सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
Showing posts with label मराठा समाज. Show all posts
Showing posts with label मराठा समाज. Show all posts

Monday, May 5, 2014

प्रेम, लग्न आणि कुटुंबसंस्था

-महावीर सांगलीकर



अनेक लोक आंतरजातीय लग्ने झाली तर जातीव्यवस्था मोडेल अशा भ्रमात वावरत आहेत. प्रत्यक्षात अशा लग्नांमुळे जाती मोडत तर नाहीतच, उलट दोन जातीमधला तणाव वाढतो. ज्या लोकांनी आंतरजातीय लग्ने केली आहेत त्यांनी आपल्या मुलांना बापाची जात दिलेलीच असते, असे दिसून येते. क्वचित अपवाद असू शकतात. कोणी कितीही नाकारले तरी प्रत्येक जातीची स्वत:ची अशी संस्कृती असते, विचारसरणी असते आणि एक विशिष्ट सामाजिक दर्जाही असतो. 

आपल्या येथे होणारी लग्ने ही दोन व्यक्तींमध्ये होत नसतात, तर दोन कुटुंबामध्ये होत असतात. सुशिक्षित, शहरी कुटुंबांमध्ये इतर जातीतील, अगदी इतर धर्मातील सून किंवा जावयाचा स्वीकार होवू शकतो. पण इथे देखील ती सून किंवा तो जावई शक्यतो आपल्याच दर्जाचा असावा लागतो. ज्यांना आंतरजातीय लग्ने करायचीच आहेत त्यांनी या गोष्टींचे भान ठेवले पाहिजे. जी सून किंवा जावई आई-वडीलांना मान्य नाही, आणि तरीही असे लग्न करायचेच असा ज्यांचा हट्ट आहे, त्यांनी आपल्या घरात होणा-या कलहाला तयार राहिले पाहिजे, किंवा मग त्यांनी आपले कुटुंब सोडून आपल्या जोडीदारास घेवून वेगळे रहाण्यास तयार व्हायला पाहिजे.

ज्यांना वाटते की जातीव्यवस्था फक्त हिंदू धर्मातच आहे, किंवा फक्त भारतातच आहे, ते भ्रमातच असतात. प्रत्यक्षात ती वेगवेगळ्या रूपात जगभर दिसून येते. जाती मोडणे हे भ्रष्टाचार संपवण्यापेक्षाही अवघड आहे. तरीही उच्च वर्गात जाती व्यवस्थेची प्रखरता संपुष्टात आलेली दिसते. किंबहुना उच्च वर्गातील लोकांनी जातीव्यवस्थेची वात लावलेली दिसते. पण जाती मोडण्याच्या बतावण्या करणारे निम्न वर्गीय लोक उच्च वर्गीयांना शिव्या देण्यातच धन्यता मानतात. त्यांना खरेच जाती मोडायच्या असतील तर त्यांनी आधी निम्न वर्गातून उच्च वर्गात यायला पाहिजे. जात्यांतर करता येत नसले तरी वर्गांतर करणे शक्य असते.

हे कसले प्रेम?
अजून ज्यांना मिशाही आल्या नाहीत अशी कांही पोरे एखाद्या मुलीला बघून भाळतात आणि कसलाही विचार न करता त्या मुलीच्या मागे लागतात. यातून पुढे प्रश्नच प्रश्न तयार होतात. एखादी मुलगी आवडली म्हणून तिच्यावर आंधळे प्रेम करण्याआधी मुलांनी आपली लायकी तपासून घ्यायला पाहिजे. मुळात हे प्रेम आहे की शारीरिक आकर्षण आहे, खरेच प्रेम असेल तर आपण त्या मुलीला न्याय देवू शकतो का, असे प्रेम आपल्या घरच्यांना, मुलीच्या घरच्यांना, समाजाला मान्य आहे का अशा अनेक गोष्टींचा मुलांनी विचार करायला पाहिजे. असा विचार करायचा नसेल तर परिणाम भोगण्याची तयारी देखील ठेवली पाहिजे. माझे हे म्हणणे मुलींना देखील लागू आहे. एखादी बंगल्यात राहणारी सुशिक्षित मुलगी ड्रायव्हर बरोबर पळून जाते, तेंव्हा पुढे काय होते? त्या मुलीच्या आयुष्याचे वाटोळे तर होतेच, पण तिच्या आई-वडीलांच्या प्रतिष्ठेला देखील धक्का बसतो.

ज्यांना प्रेम करायचेच आहे, त्याने आपला जोडीदार पूर्ण विचार करूनच निवडला पाहिजे. 


नवा लव्ह जिहाद?
कांही अतिरेकी लोक आमच्या समाजावर गेली हजारो वर्षे उच्च जातीयांनी अन्याय केला म्हणून त्यांचा बदला घ्यायच्या गोष्टी करत आहेत. त्यातील कांहीजण उघडपणे बोलतात की आपण उच्च जातीयांच्या पोरी पळवून न्यायला पाहिजेत. असे कांही झाल्यास उच्च जातीय गप्प बसतील या भ्रमात कोणी रहात असतील तर ते मूर्ख आहेत. क्रियेला प्रतिक्रिया ही होणारच. महाराष्ट्रात अलीकडे झालेल्या कांही प्रतिक्रिया आपण बघतोच. कांही धूर्त लोक या प्रकारचे निमित्त करून मराठा समाजास टार्गेट करत आहेत. ही देखील चुकीचीच गोष्ट आहे. मराठाच काय, कोणताही समाज जर त्यांच्या मुलींची छेड काढली गेली तर गप्प बसत नसतो.

हा नवा लव्ह जिहाद वाढत गेला तर महाराष्ट्रातील सामाजिक कलह देखील वाढत जाईल, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.


Sunday, November 18, 2012

राष्ट्रवादी जातीयवाद आता मराठ्यांनीच गाडावा ......

-महावीर सांगलीकर 


गेल्या लोकसभा-विधानसभा निवडणूकीत राष्ट्रवादी पक्षाने आपल्या कुजबूज मोहिमेतून आणि मराठा मतदारांना SMS पाठवून जातीय द्वेष पसरवण्याचा उद्योग केला होता. खानदेशात 'द्या टाळी हाकला माळी', मराठवाड्यात 'वाजवा तुतारी हाकला वंजारी' आणि दक्षिण महाराष्ट्रात 'भगवा पाहिजे का नागवा पाहिजे' असे SMS मोठ्या प्रमाणावर पाठवले गेले.

शरद पवार हे राष्ट्रवादी  पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. नेहमी 'फुले-शाहू-आंबेडकर' या नावांचा जप करणारे शरद पवार यांनी नुकतेच आपले जातीयवादी रूप दाखवले. त्यांनी उस आंदोलन करणा-या राजू शेट्टी या शेतकरी नेत्याची जात काढण्याचा उद्योग केला. त्यांच्या या उद्योगाचा सगळीकडे प्रचंड निषेध करण्यात आला. अनेक ठिकाणी शरद पवारांचे  पुतळे जाळण्यात आले. कांही ठिकाणी त्यांना चपलांचा हार घालण्यात आला. पूर्वी त्यांनी दुसरे एक शेतकरी नेते शरद जोशी यांचीही जात काढली होती. त्यावेळी पवारांचा फारसा निषेध झाला नव्हता, पण आत्ताचे त्यांचे विधान त्यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.

राष्ट्रवादी पक्ष पश्चिम महाराष्ट्रात बलशाली आहे, आणि नेमका याच भागात या पक्षाच्या जातीयवादी राजकारणास उत आला आहे. याच पक्षाचे एक मंत्री जयंत पाटील यांच्यावरही जातीयवादाचे आरोप होत आले आहेत.

राष्ट्रवादी पक्षाच्या या जातीयवादी उद्योगामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज उगीचच बदनाम होत आहे. कारण राष्ट्रवादी पक्ष हा मराठ्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. ब्राम्हण समाज मराठ्यांपासून पूर्वीच दूर गेला आहे, पण राष्ट्रवादी पक्षामुळे आता उरलेले सगळेच समाज मराठा समाजापासून दूर होत चालले आहेत. त्यात माळी, धनगर, वंजारी असे मोठे समाज तर आहेतच, पण आता दलित समाजानेही मराठ्यांपासून फारकत घेतली आहे. लिंगायत, जैन, भटके-विमुक्त, आदिवासी, बलुतेदार हेही मराठा समाजापासून तुटत चालले आहेत. मराठा समाजाच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब आहे. 'सगळ्यांना सांभाळून घेणारा' अशी मराठा समाजची प्रतिमा नष्ट होत चालली आहे, आणि 'जातीयवादी समाज' ही प्रतिमा या तिची जागा घेत आहे.

खरे म्हणजे मराठा समाजाने राष्ट्रवादी पक्षाबद्दल कसलीही आपुलकी बाळगण्याचे कारण नाही. कांही ठराविक धनदांडगी घराणी म्हणजे संपूर्ण मराठा समाज नव्हे.  या पक्षात सामान्य मराठा समाजाला कसलेही स्थान नाही.  या पक्षाने मराठा समाजातील सामान्य लोकांच्या भल्यासाठी आजपर्यंत कसलेही काम केले नाही, त्यांचा उपयोग फक्त मते मिळवण्यासाठीच केला आहे.

त्यामुळे  मराठा समाजाने आपली बिघडलेली प्रतिमा सुधारण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्ठी देणे आवश्यक आहे.  शेतकरी मराठ्यांची पावले त्या दिशेने पडत आहेत हे एक चांगले चिन्ह आहे. शेतक-यांना अनेक गोष्टी लवकर कळतात, इतरांना  त्या कळायला ब-याचदा उशीर लागतो, हेच यावरून दिसून येते. तसेही राष्ट्रवादी पक्ष हे एक बुडते जहाज आहे, आणि या बुडत्या जहाजावरच रहाण्यात कांही अर्थ नाही.

हेही वाचा:  
मराठ्यांची चार शक्तिस्थळे

Friday, June 8, 2012

मराठ्यांची चार शक्तिस्थळे

-महावीर सांगलीकर

मागे ब-याच वर्षांपूर्वी एका प्रसिद्ध लेखकाने महाराष्ट्रातून मराठ्यांची सत्ता लवकरच जाणार या अर्थाचे भाकीत करणारा एक लेख लिहिला होता. महाराष्ट्रातील कांही, नव्हे अनेक लोकांना महाराष्ट्रातून मराठ्यांची सत्ता जावी असे मनापासून वाटत असते. पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणे अतिशय अवघड आहे, किंबहुना मराठ्यांशिवाय महाराष्ट्राचे राजकारण आणि समाजकारण या गोष्टी केवळ अशक्य आहे. यामागे अनेक कारणे आहेत. मराठा समाज सत्ताधारी आणि शक्तिशाली आहे. त्याची कांही शक्तिस्थळे आहेत. अशी शक्तिस्थळे महाराष्ट्रातील इतर कोणत्याच समाजाकडे नाहीत. काय आहेत ही शक्तिस्थळे?

मराठ्यांची संख्या
महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येत मराठ्यांची टक्केवारी किती आहे याविषयी मतभेद आहेत. खुद्द मराठा समाज आपल्या समाजाची लोकसंख्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त आहे असे मानतो, तर मराठाविरोधी मानसिकता असणारे लोक ही संख्या फारतर २२ टक्के असावी असे म्हणतात. ते कांहीही असले तरी मराठा समाज इतर कुठल्याही समाजापेक्षा संख्येने जास्त आहे ही गोष्ट नक्की आहे. तो किमान ४० टक्के तरी असावा. भारताच्या कोणत्याही राज्यात लोकसंख्येचा एवढा मोठा भाग असणारा दूसरा समाज नसावा. मराठ्यांची ही मोठी संख्या हे त्यांचे सगळ्यात मोठे शक्तिस्थळ आहे. वर उल्लेख केलेल्या लेखकाने असे म्हंटले होते की महाराष्ट्रातील माळी, धनगर आणि वंजारी हे समाज एकत्र आले तर त्यांची लोकसंख्या मराठ्यांच्यापेक्षा जास्त होते, त्यामुळे ते एकत्र आले तर महाराष्ट्रातून मराठ्यांची सत्ता जावू शकते. पण ही तर जर-तरची भाषा झाली. पहिली गोष्ट म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी यांची एकत्रित संख्या मराठ्यांच्या पेक्षा जास्त असेल तर आणि आपण ती किमान ४५ टक्के आहे असे गृहीत धरले तर या चार समाजांची एकत्रित संख्या ८५ टक्के आहे असे मानावे लागेल. त्यात १२ टक्के मुस्लीम लोकसंख्या मिळवली की एकूण बेरीज ९७ टक्के होते. उरलेल्या तीन टक्के लोकसंख्येत ख्रिश्चन, जैन, बौद्ध, बौद्धेतर दलित, ब्राम्हण, लिंगायत, कुणबी, बलुतेदार जाती, आदिवासी आणि इतर शेकडो समूहांना बसवावे लागेल. याचाच अर्थ असा आहे की माळी, धनगर आणि वंजारी यांची एकत्रित संख्या फार मोठी आहे ही गोष्ट खोटी आहे.

आता राहिली गोष्ट माळी, धनगर आणि वंजारी यांनी एकत्रित येण्याची. भारतीय जातीव्यवस्थेचे स्वरूप बघितले तर अशा वेगवेगळ्या जाती एकत्र येवून राजकारण करतील ही गोष्ट अशक्य कोटीतील आहे. जिथे एकाच जातीच्या उपजाती एकत्र येण्याची मारामार, तिथे अशा वेगवेगळ्या जाती एकत्र कशा येणार? शिवाय एकगठ्ठा मराठा समाजाशी वेगेवगळ्या जातींनी एकत्र येवून स्पर्धा करणे आणि ती जिंकणे हेही अशक्यच आहे.

मराठ्यांचे नेटवर्क
मराठ्यांचे दुसरे मोठे शक्तीस्थळ म्हणजे त्यांचे जबरदस्त नेटवर्क. मराठा समाज महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, खेड्या-पाड्यांमध्ये मोठ्या संख्येने आहे. हा समाज एकमेकांशी साखळी पद्धतीने जोडला गेलेला आहे. या नेटवर्कचे प्रचंड फायदे या समाजाला राजकारणात आणि इतरही क्षेत्रात मिळत असतात. इतर समाज महाराष्ट्रभर पसरलेले नसल्याने त्यांचे ऑल महाराष्ट्र नेटवर्क तयार होवू शकत नाही. ज्यांचे होवू शकते त्यांची संख्या राजकारणाच्या दृष्टीने नगण्य आहे.

मराठ्यांची सत्तेची परंपरा
मराठा समाजाचे तिसरे मोठे शक्तिस्थळ म्हणजे त्यांना असलेली सत्तेची परंपरा. ही परंपरा अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अगोदरपासून चालत आली आहे. या परंपरेमुळे मराठा समाजाला गावपातळीपासून देशपातळीपर्यंत सत्ता सांभाळण्याचा शेकडो वर्षांचा अनुभव मिळाला आहे. अर्थातच या अनुभवाचा फायदा त्यांना मिळत आला आहे. या परंपरेमुळे मराठा समाजाकडे सर्वांना सांभाळून घेण्याची वृत्ती आली आहे, नेत्यांकडे संयम, मोजके आणि नेमके बोलणे, धडाडी, लोकसंग्रह करण्याचे वृत्ती यासारखे अनेक गुण आले आहेत.

सहकार चळवळ
मराठा समाजाचे चौथे मोठे शक्तिस्थळ म्हणजे त्यांची सहकार चळवळ. या समाजाने सहकार चळवळ गावोगावी नेली. त्यांनी अनेक सहकारी बँका, सहकारी साखर कारखाने, पतसंस्था, दूध डेअ-या काढल्या. इतर समाज सहकारी क्षेत्रात मराठ्यानएवढे काम करू शकले नाहीत. याचा राजकीय फायदा मराठा समाजाला नेहमीच होत राहिला.

आज मराठा समाजावर उघडपणे किंवा कुजबूज मोहिमेतून टीका करणा-यांची संख्या वाढत चालली आहे. पण त्याचा फारसा कांही उपयोग होणार नाही. कारण मराठ्यांची ही शक्तीस्थळे त्यांना पुढील काळातही राजकीय फायदा देत रहाणार आहेत. शिवाय इतर कोणत्याही समाजाकडे अशी शक्तीस्थळे नाहीत आणि ती मिळवणे ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे.

महाराष्ट्रातील कोणताही पक्ष मराठ्यांशिवाय चालू शकत नाही. ज्या पक्षात मराठ्यांना प्रतिनिधित्व नाही, त्यांची काय अवस्था आहे हे आपण पहातोच (आठवले का, कोणते ते पक्ष?). दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाला मराठाविरोधी लोक मराठ्यांचा पक्ष म्हणून संबोधतात, पण प्रत्यक्षात हे दोन्ही पक्ष सर्व समावेशक आहेत. मराठ्यांना त्यात जास्त प्रतिनिधित्व आहे असे दिसते, पण ते त्यांच्या लोकसंख्येतील टक्केवारीला अनुसरूनच आहे. या पक्षांचे नेते मराठा या जातीचे नेते नसून सगळ्यांचे नेते आहेत, याउलट इतर पक्षांचे नेते त्यांच्या जातीचे नेते असल्याप्रमाणे वागत असतात.

Wednesday, February 2, 2011

मराठ्यांचे आपल्या प्राचीन इतिहासाकडे दुर्लक्ष | Marathas Ignored Their Ancient History


मराठा समाजाला शिवाजी महाराजांच्या अगोदरही हजारो वर्षांचा इतिहास आहे. खुद्द  मराठा  या  शब्दालाच  किमान दोन हजार वर्षांचा इतिहास आहे.

महाराष्ट्रा वर आणि संपूर्ण भारतावर राज्य करणारे यादव, मौर्य, कदंब, चालुक्य, गंग, राष्ट्र्कूट, होयसळ, शिलाहार, चव्हाण हे मराठ्यांचेच पूर्वज होते, आणि या प्रत्येक घराण्यात कित्येक महापराक्रमी, प्रजाहितदक्ष आणि ज्यांची नोंद युरोपिअन इतिहासकारांनी देखील घेतली आहे असे राजे झाले आहेत. पण खेदाची गोष्ट ही आहे की मराठ्यांना आपल्या त्या महान पुर्वजांविषयी कांहीही माहीती नाही. माहिती करून घेण्याची इच्छाही दिसत नाही.


 जिजाऊ ज्या यादव घराण्यात जन्माला आल्या, त्या घराण्याला किमान तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. जिजाऊंना आई म्हणण्याऐवजी आऊ हा कन्नड संबोधन का वापरले जाते याचा काय इतिहास आहे याचा मराठ्य़ांनी कधी विचार केला आहे काय? वेरूळची जगप्रसिद्ध लेणी बांधणारे मराठे होते, राणी चेन्नम्मा ही मराठा होती हे किती मराठ्यांना माहित आहे?

ज्या मौर्य घराण्यात चंद्रगुप्त मौर्य, अशोक, संप्रती असे महान सम्राट झाले, ज्या घराण्याने वैदिक धर्म हद्दपार केला, ते मराठ्यांचे पूर्वज होते पण मराठ्यांना ना त्यांचा अभिमान आहे, ना कांही माहिती.

मराठे आजही शिवकालातून बाहेर पडायला तयार नाहीत. त्यांना शिवकालात गुंतवून ठेवणे ही ब्राम्हणांची गरज होती. ब्राम्हणांना मुस्लीमद्वेष पसरवण्यासाठी शिवाजी महाराजांचा जसा उपयोग करता आला, तसा प्राचीन मराठ्यांचा करणे शक्य नव्हते. मराठे त्याल बळी पडले, आणि आपल्याच पूर्वजांना विसरले. त्यामुळे त्यांना ५ हजार वर्षांचा इतिहास असूनही ते चारशे वर्षांच्या मागे ढुंकूनही बघायला तयार नाहीत.

मराठ्यांनी आपल्या प्राचीन इतिहासकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांचेच नुकसान झाले आहे व आजही होत आहे. त्यामुळे मराठ्यांनी आपल्या प्राचीन इतिहासाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसे केले तरच त्यांना किती महान व प्राचीन वारसा आहे हे कळेल.


महाविचार LATEST

Popular Posts This Week