. 24 जानेवारी 1950 रोजी घटनेच्या मसुद्यावर या सभासदांच्या सह्या झाल्या आणि 26 जानेवारी 1950रोजी ही घटना लागू झाली.

घटना समितीच्या एकूण 17 उपसमित्या होत्या. संपूर्ण घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. तसेच ते चार उपसमित्यांचेही अध्यक्ष होते. राज्यांच्या अधिकार विषयक समिती, केंद्राच्या अधिकारांविषयी समिती आणि केंद्रीय घटना समिती या अतिशय महत्वाच्या तीन समित्यांचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू हे होते, तर मूलभूत अधिकार, अल्पसंख्याक व आदिवासी विषयक महत्वाच्या समितीचे अध्यक्ष सरदार वल्लभ भाई पटेल हे होते.

घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. या समितीत एकूण 9 सभासद होते. या मसुदा समितीचे काम घटनेचा कच्चा मसुदा तयार करणे हा होता. त्याप्रमाणे मसुदा समितीने तो तयार करून घटना समितीकडे दिला. घटना समिती मध्ये त्यातील प्रत्येक मुद्यावर चर्चा होवून तब्बल 2000 दुरुस्त्या सुचवण्यात आल्या आणि त्याप्रमाणे बदल करण्यात आला.

डॉक्टर बाबासाहेबांचे कांही अंधभक्त असा प्रचार करत असतात की बाबासाहेबांनी ही  घटना बौद्ध धर्मानुसार लिहिली आहे. पण तसे कांही नसून भारतीय घटना ही प्रामुख्याने इंग्लंडची संसदीय लोकशाही प्रणाली आणि बऱ्याच प्रमाणात अमेरिका, फ्रांस आणि कॅनडाची घटना यांना आधार मानून तयार करण्यात आलेली आहे. महत्वाचे म्हणजे भारतीय घटना ही इंग्रजांनी 1935 साली लागू केलेल्या इंडिया अॅक्टचीच पुढची 'आवृत्ती' आहे.

कोणतेही मोठे काम हे एक टीम वर्क असते. पण भारत हा व्यक्तिपूजक लोकांचा देश असल्याने कोणत्याही कामाचे श्रेय टीमला न देता एखाद्या व्यक्तिला देण्याची येथील अनेक लोकांना खोड आहे.  भारतीय घटनेच्या निर्मितीचे श्रेय एकाच व्यक्तिला द्यायचेच असेल तर ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना द्यावे लागेल, कारण ते पूर्ण घटना समितीचे अध्यक्ष होते.

बाबासाहेबांना घटनेचे एकमेव शिल्पकार म्हणणे हे चुकीचेच आहे. ते अनेक शिल्पकारांपैकी एक होते असे म्हणायला हरकत नाही. पण ते मुख्य शिल्पकार नव्हते हेही लक्षात ठेवायला पाहिजे.




हेही वाचा:
चिकित्सा नको असणारे लोक

महाविचार LATEST

Popular Posts This Week