सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
Showing posts with label Marathi Blog. Show all posts
Showing posts with label Marathi Blog. Show all posts

Saturday, July 23, 2011

सावरकरांची उडी: नवे संशोधन


सावरकर यांनी संडास मधून जी उडी मारली त्यावर एका फ्रेंच पत्रकाराने बरेच नवे संशोधन केले आहे. त्याचा एक लेख नुकताच वाचनात आला. त्या लेखातील कांही माहिती आपणाला माहीत असणे गरजेचे आहे:

१. सावरकर ज्या संडासमध्ये शिरले तेथील कमोडमुळे त्यांना खिडकीतून उडी मारणे सोपे गेले. तेंव्हा त्यांनी ठरवले की आता इथून पुढे कमोडवाल्या संडासमध्येच लपायचे, जेणेकरून पळायला सोपे पडेल. पुढे त्यांनी आपल्या मुठभर अनुयायांना पत्र लिहून प्रत्येकाच्या घरी कमोडवाले संडास बसवण्याची आज्ञा केली. अनुयायांना खरे कारण सांगणे उचित ठरले नसते, म्हणून सावरकरांनी पत्रात लिहिले की,

"वेदकाळात आपल्याकडे असेच संडास होते. शिवाय अशा संडास मध्ये हागणे सोपे जाते. तेंव्हा मूळचे वैदिकांचेच असलेल्या या संडासांचे पुनर्जीवन होणे आवश्यक आहे."

२. सावरकरांनी प्रचंड खवळलेल्या त्या समुद्रात उडी मारल्यावर त्यांच्यापुढे एक अकराल-विक्राळ शार्क मासा आला, पण सावरकरांनी त्याच्यावर डोळे वटारत आपली छत्री पुढे केली, त्यामुळे तो मासा घाबरून पळून गेला.

३. सावरकरांचा पोहण्याचा वेग एवढा प्रचंड होता की त्यांच्यापुढे युरोपिअन जलतरणपटू देखील फिके पडावेत.

त्या फ्रेंच पत्रकाराने शेवटी लिहिली आहे की सावर करांनी ज्या जहाजावरील संडास मधून उडी मारली ते जहाज शोधून काढून त्यातील संडासाचे सावरकर स्मारक बनवायला पाहिजे.


हेही वाचा:
पर्वती झाली हिमालयाहून मोठी
सावरकरांचा माफीनामा
सावरकरांचे गोमांसभक्षण आणि सावरकरवाद्यांचे कर्तव्य
सावरकर भक्तांचा थयथयाट
सावरकरांचा ब्राम्हणवाद
सावरकरांच्या माफीनाम्याचे निर्लज्ज समर्थन

Sunday, July 17, 2011

पुणेरी दुकानदाराच्या प्रेयसीस सूचना



एका तरुण आणि पक्का  पुणेरी असलेल्या (म्हणजे?)   दुकानदाराचे एका मुलीशी प्रेम जमले.  पण त्याने त्याच्या प्रेयसीला पुढील अटींचे पालन करण्याची कडक सूचना केली:

१. दुकानात सारखे सारखे येवू नये

२. सारखा सारखा फोन करू नये  

३. मिसकॉल  देवू नये. मिसकॉल दिल्यास माझ्याकडून फोन येण्याची अपेक्षा ठेवू नये.

४. फोनवर अथवा प्रत्यक्षात बोलताना आपले म्हणणे थोडक्यात मांडावे, उगीच पाल्हाळ लावू नये. प्रेम व्यक्त  करायला दोन शब्द पुरेसे असतात. अबोल प्रेम तर फारच चांगले.

५.  दुपारी २ ते ४ या वेळेत फोन करू नये. माझी वामकुक्षीची वेळ असते. झोपमोड झाल्यास आपल्या संबंधात    बिघाड निर्माण होवू शकतो.

६. आमच्याकडे पाणी देण्याची पद्धत नाही, तेंव्हा दुकानात आल्यावर पाणी मागू नये

७. सुट्टीच्या दिवशी आपण फिरायला व जेवायला बाहेर एकत्र जावू शकतो, पण खर्च TTMM  (तुझा तू  माझा  मी )  करावा लागेल.

८. वरील अटी मान्य असतील तरच पुढील वाटचाल करावी.

गम्मत म्हणजे या अटी वाचून त्या मुलीस तो दुकानदार आणखीनच आवडायला लागला, कारण तीही पक्की पुणेकर होती

एक पुणेरी भांडण





मी नारायण पेठेतून सदाशिव पेठेकडे चाललो असता दोन व्यक्ती एकमेकाशी भांडत
असताना दिसल्या. ते दोघेजण माझ्या ओळखीचेच होते. मला ऐकू आलेले ते पाणचट भांडण असे होते:

काळे: तू चुकीचे उच्चार करत जावू नकोस, सांगून ठेवतो
गोरे: आधी तू काल मराठी बोलताना इंग्रजी शब्द का वापरलेस ते सांग

-----------------


 एकदा एका माणसाने गोरे यांना इंग्रजीमधून शिवी दिली. तेंव्हा गोरे म्हणाले, आपण मराठीत शिवी दिली तर मला आनंद होईल






Thursday, July 14, 2011

अजमल कसाबची फाशी

 -महावीर सांगलीकर

पाकिस्तानी अतिरेकी अजमल  कसाब याला भारत सरकार उगीचच पोसत आहे, तो सरकारचा जावई आहे, त्याला गोळ्या घालायला पाहिजेत असा विचार अनेकजन बोलून दाखवत असतात. असे बोलणा-यांमध्ये  देशभक्तीचा ठेका घेतलेले महान मध्यमवर्गीय आघाडीवर असतात. पण या लोकाना ही साधी गोष्ट कळत नाही की एखाद्या गुन्हेगारास फासावर चढवण्यापूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. कसाबची फाशी सुप्रीम कोर्टाकडून पक्की झाल्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होवू शकत नाही.

जर कसाबला जागीच गोळ्या घातल्या असत्या तर त्याचे करवते धनी कोण आहेत हे कळणे अवघड होवून बसले असते. कसाब जिवंत राहिल्यामुळे सरकारला पाकिस्तानाच्या हाताचे अनेक पुरावे मिळू शकले. कसाबच्या सुरक्षेसाठी कोठ्यावधी रुपये खर्च झाले म्हणून जे ओरड करतात त्यांच्या हे लक्षात येत नाही, की हा खर्च कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी झाला आहे.

आपल्या येथील कायदेशीर प्रक्रियेत दिरंगाई होत असते. पण त्याला इलाज नाही, कारण जशी जनता तशी त्यांना सिस्टीम मिळते. बहुतांश भारतीय हे आळशी, भ्रष्ट आणि प्रत्येक गोष्टीचा वरवर विचार करणारे किंवा अजिबात विचार न करणारे आहेत. आपले सरकार, पुढारी, पोलीस, प्रशासन हे आपल्याच रक्ताच्या लोकांचे आहे.  प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे की आपण आपली स्वत:ची कामे किती वेळेवर करतो. 


भारतात जो दहशतवाद आहे तो हिंदुत्ववाद्यांनी बाबरी मशीद पाडल्यापासून सुरू झाला आहे. ही हिंदुत्ववाद्यांच्या कर्माचीच फळे आहेत. पण ती आपल्या सर्वांना भोगायला लागत आहेत.

ज्या लोकांना सध्याचे सरकार मूर्ख वाटते त्यांनी भा.ज.प.च्या राज्यात संसदेवर हल्ला झाला त्यावेळी त्या सरकारने काय दिवे लावले हे आठवून पहावे. 

खरे म्हणजे ज्यांच्या राज्यात संसदेवर हल्ला होतो, ज्या सरकारचा खुद्द परराष्ट्र  मंत्री तुरुंगातील अतिरेक्याना अफगाणीस्थानात सोडून येतो, ज्या सरकारच्या काळात पाकिस्तानी सैनिक अतिरेकी बनून काश्मिरातील अनेक टेकड्या काबीज करते आणि त्यावेळी त्या सरकारचे महान प्रधान मंत्री नेहमीप्रमाणे झोपलेले असतात,त्याच्याएवढे नालायक सरकार भारतात आज पर्यंत झाले नाही. पण हिंदुत्ववाद्यांना तेच सरकार महान वाटत असते. 


आपला तो बाळया... दुसरे काय?

Tuesday, July 12, 2011

त्यांचा सुपिरीयारिटी कॉम्प्लेक्स

महाराष्ट्रातील ब्राम्हणांच्या सुपिरीयारिटी कॉम्प्लेक्सचे हे बघा कांही नमुने 
जगातील सर्वश्रेष्ठ धर्म वैदिक धर्म
आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके
क्रान्तिकारकान्चा मुकुटमणी विनायक दामोदर सावरकर
क्वीन ऑफ क्वीन्स झांशीवाली लक्ष्मिबाई
भारताचा पोलादी पुरुष लालकृष्ण अडवानी
भारताचा सर्वश्रेष्ठ पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी
महाराष्ट्राचा सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री मनोहर जोशी
भाजपाचा सर्वश्रेष्ठ अध्यक्ष नितीन गडकरी
महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ संत रामदास
भारतातील सर्वश्रेष्ठ शहर पुणे
पुण्यातील सर्वश्रेष्ठ पेठ सदाशिव पेठ (या स्पर्धेत नारायण पेठ आणि शनिवार पेठ या पेठा पण आहेत)
हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ लोक ब्राम्हण
ब्राम्हणांतील  सर्वश्रेष्ठ लोक चित्पावन

ही घ्या माझी मते: 

जगातील सर्वश्रेष्ठ धर्म वैदिक धर्म:  मग तुम्ही स्वत:ला हिंदू का म्हणवून घेता? अभिमानाने  उघडपणे  वैदिक  म्हणवून घेण्यात तुम्हाला लाज का वाटते?

आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके: हा तर दरोडेखोर होता असे म्हणतात

क्रान्तिकारकान्चा मुकुटमणी विनायक दामोदर सावरकर: या तथाकथित मुकुटमण्याने  दयेची भीक मागून माफी मिळवली, मग यांचे इतर क्रांतिकारक कसे असतील?

क्वीन ऑफ क्वीन्स झांशीवाली लक्ष्मिबाई:  ताराबाई,  चांदबीबी,  अब्बक्का राणी,  कित्तूरची चेन्नमा राणी  यांची  चरित्रे वाचा मग झांशीवालीच्या भक्तांना इनफिरीयारिटी कॉम्प्लेक्स मध्यी जावे लागेल

भारताचा पोलादी पुरुष लालकृष्ण अडवानी: सरदार वल्लभ भाई पटेल यांच्यापुढे या लाल पोलादातील पितळ उघडे पडेल   

भारताचा सर्वश्रेष्ठ पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी: कुठे त्या इंदिरा गांधी आणि कुठे हा

महाराष्ट्राचा सर्वश्रेष्ठ मुख्यमंत्री मनोहर जोशी: बाळासाहेबांनी असे कुठे म्हंटले आहे?  

भाजपाचा सर्वश्रेष्ठ अध्यक्ष नितीन गडकरी: सर्वश्रेष्ठ की वजनदार?

महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ संत रामदास: उगीच मनाचे श्लोक म्हणू नका (म्हणजे उगीच मनाला येईल ते बकू नका)

भारतातील सर्वश्रेष्ठ शहर पुणे:  'सांगलीकरांना' हे अजिबात मान्य नाही

पुण्यातील सर्वश्रेष्ठ पेठ सदाशिव पेठ (या स्पर्धेत नारायण पेठ आणि शनिवार पेठ या पेठा पण आहेत): जरा कॅम्पात गांधीजीच्या मार्गावर जावून या म्हणजे कळेल  

हिंदू धर्मातील सर्वश्रेष्ठ लोक ब्राम्हण: सर्वश्रेष्ठ की दुष्ट?

ब्राम्हणांतील  सर्वश्रेष्ठ लोक चित्पावन: इतर ब्राम्हणांना हे मान्य आहे का? 

Monday, July 11, 2011

वैदिक धर्म जिवंत आहे का?

वैदिक धर्मियांनी भारतातील श्रमण धर्माला आणि त्याचे अनुयायी असणा-या नाग,असूर, राक्षस वगैरे मूळ निवासीयांना नेहमी विरोध केला. श्रमणांची शाखा असणा-या जैन धर्माला कमकुवत करण्यात आणि बौद्ध धर्म भारतातून हद्दपार करण्यात वैदिकांना तात्पुरते यश मिळाले, पण या संघर्षात खुद्द वैदिक धर्मच नष्ट झाला!

या संघर्षात वैदिकांना आपले इंद्र, वरुण वगैरे मूळ देव सोडून द्यावे लागले,आणि शिव, गणपती, कृष्ण यासारखे अवैदिक देव स्वीकारावे लागले. (गंमत म्हणजे शिव, गणपती आणि कृष्ण हे वैदिकांचे कट्टर विरोधक होते!)वैदिक धर्मात मूर्तीपूजा नसतानाही वैदिकांना ती स्वीकारावी लागली. यज्ञात गाईन्चा बळी देणा-या, गोमांस खाणा-या वैदिकांना यज्ञ संस्था बंद करावी लागली, गोमांसच काय, कसलेही मांस खाणे त्यांना सोडून द्यावे लागले.


क्षत्रियांनी लिहिलेली, वेदांचा अंत करणारी उपनिषिदे वेदांचाच भाग आहे अशा थापा मारून, गौतम बुद्धांना अवतार ठरवून, शैवांना वैदिक ठरवून वेदधर्म टिकवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही.

आजच्या वैदिकांची स्थिती अशी आहे की त्यांना आपला धर्म लपवून ठेवावा लागतो, आणि 'आम्ही हिंदू आहोत' असे सांगावे लागते. वैदिक धर्म उघड रूपाने तरी पूर्ण नष्ट झाला आहे. याउलट बौद्ध धर्म जगभर पसरला, भारतातही त्याचे जोरदार पुनरागमन झाले. दुसरीकडे जैन धर्मही टिकून राहिला आणि आता तो पुन्हा फोफावत आहे.


हिंदू या शब्दाविषयी थोडेसे

Friday, July 8, 2011

महावीर- गौतम बुद्ध आधी कोण होते?

-महावीर सांगलीकर

अनेक हिंदुत्ववाद्यांना असे वाटत असते की त्यांचा धर्म जगातील सगळ्यात जुना धर्म आहे. त्यांना असेही वाटते की भारतातील जैन, बौद्ध, शीख आणि इतर धर्म हिंदू धर्माच्याच शाखा/ पंथ आहेत, व हे धर्म हिंदू धर्मातून फुटून निघालेले धर्म आहेत. त्यांचे असे वाटणे हे हिंदू हा एक धर्म आहे आणि तो जगातील सगळ्यात जुना धर्म आहे या दोन गृहितकावर आधारीत आहे.

हिंदुत्ववाद्यांना त्यांच्याच धर्माची नीट माहिती नसल्याने त्यांना जैन धर्म व बौद्ध धर्म ही नेमकी काय चीज आहे आणि त्यांचा इतिहास नेमका काय आहे हे माहीत असणे शक्यच नाही. त्यामुळे त्यांचा सगळ्यात मोठा गैरसमज हा असतो की महावीर व गौतम बुद्ध हे 'आधी' हिंदूच होते. इथे त्यांना हिंदू या शब्दाआडून हे सांगायचे असते की हे दोघे आधी वैदिक होते. हे लोक जैन, बौद्ध यांना हिंदू धर्माचा पंथ ठरवतात, पण वैदिक धर्म हा हिंदू धर्माचा पंथ आहे असे कधीच म्हणत नाहीत, कारण हिंदू म्हणजेच वैदिक असे त्यांचे साधे गणित असते.

जैन, बौद्ध आणि वैदिकांच्या कोणत्याही ग्रंथात महावीर व गौतम बुद्ध आधी वैदिक असल्याचा उल्लेख नाही. जैन ग्रंथात महावीरांचे आई-वडील हे पार्श्वनाथाच्या चातुर्याम धर्माचे अनुयायी असल्याचा स्पष्ट उल्लेख आहे. गौतम बुद्धांचे आई-वडील हे देखील याच परंपरेतील होते. (पहा: पार्श्वनाथाचा चातुर्याम धर्म, लेखक डॉ. धर्मानंद कोसंबी) पार्श्वनाथ हे श्रमण परंपरेतील एक महान व्यक्तीमत्व होते. ही श्रमण परंपरा महावीरांनी, गौतम बुद्धांनी किंवा पार्श्वनाथांनी सुरू केली नव्हती, तर ती या देशातील मूळ परंपरा आहे. त्या परंपरेतील लोकांना हिंदू म्हणणारे लोक आपले अज्ञान दाखवत असतात असेच म्हणावे लागेल.

अशा लोकांना सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारण्यापूर्वी तोही हिंदू (म्हणजे वैदिक) होता असे वाटत असते. पण सम्राट अशोक आधी जैन होता, नंतर बौद्ध झाला. (पहा: The Early Faith of Asoka: Edward Thomas).

महावीर हे जैन धर्माचे २४वे तीर्थंकर होते. त्यांच्या आधी २३ तीर्थंकर होवून गेले, तर गौतम बुद्धांच्या अगोदर २४ बुद्ध होवून गेले. तीर्थंकर, बुद्ध, जिन, अर्हत, अरिहंत ही व्यक्तींची नावे नसून पदांची नावे आहेत. या सगळ्या शब्दांना ऋग्वेदाच्या अगोदर पासूनचा इतिहास आहे. वैदिक परंपरेतही २४ अवतारांची संकल्पना आहे, पण ती पुराणांतील संकल्पना आहे. पुराणे ही महावीर व गौतम बुद्ध यांच्या नंतर शेकडो वर्षांने लिहिली गेली आहेत (पहा: ब्राम्हणी साहित्य, लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर). यावरून २४ अवतार ही संकल्पना सरळ सरळ २४ तीर्थंकर व २४ बुद्ध यावरून नंतर उचलेली आहे हे स्पष्ट दिसते. अशोक चक्रातही २४ आरे असतात, हा केवळ योगायोग नव्हे. अशोकाच्या काळात वैदिक परंपरेत २४ अवतार ही संकल्पना नव्हती.

वैदिक धर्म हा ब्राम्हण धर्म म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे ब्राम्हण नसलेल्यांचा या धर्माशी संबंध असण्याचा प्रश्नच येत नाही. तसेच आजचा हिंदू धर्म हा जैन, बौद्ध, शैव आणि वैदिक धर्म यांची भेसळ आहे.



हेही वाचा:
प्राचीन बहुजनांचा धर्म कोणता?
हिंदू या शब्दाविषयी थोडेसे
छ. शिवाजी महाराज हिंदू होते काय?

Monday, June 20, 2011

शाकाहार कांही जैनांची मक्तेदारी नव्हे

-महावीर सांगलीकर 


माझे एक मित्र विजय तरवडे यांनी मला एक प्रश्न विचारला आहे. तो मी येथे त्यांच्याच शब्दात देत आहे: 

प्रिय महावीरजी,आपण मित्र आहोत. रागावू नका. पंण मुंबईतली कोणतीही ओनरशिप इमारत घेतली तरी हेच चित्र दिसते, तिथले मध्यमवर्गीय / मांसाहारी हिंदू गायब होत आहेत. महावीरजी, खर सांगा, तुम्ही आमचा इतका राग राग का करता? आम्हाला मुस्लिम / इसाईंच्या इमारतीत बुकिंग मिळते. तुम्ही मात्र नाकारता. एरव्ही आम्ही तुमचे पिढीजात, सन्माननीय ग्राहक असतो.तरी असे का?हा प्रश्न वैयक्तिक न समजता उत्तर द्यावे, ही विनंती.

विजय  तरवडे यांने हा प्रश्न माझ्या फेस बुकवरील एका पोस्टला प्रतिक्रिया  म्हणून विचारला आहे आणि पोस्टच्या मूळ विषयावरून लोकांचे लक्ष दुसरीकडे नेले आले. असो, कांही लोक नको असलेलेले विषय बाद करण्यासाठी असा प्रकार करत असतात. तरीही मी त्यांच्या प्रश्नाचे उतार येथे स्वतंत्रपणे देत आहे.

मुंबईतील अनेक हौसिंग सोसायट्यामध्ये मध्यम वर्गीयांना आणि मांसाहारी लोकांना जागा मिळत नाहीत हे खरे आहे. पण त्याची आर्थिक आणि सामाजिक कारणे शोधून त्यांचे विश्लेषण करण्याऐवजी असे घडण्यामागे जैन समाज आहे असा शोध कांही राजकारणी आणि सनसनाटी बातम्या देण्याची खोड असणा-या मेडीयाने लावला आहे. 

ज्या सोसायटीत घराची किमत प्रचंड आहे अशा सोसायटीत मध्यवर्गीय लोकांना घर घेणे शक्य नसते. येथे कोणत्याही जाती धर्माचा संबध नाही. अशा सोसायट्यामध्ये मध्यमवर्गीयजैन लोकही घर घेऊ शकत नाहीत.

अनेक लोकांचा असा समाज आहे की जैन समाज हा श्रीमंत लोकांचा समाज आहे. पण हे पूर्ण पणे खोटे आहे. मुंबईतील अनेक जैन कुटुंबे चाळी आणि झोपड्यांमध्ये रहात आहेत. अनेक मध्यमवर्गीय जैन कुटुंबे मुंबईच्या उपनगरांमध्ये परवडेल अशा सोसायट्यामध्ये मध्ये रहातात. 

आता राहिला प्रश्न कांही सोसायट्यामध्ये मांसाहारी लोकांना जागा न मिळण्याचा. मुंबईतील कांही भागात असा प्रकार होत असतो. पण याला जैन समाजाला जबाबदार धरणे किती बरोबर आहे? मुळात अशा भागात जैनाची लोकसंख्या आणि एकूण समाजात त्यांची टक्केवारी किती? फार तर २% असणारा हा समाज एवढा प्रभावी आहे काय की त्याने त्या भागात कोणाला प्रवेश द्यायचा आणि कोणाला नाही हे ठरवावे? खरे म्हणजे या प्रकारामागे इतर शाकाहारी लोकांचा मोठा हात आहे. यात गुजराती वैष्णव बनिया  (ज्यांची संख्या जैनांच्या अनेक पटीत आहे), गुजराती ब्राम्हण, गुजरात, राजस्थान मधून येवून मुंबईत स्थाईक झालेले शाकाहारी  हिंदू लोक यांचा समावेश होतो. पण मुंबईतील अनेक लोकांना सगळेच गुजराती आणि सगळेच राजस्थानी लोक हे जैन असतात असा भ्रम झालेला असतो. इतरांचे ठीक आहे, पण ज्ञानाचा टेंभा मिरवणारे लोकही याच भ्रमात असतात याचे मला आश्चर्य वाटते. मुंबईमध्ये अस्सल मराठी जैन लोकही आहेत हे तर त्यांना माहीत असणे शक्य नाही. असो. (यांचे ग्रंथ पाहिले की तेथेही असाच  प्रकार दिसतो. अनेक ठिकाणी त्यांनी जैनांना बौद्ध तर बौद्धांना  जैन म्हंटले आहे. कांही ठिकाणी तर महावीराला गौतम बुद्ध म्हंटले आहे. यावरून हे लोक कशाचाही खोलवर अभ्यास  करत नाहीत असे दिसते). विजय तरवडे ज्यांना जैन समजतात त्यातील बहुतेक  लोक जैन नसल्याचे त्यांना दिसेल, जर त्यांनी बारकाईने पाहिले तर!

तेंव्हा मांसाहारी लोकांना जर एखाद्या सोसायटीत प्रवेश मिळत नसेल तर त्याचा दोष हिंदू शाकाहा-यांना दिला पाहिजे. शाकाहार कांही जैनांची मक्तेदारी नव्हे. तसेच मुंबईत ज्या भागात मांसाहारी लोकांना प्रवेश नाही तो भाग कांही जैनांच्या मालकीचा नव्हे.


Sunday, June 12, 2011

अपयशी भारतीय जनता पक्ष

-महावीर सांगलीकर


आपल्या  येथे उठसूठ  सत्ताधारी पक्षाला शिव्या घालणे हा अनेकांचा छंद असतो. अशा लोकांना विरोधी पक्षाची बाजू लावून धरण्याची खोड असते. पण जेव्हा विरोधी पक्ष आपले काम नीट करत नाहीत तेव्हाही या छांदिष्ट लोकांना विरोधी पक्षाचाच पुळका येत असतो याचे आश्चर्य वाटते.  

सध्या रामदेव बाबा आणि आण्णा हझारे यांच्या आंदोलनांच्या निमित्ताने झोपी गेलेला भा.ज.पा. हा पक्ष किंचित जागा झालेला आहे. या पक्षाचे संसदेत 115  खासदार आहेत. पण हे खासदार नेमके काय करत असतात हा संशोधनाचा विषय आहे. 

संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्ष वात चुकू नये  म्हणून विरोधी पक्षाने संसदेत सत्ताधारी पक्षावर वचक ठेवायचा असतो. शिवाय संसदेबाहेरही सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जन जागृती करायची असते. पण भारतीय जनता पक्ष या बाबतीत अपयशी ठरला आहे. त्यामुळेच विरोधी पक्षाचे काम आण्णा-बाबांना करावे लागत आहे! 

भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणूनही नीट काम करू शकत नाही, मग त्याने सत्ताधारी बनण्याचे स्वप्न बघणे हा एक मूर्खपणाच आहे! 

पुढील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची अवस्था कम्युनिष्ट पक्षा सारखीच होणार यात संशय नाही! काँग्रेस पक्ष भा.ज.प.ची अवस्था रामदेव बाबा सारखीच करून टाकेल.



Saturday, June 4, 2011

हिंदूंची सहिष्णुता | वैदिकांची हिंसक परंपरा

-महावीर सांगलीकर

हिंदू हे सहिष्णू असतात असे म्हणते जाते. एका अर्थाने ते खरे आहे, जर आज जे स्वत:ला हिंदू म्हणवून घेतात त्या बहुजनांना सहिष्णू म्हंटले तर. पण हिंदू म्हणजे वैदिक ब्राम्हण असे समजले तर त्यांना सहिष्णू म्हणणे एकदम चुकीचे ठरेल.

भारतात कट्टर अहिंसावादी आणि कट्टर हिंसावादी अशा दोन परंपरा प्राचीन काळापासून पहायला मिळतात. श्रमण परंपरा ही अहिंसावादी, तर ब्राम्हण उर्फ वैदिक परंपरा ही हिंसावादी अशी त्यांची विभागणी दिसून येते. श्रमण परंपरेत जैन आणि बौद्ध हे दोन धर्म तर वैदिक परंपरेत वैदिक धर्म मोडतो. अहिंसावादी परंपरेत वारकरी, महानुभाव आणि लिंगायत यांचाही समावेश होतो.

चाणाक्ष लोकांच्या लक्षात आलेच असेल की अहिंसेचे समर्थन करणारे सर्व धर्म व पंथ हे समतावादी आहेत तर हिंसेचे समर्थन करणारा वैदिक धर्म विषमतावादी आहे.

वैदिक परंपरेतील साहित्य बघितले तर ही परंपरा प्राचीन काळापासून हिंसेवर विश्वास ठेवणारी दिसते. या परंपरेतील साहित्यात जी कांही खरी-खोटी कथानके लिहिली आहेत, त्यात हिंसक गोष्टींची रेलचेल दिसून येते. मग ती परशुरामाची गोष्ट असो वा बळी राजाच्या खुनाची गोष्ट, की रामायण-महाभारतातील गोष्टी (जसे शंबूकाचा वध, शूर्पनखेचे नाक-कान कापणे, एकलव्याचा अंगठा तोडणे वगैरे). मनुस्मृती या ग्रंथातही वैदिकांची हिंसक वृत्ती दिसून येते.

याच परंपरेतील अवतारवाद म्हणजे वैदिकांना डोईजड झालेल्या 'कुणाचा' तरी 'नाश' करण्यासाठी ईश्वराने घेतलेल्या अवतारांच्या कथा होय.

वैदिकांच्या या हिंसक वृत्तीचे प्रतिबिंब त्यांच्या देवांच्या मूर्त्यांमध्ये ही दिसून येते. वैदिकांनी बहुतेक सगळे देव व देव्या यांच्या हातात शस्त्रे दिली. त्यामुळे आजही आपण या देव-देवतांच्या हाती भाले, तलवार, धनुष्य, सुदर्शन चक्र अशा गोष्टी पहातो. येथे प्रश्न असा पडतो की आजच्या काळात ही सगळी शस्त्रे कालबाह्य झाली आहेत. मग अशा शस्त्रांनी ते देव आपल्या भक्तांचे रक्षण कसे काय करणार? असो.

देवांच्या हाती शस्त्रे देणारा जगातील हा एकमेव धर्म आहे.

हिंसेवर प्रचंड विश्वास असल्याने वैदिकांनी या देशात प्राचीन काळापासून अनेक थोरा-मोठ्यांचे खून केले आहेत. पुराण आणि वेद यातील खूनांमध्ये मी आत्ताच शिरत नाही. सध्या आपण फक्त इतिहासातील गाजलेले आणि महत्वाचे खून पाहू.


* मौर्य सम्राट बृहद्रथ याचा त्याचा वैदिक ब्राम्हण सेनापती पुष्यमित्र शृंग याने खून केला व सत्ता बळकावली.

* याच पुष्यमित्र शृंगाने हजारो बौद्ध साधुंची कत्तल केली.

* शशांक या वैदिक राजाने बौद्ध सम्राट हर्षवर्धन याचा भाऊ राजवर्धन याचा खून केला, तसेच हर्षवर्धनाच्या खूनाचा प्रयत्न केला.

* कुमारील भट्ट, रामानुज या वैदिक ब्राम्हणांनी दक्षिण भारतात हजारो जैन साधुंची कत्तल केली.


* हेमाडपंत या वैदिक ब्राम्हणाने महानुभाव पंथाचे संत चक्रधर स्वामी यांचा हाल-हाल करून खून केला.

* देहूच्या वैदिक ब्राम्हणांनी संत तुकारामांना नदीतील डोहात बुडवून मारले


* छ. शिवाजी महाराज व छ. संभाजी महाराज या दोघांचे मृत्यू संशयास्पद आहेत. नवीन पुरावे व कागदपत्रे संशयाचे बोट वैदिक ब्राम्हणांकडे दाखवतात.

* राजा मानसिंहाच्या दरबारातील वैदिक ब्राम्हणांनी तोडरमल या तत्ववेत्त्याच्या विरोधात कुभांड रचून राजाकरवी त्याला हत्तीच्या पायाखाली दिले.

* नथुराम गोडसे या वैदिक ब्राम्हणाने महात्मा गांधी यांचा खून केला.

विशेष म्हणजे आजचे अनेक वैदिक ब्राम्हण वरीलपैकी अनेक खुनांचे आजही समर्थन करत असतात.

वैदिकांच्या हिंसक वृत्तीचा आणखी एक पुरावा म्हणजे ते आजही हिंदुत्वाच्या नावावर अवैदिक धर्मांच्या, विशेषत: मुस्लीम व ख्रिस्ती धर्माच्या विरोधात द्वेष पसरवण्याचे काम करत असतात, व अनेकदा या धर्मांच्या अनुयायांच्या विरोधात अतिरेकी कारवाया देखील करत असतात. दंगली घडवणे हा तर त्यांचा आवडता उद्योग असतो. अशा रीतीने त्यांनी आपली परंपरा जिवंत ठेवली आहे.

अशा हिंसक वृत्तीतूनच पुरंदरे वगैरे वैदिक ब्राम्हण लेखक छ. शिवाजी महाराजांच्या राजनीती, कूटनीती, परराष्ट्र नीती, सर्वधर्म समभाव, स्थापत्य, शेतक-यांविषयी धोरण अशा गोष्टींविषयी लिहिण्या ऐवजी अफजलखानाचा वध आणि शाहिस्तेखानाची बोटे यावरच जास्त भर देत असतात. या लोकांना लढाया आणि युद्धे म्हणजेच इतिहास असे वाटत असते.

आज जो हिंदू दहशतवाद चर्चेत आहे, त्याला हिंदू दहशतवाद म्हणणे चुकीचे आहे, कारण तो हिंदूंचा दहशतवाद नसून वैदिकांचा दहशतवाद आहे. हिंदू दहशत वाद्यांच्या नावांवर एक नजर टाकल्यास तुम्हाला त्यात वैदिक ब्राम्हणांचीच नावे मोठ्या संख्येने दिसतील.

Video: India Ignores Brahmin Terrorism



Thursday, June 2, 2011

गाढवापुढे वाचली गीता आणि ........

-महावीर सांगलीकर


गाढवापुढे  वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता ही म्हण  पुणेरी मराठी येणा-या  प्रत्येक माणसाला माहीत आहे. पण ही म्हण बहुजनांना गाढव ठरवण्यासाठी तयार करण्यात आली आहे हे सहसा कोणाच्या लक्षात येत नाही. 

गीता हा विशिष्ट लोकांना जास्त आवडणारा ग्रंथ आहे, तर बहुजन समाजात गोंधळ हा एक सांस्कृतिक प्रकार आहे. बहुजनांना गीतेचे फारसे आकर्षण नाही, तर गीता आवडणा-या लोकांना गोंधळ हा गांवढळ  प्रकार वाटतो. बहुजनांना गीतेचे आकर्षण नसल्याने त्यातील तथाकथित उच्च तत्वज्ञान त्यांना समजत नाही. बहुजनांना गीता ऐकल्यावर कालचा गोंधळ बरा होता असेच वाटते. बहुजन हे विशिष्ट लोकांना  नेहमीच गाढव वाटत आले आहेत. त्यातूनच गाढवापुढे  वाचली गीता आणि कालचा गोंधळ बरा होता ही म्हण तयार झाली.

मराठी भाषेत बहुजनांचा  अपमान करणा-या अशा अनेक म्हणी व वाक्यप्रचार आहेत. अशा  म्हणी व वाक्यप्रचार विशिष्ट लोकांनीच तयार केल्या आहेत. हा अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यावर एखादे पुस्तकही तयार होवू शकते.

Tuesday, May 31, 2011

देशस्थांना वाटते पेशवाईचे कौतुक

महावीर सांगलीकर


छ. शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत आपल्याला औषधालाही चित्पावन ब्राम्हण दिसत नाही. त्या काळात जे कांही ब्राम्हण होते ते आज ज्यांना देशस्थ म्हणून ओळखले जाते, ते होते. पुढे अचानक चित्पावन नावाचे नव-ब्राम्हण कोकणातून घाटावर आले आणि त्यांनी देशस्थांना बाजूला सारून सगळीकडे आपले वर्चस्व प्रस्थापित केले. त्यांनी मराठेशाहीही बळकावली. 

या चित्पावन ब्राम्हणांना कायस्थानी  अनेकदा वठणीवर आणले, पण देशस्थांनी चित्पावनांच्या विरोधात 'कुजबूज' करण्याशिवाय इतर कांही केले नाही. उलट चित्पावन्नाबद्दल  त्यांना नेहमीच प्रेम व आकर्षण वाटत आले आहे. 

मी कित्येक देशस्थांना पेशवाईचे कौतुक करतांना बघितले आहे. माझा एक देशस्थ मित्र मला म्हणाला होता, 'जेंव्हा ब्राम्हणाचे डोके आणि क्षत्रियाचे मनगट एकत्र आले, तेव्हा स्वराज्य निर्माण झाले, आणि जेंव्हा डोके आणि मनगट दोन्हीही ब्राह्मणांचे होते तेंव्हा अटकेपार झेंडे गेले'. मी त्याला म्हंटले, तू पुरंदरेच्या  पुस्तकातला डायलॉग बोलत आहेस वाटते? 

पेशवाईच्या कौतुकामागे देशस्थांच्या मनात सुप्त अवस्थेत असलेल्या शनिवारवाड्यावरील पंगतीन्च्या आठवणी असाव्यात, तसेच चित्पावनांमुळे  स्वजातीबद्दल तयार झालेला न्यूनगंडही असावा. देशस्थांना चांगलेच माहीत आहे की कट-कारस्थानांच्या बाबतीत आपण चित्पावनांचा हात धरू शकत नाही. तसेच चित्पावनांचा गोरा रंग काळ्या देशस्थांना आणखीनच 'आदरणीय' वाटत असावा. (मी गो-या किंवा काळ्या रंगाच्या विरोधात नाही. 'वर्ण 'व्यवस्था मला मान्य नाही. मला फक काळ्या लोकांना  असलेला न्यूनगंड दाखवायचा आहे. )

खरे म्हणजे चित्पावन  पेशवे  देशस्थांना काय किमत देत होते हा एक इतिहास संशोधनाचा विषय आहे, तर आजचे चित्पावन आजच्या देशस्थांना काय किमत देतात हा समाजशास्त्रीय अभ्यासाचा विषय आहे. 

पळपुट्या  पेशव्यांचे, माफीवीर सावरकराचे कौतुक करणारे देशस्थ लोक  निधड्या छातीच्या क्रांतीवीर राजगुरूला मात्र विसरले आहेत. हा राजगुरू देशस्थ होता हे देशस्थांना माहीत आहे, पण त्याचे कौतुक केले तर चित्पावनांना आवडणार नाही हेही त्यांना माहीत आहे. 

एकंदरीत देशस्थ लोक चित्पावनांचे मानसिक गुलाम आहेत असेच दिसते.

Friday, May 27, 2011

इतिहास लेखन इ.स. ३०१२

-महावीर सांगलीकर


इ.स. ३०१२ मधील 'विशिष्ट' भारतीयांनी लिहिलेला इतिहास कसा असेल? 

हे  बघा कांही नमूने 

१. भारतीयांनी १६व्या ते २०व्या शतकात  इंग्लंड, अमेरिका  व  इतर अनेक देशांवर  राज्य केले होते. त्यामुळे  भारतीयांच्या इंग्रजी भाषेला इंग्लंड, अमेरिका व अनेक देशात फार महत्त्व आले. भारतीयांचा क्रिकेट हा खेळ देखील अनेक देशात लोकप्रिय झाला.

२. २१व्या शतकात अमेरिकन लोकांना संगणकाचे फारसे ज्ञान नव्हते. त्यामुळे ते लोक भारतीय संगणक तज्ञांना भरपूर पगारावर आपल्याकडे ठेवून घेत.

३. संगणक, इंटरनेट, विमाने, रणगाडे, अवकाशयाने वगैरे अनेक गोष्टींचा शोध भारतीयांनी लावला. न्यूटन, आइनस्टाइन, स्टीफन हाकिंग्ज हे  महान शास्त्रज्ञभारतीय वंशाचेच होते. न्यूटनचे  खापरपणजोबा पुण्याजवळच्या चिंचवड येथे रहात असत, तर आइनस्टाइनचे आजोबा कोथरूड येथे रहात असत.

४. दुस-या महायुद्धात भारताच्या मार्गदर्शनाखाली अमेरिका, इंग्लंड व रशियाने जर्मनीविरुद्ध आघाडी तयार केली व जर्मनीचा पराभव झाला. भारतीय शास्त्राज्ञांनी बनवलेला अणुबॉम्ब अमेरिकेने जपानवर टाकला व जपान शरण आले. 

५. हिटलरने आत्महत्या करण्यापूर्वी गीता वाचली होती.
    
६. चंद्रावर अगोदर भारताचे चांद्रयान उतरले. त्यातून मिळालेल्या माहितीचा उपयोग करत अमेरिकेने
Niel Armstrong हा  पहिला मानव चंद्रावर उतरवला. हा Niel Armstrong देखील मूळ भारतीय वंशाचा  होता. Armstrong आडनावाचे अमेरिकन लोक हे मूळचे भुजबळ  आडनावाचे मराठी लोक  होते. भुजबळ = Armstrong 


७. ओसामा बिन लादेन हा कुख्यात  अतिरेकी पाकिस्तान मध्ये लपून बसला होता. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानात घुसून त्याला ठार केले. त्यामुळे जगावरचे एक मोठे संकट टळले 

८. स्वातंत्र्यवीर सावरकर  यांनी जहाजावरून समुद्रात उडी टाकली, व ते अटलांटिक महासागरातून पोहत-पोहत अमेरिका गाठणार होते, आणि तेथून भारताची स्वातंत्र्य चळवळ  चालवणार होते. अमेरिकेने त्यांना गरज पडल्यास लश्करी  मदत करण्याचे आश्वासन दिले होते. पण फ्रेंच पोलिसांनी सावरकरांना मध्येच  अटक केल्यामुळे   हे सर्व शक्य झाले नाही. 


Saturday, May 7, 2011

ब्राम्हनांच्या ताब्यात देश खरेच आहे का?


 -महावीर सांगलीकर 

भारताच्या प्रशासनात आणि इतर अनेक क्षेत्रात महत्वाच्या पदांवर ब्राम्हनांचा वरचश्मा आहे असा अनेकांचा समज  आहे.

या संदर्भात नुकताच हर्षवर्धन देशपांडे यांच्या एका लेखातील आकडेवारी बघन्यासारखी आहे. त्यांनी या लेखात म्हंटले आहे की विद्यापीठांचे ५१% कुलगुरू, सुप्रीम कोर्टाचे ६५% न्यायाधीश, हायकोर्टाचे ५०% न्यायाधीश, ४१% राजदूत, ७२% आईएस ऑफिसर्स, ६१% आय.पी.एस.ऑफिसर्स  हे ब्राम्हण आहेत. तसेच रेडिओ व टी.वी.चे८३% कलाकार/कर्मचारी, एअर लाइन्स मधील ६१% कर्मचारी, सी.बी.आय/कस्टम/सेन्ट्रल एक्साइझ मधील ७२% लोक हे ब्राम्हण आहेत. ही आकडेवारी देशपांडे यांना कोठून मिळाली हे त्यांनाच ठाउक,  पण  ही आकडेवारी 'नासातील  ५०% शास्त्रद्न्य   भारतीय असतात' या सारखीच बोगस आहे. बहुधा देशपांडे बहुजन नेते जे आकडे फुगवून सांगत  असतात त्याला बली  पडलेले दिसतात.

ही आकडेवारी कशी  बोगस आहे हे  मी लगेच दाखवून देतो. सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईट वर सध्याच्या सर्व न्यायाधीशांची नावे दिली आहेत. तेथे  एकुण २९ न्यायाधीश आहेत. मुख्य  न्यायाधीश एस. एच. कापडिया हे आहेत. ते पारशी आहेत. या २९ न्यायाधीशांपैकी फक्त ९ जन  ब्राम्हण आहेत, म्हणजे केवळ ३०% ब्राम्हण आहेत, पण प्रचारकी लोक हा आकडा फुगवून  ६५ टक्क्यावर  नेतात. हीच गोष्ट इतर सगळ्या क्षेत्रातही  घडत आहे. तुम्हाला माहीत असणा-या आय.पी.एस, आय.ए.एस. व इतर महत्वाच्या अधिका-यांच्या नावांची एक यादी बनवा, तुम्हाला त्यात ब्राम्हण अधिकारी फार तर ३०-३५%च दिसतील.

जात हीच मुख्य ओळख  असणा-या भारतीयांना, आणि त्यातील खुद्द ब्राम्हनांना देखील जातींची नीट माहिती असत नाही. त्यामुले मोठ्या  पदांवर  असलेल्या  अनेक ब्राम्हनेतरांना  ब्राम्हण समजले जाते. अनेक ब्राम्हण आणि बहुजनही बाजी प्रभु देशपांडे, स्वामी विवेकानंद, जगदीश चन्द्र बोस, मुंशी प्रेमचंद,  नेताजी सुभाष चन्द्र बोस, राजेन्द्र प्रसाद, लाल बहादूर शास्त्री, जयप्रकाश नारायण,  यांना ब्राम्हण समजत असतात. पण यातील कोणीच ब्राम्हण नव्हते. बहुतेक जन बालासाहेब ठाकरे, लता मंगेशकर, किशोरी अमोनकर यांना  ब्राम्हण समजतात. पण हे कांही ब्राम्हण नाहीत. इतकेच नव्हे तर पुण्यातील जोशी वड़ेवाले तसेच मोहन जोशी (कोँग्रेस नेते) हे जोशी असेल तरी ब्राम्हण नाहीत.

आपले मित्र संजय सोनवनी यांना देखील अनेकजन ब्राम्हण समजतात. एवढेच नव्हे तर मला देखील अनेकजन  ब्राम्हण समजत असतात.

मागे एकदा एका  ब्राम्हण विरोधी पुस्तकात लेखकाने प्रसिद्द डोक्टर व शाकाहार प्रचारक कल्याण गंगवाल यांच्यावर  ते ब्राम्हण असल्याचे गृहीत धरून टीका केली होती.

भारताच्या क्रिकेट टीम मध्ये ५०% हून जास्त ब्राम्हण असतात अशी आकडेवारी अनेकदा मी वाचली आहे. प्रत्यक्षात तेथे एक-दोनच ब्राम्हण खेलाड़ू असतात.

हुशार लोकांना ब्राम्हण समजायच्या पद्धती मुले वर देशपांडे यांनी दिलेल्या आकडेवारी सारखी खोटी आकडेवारी तयार  होत असते. या  आकडेवारीचा उपयोग  बहुजन नेत्यांना  ब्राम्हणद्वेषासाठी  तर ब्राम्हण लोकांना  आपला अहंकार जोपासन्यासाठी होत असतो.

पण हे ब्राम्हण महात्म्य आजचे नाही. भारताच्या इतिहासात अनेक महान लोकांना ते ब्राम्हण नसतांना त्यांच्यावर पुढील कालात ब्राम्हनत्व लादले गेले,  एवढेच नाही तर अनेक ब्राम्हनेतर  राजघरान्यांना ब्राम्हण घराणी ठरवले गेले. त्याबद्दल मी नंतर कधीतरी लिहीन.

Sunday, April 24, 2011

इस्लाम लई भारी: शंकराचार्य देवानंद सरस्वती

हिन्दुत्ववादी लोक इस्लामला हिन्दू धर्माचा सगळ्यात मोठा शत्रू  मानत असले तरी हिंदुत्ववाद्यांचे जगतगुरु स्वामी देवानंद सरस्वती यांच्या मते  इस्लाम हा जगातील सर्वात भारी धर्म आहे. हे शंकराचार्य म्हणतात की कांही लोक इस्लामला नावे ठेवतात, त्याचे जगात सगळ्यात जादा दुःख मला होते. स्वामी देवानंद सरस्वती यांना इस्लामचे  प्रचारक जाकिर नाईक यांनी  या विषयावर  बोलण्यासाठी  ख़ास बोलविले होते.

या प्रवचनात शंकराचार्य म्हणतात, 'हिन्दू धर्म धर्मही नहीं है', 'सनातन धर्म और इस्लाम एक ही  है',  'कुरआन वेदों को निचोड़ कर लिखा गया है', 'भारत के मुसलमान सो गए तो भारत सो जाएगा', 'इस्लाम को पुरी दुनिया अगर स्वीकार करे तो इसमें कोई बुराई नहीं है'  'इस्लाम को बुरा कहने वाले सैतान है'  'इस्लाम की रक्षा के लिए शंकराचार्य अपनी जान दे देंगे'. शंकराचार्यांचे हे 'प्रवचन'  ऐकून जगात सगल्या जास्त आनंद जर कोणाला झाला असेल तर तो मलाच होय! कारण हे प्रवचन हिंदुत्ववाद्यांच्या डोळ्यात तिखट टाकणारे आहे. सुमारे ९.३० मिनिटांचा हा व्हिडिओ आपण बघितलाच पाहिजे.

भाषा: हिन्दी 





Friday, April 22, 2011

वैदिकांनी बळकावली जैन-बौद्ध मंदिरे

-महावीर सांगलीकर

मुस्लिमांनी अनेक हिन्दू मंदिरे पाडून त्याजागी मशीदी बांधल्या असा हिंदुत्ववाद्यांचा उर्फ वैदिकांचा एक लाडका सिद्धांत आहे. बाबरी मशिदीच्या जागी आधी राम मंदिर होते, व बाबराने ते पाडून तिथे बाबरी मशीद बांधली असेही हे लोक छातीठोक पणे सांगत असतात.

मुस्लिमांनी काय केले हे आपण थोड़ा वेळ बाजूला ठेवू. पण खुद्द वैदिकांनी भारतातील अनेक जैन व बौद्ध गुफा, लेणी, मंदिरे चक्क बळकावली व त्यांचे हिन्दूकरण केले या विषयाची चर्चा होणे फार गरजेचे आहे.

भारतात आपण कोणत्याही ठिकाणी उभे राहिलात आणि ५० किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये पाहिलेत, तर तुम्हाला सगळ्यात जूने अवशेष हे जैन किंवा बौद्धांचेच दिसतील. महाराष्ट्रातील बहुतेक सगळ्या किल्ल्यांवर बौद्ध लेणी दिसतात. खुद्द पुणे जिल्ह्यातच कार्ले, भाजे, जुन्नर, लेण्याद्री या ठिकाणी तुम्हाला प्राचीन बौद्ध लेणी दिसतील. याउलट हिंदूंची जी कांही 'जूनी' धार्मिक ठिकाणे आहेत, ती फार नंतरची आहेत, आणि तीही बौद्धान्च्या लेण्यात घूसखोरी करून बनवण्यात आली आहेत. याची कांही उदाहरणे म्हणजे खुद्द पुण्यातील पातालेश्वर लेणी, कार्ल्याची एकवीरा देवी आणि लेन्याद्रीचा गणपती ही आहेत. अगदी अशीच स्थिती महाराष्ट्रभर आणि देशभर आहे.

लेण्याद्री या बौद्ध लेण्यात आता गणपती घुसला आहे
फोटो : विकी

पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर मूळ जैन किंवा बौद्ध मंदिर असावे याचे अनेक पुरावे आहेत. इतकेच नव्हे तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे मंदिर हे मूळ पद्मावती देवीचे जैन मंदिर होते ही गोष्ट तुम्हाला कोणताही निष्पक्ष इतिहासकार सांगू शकेल. तुम्ही स्वत: कोल्हापूरला या मंदिरात गेलात आणि मंदिरातील शिल्पांचे बारकाईने निरीक्षण केलेत तर तुम्हालाही हे जैन मंदिर होते हे सहज समजू शकेल. तेथे असलेल्या जैन खाणा-खुणा बुजवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, ही गोष्ट हे जैन मंदिर होते असेच सिद्ध करते.

ओरीसातील खंडगिरी येथील एक जैन गुफा हिंदूंच्या ताब्यात आहे. तेथे पद्मावती देवीला दुर्गादेवी बनवण्यात आले आहे. photo: महावीर सांगलीकर

महाराष्ट्रातीलाच सातारा जिल्ह्यातील फलटन येथे जबरेश्वराचे मंदिर आहे. ते आधी जैन मंदिर होते हे तुम्ही स्वत: ओळखु शकता.

अशा कनव्हरटेड मंदिरांची संख्या शेकडोंनी आहे. आज हिन्दू मंदिरे म्हणून ओळखल्या जाणा-या कांही प्रसिद्द मंदिरांमध्ये जगन्नाथपुरी (ओरिसा, हे मूळ जैन मदिर होते व ते जैन धर्माचे यादवकुलीन तीर्थकर नेमिनाथ यांच्याशी संबधीत होते), तिरुपती बालाजी (आंध्रा प्रदेश, हे देखील मूळ जैन मदिर होते व ते तीर्थकर नेमिनाथ यांच्याशी संबधीत होते) व बद्रीनाथ (उत्तरांचल, हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर रु षभ यांचे मंदिर होते, आता ते शिव मंदिर आहे) ही मंदिरे आहेत.

बौद्ध गयेचे प्रसिद्द मंदिर बौद्धांचे असुनही आज देखील ब्राम्हणांच्या ताब्यात आहे व ते त्यावरील आपला ताबा सोडायला तयार नाहीत.

बाबरी मशीद येथे अगोदर राम मंदिर होते याचे पुरावे हिंदुत्ववादी देवू शकले नाहीत. भाजप सरकारने कोर्टात जे पुरावे दिले ते तेथे जैन मंदिर होते याचे दिले! पुढे तेथे पुरातत्व खात्याने उत्खनन केले, त्यांनाही तेथे जैन अवशेषच सापडले!

जैन व बौद्ध मंदिरांचे रूपान्तर हिन्दू मंदिरांत कसे झाले याच्या सुरस कथा आपल्याला शिवलीलामृत या पोथीत वाचायला मिळतील.

पांडव लेणी हा शब्द आपण ब-याचदा ऐकला-वाचला असेल. कांही पांडव लेणी आपण स्वत: बघितलीही असतील. ही पांडव लेणी पांडवांनी एका रात्रीत बनवली अशी एक भाकड कथा सांगितली जाते. त्या भाकडकथेचा अर्थ एवढाच की कोणीतरी एक रात्रीत त्या मूळच्या जैन/बौद्ध लेण्यात घुसखोरी करून ती आपल्या ताब्यात घेतली, आणि तिथे आपले देव बसवले.

हेही वाचा:

प्राचीन बहुजनांचा धर्म कोणता?
महावीर- गौतम बुद्ध आधी कोण होते?
वेद आणि वेदांत: वैदिकांची बनवेगिरी
वैदिक धर्म जिवंत आहे का?


Tuesday, April 12, 2011

आण्णांचा बालीशपणा

-महावीर सांगलीकर



आण्णा हजारे यांना गल्लीत फारसे यश मिळाले नाही पण दिल्लीत मात्र त्यांनी भलतेच यश पदरी पाडून घेतले. अगदी दुसरे गांधी वगैरे पदवीही मिळवली. आण्णांच्या या यशामागे ते स्वत: नसून अरविंद केजरीवाल, किरण बेदी आणि इतर अनेक दिग्गज तर आहेतच, पण राष्ट्रीय मेडीया आणि एकूणच भ्रष्ट वातावरण या गोष्टीही आहेत.

आण्णांच्या बोलण्या-वागण्यातून त्यांची वैचारिक परिपक्वता दिसत नाही. त्यामुळे ते भ्रष्टाचाराबद्दल बोलताना एखाद्या व्यक्तीस टार्गेट करताना दिसतात, पण त्याचवेळी धर्मांध, जातीवादी पक्षांच्या नेत्यांना स्टेजवर बोलावून जवळ बसवून घेतात. ज्या नरेंद्र मोदींची आण्णा हजारे यांनी स्तुती केली त्यांचे गुजरात राज्य भ्रष्टाचारापासून मुक्त नाही. शिवाय नरसंहार करणारा माणूस भ्रष्टाचारी माणसापेक्षा कधीही धोकादायक असतो हे आण्णा हजारे यांना कळत नाही.

आण्णा हजारे यांच्यावर हिंदुत्वाचा स्पष्ट पगडा दिसतो. त्यामुळेच ते भ्रष्ट आणि भोंदू हिंदू साधूंना देखील जवळ करतात.

आण्णा हजारे यांना जवळून ज्यांनी बघितले आहे त्यांना त्यांचा वैचारिक बालीशपणा चांगलाच माहित आहे.

भ्रष्टाचार हा भारतातील एकमेव आणि सर्वात मोठा प्रश्न नाही. मुळात सगळेच भारतीय कमी जास्त प्रमाणात भ्रष्ट मानसिकतेचे आहेत. खुद्द आण्णा हजारे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.

भ्रष्टाचार हा केवळ आर्थिकच असतो असा आण्णांचा समज आहे असे वाटते. त्यामुळे ते अंधश्रद्धा पसरवणारे भोंदू साधू, देव-धर्माच्या नावावर चालणारा भ्रष्टाचार, समाजातील जातीवाद, ब्राम्हणवाद, दलितांवरील अत्याचार, महिलांवरील अत्याचार याबद्दल कांहीच बोलत नाहीत. आण्णांना बडव्यांचा भ्रष्टाचार कसा काय दिसत नाही?

आण्णांच्या राळेगणसिद्धीत दलितांची काय परिस्थिती आहे? आण्णा त्यांना आपल्या आंदोलनात सहभागी करून घेतात का? महिला आरक्षणाबद्दल आण्णा का बोलत नाहीत?सरकारी पैसे देव आणि धर्म यांच्यावर उधळले जात आहेत त्याचे काय? ही सगळी भ्रष्ट आचाराचीच रूपे नाहीत काय?

आण्णा हजारे यांच्या बोलण्यात भगतसिंग, १९६५चे भारत-पाकिस्तान युद्ध यांचा उल्लेख परत-परत होत असतो. आण्णा भारतीय सैन्यात ड्रायव्हर होते व त्यावेळी झालेली छोटी जखम ते अधून मधून परत परत लोकांना अभिमानाने दाखवत असतात. शिवाय सध्या अनपेक्षितपणे मिळणारी प्रसिद्धी ते एन्जॉय करत आहेत असे दिसते. हा सगळा प्रकार आण्णांचा बालीशपणा दाखवतो.अरविंद केजरीवाल यांच्यासारख्या तरुण कार्यकर्त्याने आण्णांचा हा बालीशपणा त्यांना दाखवून द्यायला पाहिजे.


हेही पहा:

आण्णा का असली चेहरा (Hindi Vidio)


Wednesday, March 16, 2011

ब्राम्हणांनी आत्मपरीक्षण करावे!

-महावीर सांगलीकर


माझ्यावर कांही वाचकांनी ब्राम्हणद्वेषाचा आरोप केलाय. कांही लोकांना खरेच मी ब्राम्हणद्वेषी आहे असे वाटत असेल. पण ते खरे नाही. मी कोणत्याच समाजाचा द्वेष करत नाही, तसेच कोणत्याच समाजाविषयी मला खास असी आपुलकी नाही. मला ब्राम्हण समाजाविषयी राग असता, तर माझ्या मित्रमडळींमध्ये एकही ब्राम्हण दिसला नसता. पण प्रत्यक्षात अगदी लहानपणापासून आजपर्यंत माझे अनेक ब्राम्हण मित्र आहेत. त्यात काश्मिरी पंडीतांपासून तमिळ ब्राम्हणांपर्यंत आणि कोकणस्थ ब्राम्हणांपासून बंगाली ब्राम्हणांपर्यंत सगळ्या प्रकारचे ब्राम्हण आहेत.

माझ्या लेखांमध्ये जी टीका असते ती ब्राम्हण समाजावर नसून ब्राम्हणवादावर, ब्राम्हणी अहंगंडावर, इतरांना तुच्छ लेखण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीवर, त्यांच्या वर्चस्ववादावर असते. ती टीका जर कोणाला एखाद्या समाजाविरुद्धची टीका वाटत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे.

संत तुकाराम, कबीर, विवेकानंद, गाडगे महाराज. ओशो आणि इतर अनेक संतानी ब्राम्हणवादावर सडकून टीका केली आहे. महात्मा फुले, छ. शाहू महाराज, रामस्वामी पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांनी तर ब्राम्हणवादाच्या विरोधात लढण्यात आपले आयुष्य घालवले. या सगळ्यांचे काम आणि लिखाण यापुढे मी माझे लिखाण ’किरकोळ’ आहे. खरे म्हणजे माझ्या लिखाणाची दखल घेण्याचेही कारण नाही. तरीही ज्यांना माझे लिखाण आवडत नाही, त्यांनी वर दिलेल्या महात्म्यांचे साहित्य/ चरित्र वाचून आत्म्परीक्षण करावे.

येथे वाणगीदाखल प्रबोधनकार ठाकरे यांचे ब्राहणवादावरील कांही ’कोट्स’ देत आहे:

....भारत इतिहास संशोधक मंडळ नावाचे एक उपद्व्यापी मंडळ पुण्यास आहे. सगळ्या भारतखंडाचा इतिहास शोधून काढण्याच्या अहमहमिकेच्या काढण्या या मंडळातल्या उपद्व्यापांच्या मानेला लागल्या आहेत. पुण्याच्या चित्पावनी राष्ट्रीय रिवाजानुसार या मंडळालाही सार्वजनिकपणाचा मुलामा देण्याचे व जगातल्या सर्व अकलेचा कोठावळेपणा आपल्याकडे घेण्याची उत्पादकांनी व प्रवर्तकांनी पुष्कळच खटपट केली असल्यास त्यात फारसे नवल नाही....हे मंडळ सार्वजनिक म्हणवीत असले तरी त्यातले कार्यकारी व संशोधन म्हणजे एकजात एकरकमी एका पराचे ब्राह्मण. पुण्याची तर हीच मोठी विशेष आहे. येथील वाटेल ती संस्था किंवा चळवळ घ्या, तिचा गवगवा मात्र मोठ्या सार्वजनिकपणाचा. पण कारभारी पाहिले तर सगळे पेशवे सांप्रदायी ब्राह्मण ! उगाच नावाला एक दोन बावळट ब्राह्मणेतर असली की नाटक रंगले !....
(कोदण्डाचा टणत्कार)

हिंदवी स्वराज्याचा खून पाडण्यात दक्षिणी भिक्षुकशाहीच विशेषतः कारस्थानी ठरलेली आहे.
(कोदण्डाचा टणत्कार)

ब्राह्मण म्हणजे हिंदुधर्माचे डबोल्यावरचे भुजंग. अखिल हिंदुजनांच्या सामाजिक धार्मिक आचारविचारांचे सोल एजंट. किंवा वेदोक्ताच्या पंढरीतले बडवे.
(कोदण्डाचा टणत्कार)

निमकहरामपणाचे बीज  कोकणातून आले आहे आणि ते पेशव्यांच्या अमदानीत चित्पावनांनी आपल्या भोग्योदयार्थ जेव्हा कोकणातून घाटमाथ्यावर प्रयाण केले, त्यावेळीच ते त्यांनी बरोबर आणले, हे ऐतिहासिक सिद्ध तत्व कोणी कितीही मल्लीनाथ्या आणि व्युत्पत्त्या लढविल्या तरी खोडले जाणे शक्य नाही.
(कोदण्डाचा टणत्कार)

गेली २५-३० वर्षे भिक्षुकी वृत्तपत्रांनी हजारो गारगोट्या हिरे म्हणून लोकांच्या गळ्यात बांधल्या. देशभक्त, राष्ट्रसेवक देवर्षि, महर्षि, तपस्वी, वीर, पीर, समाजभूषण, शिक्षणालंकार इत्यादी नाना प्रकराचे शेंदूर माखून त्यांनी शेकडोदगडधोंडे देव म्हणून गावोगावच्या नाक्यानाक्यावर थापलेले आढळतात.
(सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्पपरिचय)

बोलून चालून भिक्षुकशाही हाच मुळी एक भयंकर गांधिलमाशांचा पोळा! मग त्यांच्या घोंगावण्याने जनतेची दिशाभूल का होणार नाही? आणि हि-यांच्या भावाने गारगोट्या का विकल्या जाणार नाहीत?
(सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्पपरिचय)

मी ब्राम्हण कां तर माझी आई आणि बाप हीं ब्राम्हण म्हणवितात किंवा ब्राम्हणाच्या सदराखाली मोडतात म्हणून मी ब्राम्हण जन्मसिद्ध ज्ञानी , जन्मसिद्ध श्रेष्ठ आणि जन्मसिद्ध पूज्य. मी कितीही महामूर्खं असलों, कितीहीं दुर्वर्तनी दुराचारी, भ्रष्ट , पतित , आहो फार काय पण खुद्द चांडाळालाहि लाज वाटेल अशी अनन्वित दुष्कृत्यें करण्यात निर्ढावलेला असलों तरी सुद्धा मी जन्मसिद्ध ब्राम्हण आहेया एकच आधारावर मी या लोकींचसा काय पण त्रैलोकींही वंद्यच आहे. (असा आजच्या ब्राम्हणांचा समज असतो)
(भिक्षुकशाहीचे बंड)

आत्मपरीक्षण करण्यासाठी गाईड म्हणुन आपल्याला माझे मित्र संजय सोणवणी यांची पुढील पुस्तके उपयोगी पडतील, ती आपण जरूर वाचावीत:
१. ब्राम्हण का झोडपले जातात
२. भारतीय ब्राम्हणांचे भवितव्य


Friday, March 11, 2011

सावरकरांच्या माफीनाम्याचे निर्लज्ज समर्थन

-महावीर सांगलीकर

वि.दा. सावरकर यांनी जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका होण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली. त्यानुसार इंग्रजांनी कांही अटींवर सावरकरांची सुटका केली. (बघा: सावरकरांचा माफीनामा ) सावरकरांचे अंधभक्त या माफीचे निर्लज्ज समर्थन करतात. इतकेच नव्हे तर सावरकरांची तुलना छ्त्रपती शिवाजी महाराजांशी करत म्हणतात की महाराजांनी देखील माफी मागितली होती. .

सावरकरांची तुलना महाराजांशी करणे म्हणजे एखाद्या लबाड लांडग्याची तुलना सिंहाशी करण्यासारखे आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी परिस्थिती बघून शत्रूशी तह केला, तेवढ्यापुरती माघार घेतली, पण कायमची माघार कधीही घेतली नाही. संधी मिळताच शत्रूवर पलटवार केला. याउलट सावरकरांनी दयेची भीक मागून सुटका करून घेतली आणि इंग्रजांना दिलेले वचन एखाद्या पतीव्रतेप्रमाणे शेवटर्यंत पाळले! सुटका झाल्यावर त्यांनी इंग्रजांच्या विरोधात कांहीही केले नाही. अशा सावरकरांची तुलना महाराजांशी करणे हा महाराजांचा धडधडीत अपमान आहे

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या विरोधात जागतीक पातळीवर सैन्य उभारले होते. त्यांना संपूर्ण भारतातून आणि भारताबाहेरील भारतीयांकडून मोठा पाठींबा मिळत गेला. जर्मनी, जपान आणि इतर अनेक देशांनी त्यांना मदत केली. मग का बरे सावरकरांनी त्यांच्या अनुयायांना आझाद हिंद सेनेत भरती होण्याचे आवाहन केले नाही? उलट त्यांनी भारतीय तरुणांना इंग्रजांच्या सैन्यात भरती होण्याचे आव्हान केले! हा सुभाषबाबुंच्या धाडसी कामाला शह देण्याचा प्रकार असावा अशी शंका येते.

अंदमानातील सुटकेनंतर सावरकरांची सारी जिंदगी गांधीविरोध आणि आंबेडकर विरोध यात गेली. आपल्या लिखाणातून मुस्लिमांविषयी लोकमत कलुषित करणे, गांधीजींच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करत रहाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या धर्मांतराच्या घोषणेची टर उडवत रहाणे, दलितोद्धाराची नाटके करत रहाणे हीच सावरकरांची सुटकेनंतरची कामे आहेत. इंग्रजांना देश सोडायला लावायचे आहे ही गोष्ट ते विसरूनच गेले होते. किंबहुना त्यांच्या हातून/तोंडून/लेखनीतून इंग्रजांना मदत होईल अशाच गोष्टी होत होत्या.

सावरकरांनी माफी मागितली ती इंग्रजांना दिलेली एक हूल होती असा प्रचार त्यांचे आंधळे भक्त करतात. पण असा प्रचार हा फक्त खोटारडेपणा आहे. 

इंग्रजांचे हित होईल  असे वागणारा,  इंग्रजांना दिलेले वचन शेवटपर्यंत पाळणारा माणूस स्वातंत्र्यवीर कसा काय असू शकतो? उलट त्याला प्र. के. अत्रे म्हणतात त्याप्रमाणे स्वातंत्र्यवैरी किंवा अनेक लेखक व वक्ते म्हणतात त्याप्रमाणे माफीवीर म्हणायला पाहिजेल! पण सावरकरांचे अंधभक्त त्यांना महान ठरवण्याचा उद्योग इमाने-इतबारे करत आहेत. करोत बापडे, पण खोटा इतिहास लिहिणे अंगलट येते हे अलिकडेच सगळ्यांना बघायला मिळाले आहे हे त्यांनी ध्येनात घेतले तर त्यांच्यासाठी ते बरे होईल!




हेही वाचा:
पर्वती झाली हिमालयाहून मोठी
सावरकरांचा माफीनामा
सावरकरांचे गोमांसभक्षण आणि सावरकरवाद्यांचे कर्तव्य
सावरकर भक्तांचा थयथयाट
सावरकरांचा ब्राम्हणवाद

महाविचार LATEST

Popular Posts This Week