सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
Showing posts with label काँग्रेस. Show all posts
Showing posts with label काँग्रेस. Show all posts

Thursday, January 17, 2013

बहुजनवाद्यांनी आत्मपरीक्षण करावे

-महावीर सांगलीकर 

भारत देश हा नेहमीच अल्पसंख्य समाजांकडून शाषित राहिला आहे. याला कारण अल्पसंख्य समाजाचे गुण हे तर आहेच, पण त्याचा बरोबर बहुजन समाजाचा नाकर्तेपणाही आहे.

इथे मी एक महत्वाचे निरीक्षण नोंदवत आहे. हे निरीक्षण आहे आज देशातील सर्वोच्च महत्वाची पदे ज्यांच्या ताब्यात आहेत ते लोक कोणत्या समाजाचे आहेत त्याचे. ही पदे म्हणजे राष्ट्रपती, उप-राष्ट्रपती, लोक सभेचे सभापती, प्रधानमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री, तीनही संरक्षण दलांचे प्रमुख, सहायक दलांचे प्रमुख, विविध हेर खात्यांचे प्रमुख, विविध आयोगाचे प्रमुख. त्या निरीक्षणात असे दिसते की या देशातील सर्वोच्च पदांवर शीख, ब्राम्हण, ख्रिस्ती आणि मुस्लिम या चार समाजातील लोकांचा भरणा मोठ्या प्रमाणावर आहे.

वर उल्लेख केलेल्या अतिमहत्वाच्या पदांवर एकूण २६ व्यक्ती आहेत. त्यात ब्राम्हण ९,  शीख ५, मुस्लिम ४, ख्रिस्ती ४, दलित २, कायस्थ १ आणि जैन १ अशी विभागणी आहे. या सव्वीस लोकांत रूढ अर्थाने ज्यांना हिंदू समजले जाते त्या कुणबी, ओ.बी.सी., क्षत्रिय या गटात  मोडल्या जाणा-या  जातींचा एकही प्रतिनिधी नाही. तसेच त्यांच्यात बौद्ध धर्मियांचा एकही प्रतिनिधी नाही. अति महत्वाच्या पदांवर २ दलित व्यक्ती दिसत असल्या तरी त्या बौद्ध नसणा-या आहेत.

दुय्यम महत्वाच्या आयोगांच्या प्रमुखांचीही येथे नोंद घेतली नाही. अर्थात ती घेतली तरी निष्कर्षांमध्ये कांहीच फरक पडत नाही.

केंद्रीय मंत्री मंडळात दुय्यम महत्वाच्या जागांवर बहुजनांचे प्रतिनिधी दिसतात, पण ती पदे दुय्यम असल्याने येथे विचारात घेतली नाहीत. 

एक विशेष निरीक्षण म्हणजे सर्वोच्च पदांवर जे ९ ब्राम्हण आहेत, त्यात एकही मराठी ब्राम्हण नाही. तसेच या ९ ब्राम्हण व्यक्तींमध्ये हिंदुत्ववादाचा लवलेश देखील नाही. ब्राम्हण वाचकांनी याची नोंद घ्यावी.

सर्वोच्च पदांवर एकही बहुजन असू नये, असे का, याचा बहुजनवाद्यांनी अवश्य विचार करावा. 

पुढे सर्वोच्च पदांवर कोण-कोण  आहेत त्याची यादी दिली आहे:

भारत २०१३
राष्ट्रपती: श्री प्रणव मुखर्जी: ब्राम्हण 
उप राष्ट्रपती: हमीद अन्सारी: मुस्लिम 
सर्वोच्च न्यायाधीश: अल्तमस कबीर: मुस्लिम
लोकसभा सभापती: मीरा कुमार: दलित 

पंतप्रधान: श्री मन मोहन सिंग : शीख
सत्तारूढ पक्षाच्या नेत्या: श्रीमती सोनिया गांधी: ख्रिस्ती
संरक्षण मंत्री : ए.के. अंथोनी : ख्रिस्ती
परराष्ट्र मंत्री: सलमान खुर्शीद: मुस्लिम
गृहमंत्री: सुशील कुमार शिंदे: दलित 
अर्थमंत्री: पी. चिदम्बरम: ब्राम्हण 

सेनाप्रमुख: बिक्रम सिंग: शीख
विमानदल प्रमुख: नॉर्मन ए.के. ब्राउन : ख्रिस्ती
नौदल प्रमुख: डी.के. जोशी: ब्राम्हण 
सीमा सुरक्षा दल प्रमुख: सुभाष जोशी: ब्राम्हण
इंडो-तिबेटन सीमा बल: अजय चढा: शीख
न्याशनल सिक्युरिटी गार्डस: अरविंद रंजन: कायस्थ 

रॉ प्रमुख: आलोक जोशी: ब्राम्हण
आय.बी.प्रमुख: आसिफ इब्राहिम: मुस्लिम
सी.बी.आय. प्रमुख: उमा शंकर मिश्र: ब्राम्हण

योजना आयोग अध्यक्ष: मन मोहन सिंग: शीख
योजना आयोग उपाध्यक्ष: मोन्टेक सिंग अहलुवालिया: शीख
विधी आयोग अध्यक्ष: डी.के.जैन: जैन
मुख्य निवडणूक आयुक्त: व्ही.एस.सम्पथ: ब्राम्हण
मानवाधिकार आयोग प्रमुख: के.जी.बालकृष्णन: ख्रिस्ती 
राष्ट्रीय महिला आयोग प्रमुख: ममता शर्मा: ब्राम्हण 
राष्ट्रीय मागासवर्ग आयोग प्रमुख: एम.एन.राव: ब्राम्हण 

हेही वाचा: 
मी बहुजनवादापासून दूर का झालो?
भित्यापाठी ब्रम्हराक्षस 
पंजाब मधील खत्री लोक........
मी ख्रिस्ती नाही, तरीही मी हे लिहित आहे.

Thursday, June 21, 2012

आर.एस.एस. आणि बामसेफ: एकाच नाण्याच्या दोन बाजू

-महावीर सांगलीकर

एकीकडे आर.एस.एस. सारख्या हिंदुत्ववादी संघटनांच्या नादी बहुजन समाजातील लाखो युवक मुस्लीम विरोधी झाले आहेत, तर दुसरीकडे त्याच समाजातील लाखो युवक बामसेफसारख्या एकांगी विचारसरणीच्या नादी लागून ब्राम्हण विरोधी झाले आहेत. हिंदुत्ववादी युवक मुस्लिमांचा प्रचंड द्वेष करतात, तसाच द्वेष बामसेफी युवक ब्राम्हणांचा करतात. पण आर.एस.एस. आणि बामसेफ या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून या संघटना आपला वापर करून घेत आहेत हे या युवकांच्या लक्षात येत नाही. तसे ते लक्षात येणे शक्यही नाही. कारण बहुतेक अनुयायांना आपले नेते काय सांगतात तेच खरे वाटते, या अनुयायांना डोके या नावाचा अवयव असला तरी ते त्याचा वापर करत नसतात. पण त्यांचे नेते आपल्या डोक्याचा उपयोग आपल्या बिनडोक अनुयायांचा वापर करून घेण्यासाठी करत असतात.

जर आपण बारकाईने निरीक्षण केले तर आर.एस.एस. आणि बामसेफ: एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे लगेच लक्षात येईल. या दोन्ही संघटनांच्या विचार सरणीत कमालीचे साम्य आहे. पुढील गोष्टी पहा:

आर.एस.एस. ही ब्राम्हणवादी संघटना आहे. त्यामुळे त्या संघटनेचा वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यावर विश्वास आहे. बामसेफ ही संघटना देखील तिच्या पद्धतीने वर्णव्यवस्था आणि जातीव्यवस्था यावर विश्वास ठेवते. एवढेच नाही, तर जातीव्यवस्था कशी भक्कम होईल यासाठी बामसेफ ही संघटना कसोशीने प्रयत्न करत आहे आणि त्यात तिला ब-यापैकी यशही मिळाले आहे. अलीकडच्या काळात भारतात प्रत्येक जातीत जातीयवाद वाढत गेला याचे श्रेय बामसेफ या संघटनेलाच जाते.

आर.एस.एस.ने महात्मा गांधी यांना सतत विरोध केला. याच कंपूने पुढे महात्मा गांधी यांचा खून घडवून आणला. आता बामसेफचे विकारवंत महात्मा गांधी यांचा खून आपल्या विचार सरणीतून पुन:पुन्हा करत आहेत.

आर.एस.एस. ही संघटना नेहमी काँग्रेस विरोधी राहिली आहे. बामसेफ देखील आर.एस.एस. प्रमाणेच काँग्रेस विरोधी संघटना आहे.

आर.एस.एस. या संघटनेचा नेहरू-गांधी या घराण्यावर प्रचंड राग आहे. या घराण्यावर तसाच राग बामसेफ या संघटनेचाही आहे.

ब्राम्हणवादानुसार कलियुगात केवळ ब्राम्हण आणि शूद्र हे दोनच वर्ण उरले आहेत. बामसेफमध्येदेखील याच तत्वज्ञानाचा प्रचार केला जातो. तेथे अनुयायांना ब्राम्हण सोडून सगळे शूद्र आहेत हे पुन:पुन्हा सांगितले जाते.

मला तर असे वाटते की बामसेफ ही आर.एस.एस.चेच आणखी एक विंग आहे. आपण जी कामे करू शकत नाही, ती करण्याची सुपारी आर.एस.एस.ने बामसेफ या संघटनेस दिली आहे. आर.एस.एस.ने बामसेफला महात्मा गांधी, काँग्रेस, गांधी- नेहरू घराणे याना बदनाम करण्याची, वर्ण व्यवस्था व जातीव्यवस्था भक्कम करण्याचीसुपारी दिली आहे. आर.एस.एस. ही संघटना स्वत: ही कामे आपल्या पद्धतीने करत आहेच, पण या संघटनेच्या अनुयायांना आपली पातळी सोडून शिवीगाळीच्या भाषेत बदनामी मोहीम राबवता येत नाही. बामसेफच्या नेत्यांना अनुयायांना शिवीगाळ करणे चांगलेच जमते, हा त्यांचा गुण आर.एस.एस. ला चांगलाच उपयोगी पडत आहे.

आता कोणी म्हणेल की मग बामसेफवाले ब्राम्हणांना कशा काय शिव्या देतात? तर ते केवळ दाखवायचे दात आहेत. बामसेफवाले ब्राम्हणांना शिव्या देत असले, त्याना विदेशी ठरवत असले, त्यांना भारतातून हाकलून काढण्याची भाषा करत असले तरी तरी त्यामुळे ब्राम्हणांना कांही फरक पडत नाही. उलट त्यात ब्राम्हणांचा फायदाच झाला आहे, कारण बामसेफमुळे ब्राम्हण कधी नव्हे इतके संघटीत झाले आहेत.

बामसेफचे वाचाळ लोक आपल्या भाषणातून ब्राम्हणांना भारतातून हाकलण्याच्या बाता करतात, पण या संघटनेच्या कोणत्याच बातम्या सहसा वर्तमानपत्रे वा न्यूज चानेल्सवर येत नाहीत. या संघटनेला ब्राम्हणांना खरोखरच घाबरवयाचे असते तर या वाचालांनी आपली मते सार्वजनिक केली असती. तसेच त्यांना खरोखरच ब्राम्हणांना अडचणीत आणायचे असते, तर अनेक कायदेशीर मार्ग वापरून त्यांना ते करता आले असते. पण ते तसे करत नाहीत. फक्त त्यांच्या अनुयायांना ब्राम्हणांच्या विरोधात भडकावणे एवढाच त्यांचा उद्देश आहे. दुसरीकडे आर.एस.एस.ने देखील या संघटनेवर बंदी घालण्याची कधीच मागणी केली नाही हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे.

बामसेफ ही आर.एस.एस. प्रमाणेच केवळ बौद्धिके घेणारी संघटना आहे, हाही मुद्दा विचारात घेतला पाहिजे.

हेही वाचा:
बामसेफने दलितांच्या धर्मांतराविषयी आपली भूमिका स्पष्ट करावी
हिंदू धर्माला विरोधासाठी विरोध करणे चुकीचे


Sunday, June 12, 2011

अपयशी भारतीय जनता पक्ष

-महावीर सांगलीकर


आपल्या  येथे उठसूठ  सत्ताधारी पक्षाला शिव्या घालणे हा अनेकांचा छंद असतो. अशा लोकांना विरोधी पक्षाची बाजू लावून धरण्याची खोड असते. पण जेव्हा विरोधी पक्ष आपले काम नीट करत नाहीत तेव्हाही या छांदिष्ट लोकांना विरोधी पक्षाचाच पुळका येत असतो याचे आश्चर्य वाटते.  

सध्या रामदेव बाबा आणि आण्णा हझारे यांच्या आंदोलनांच्या निमित्ताने झोपी गेलेला भा.ज.पा. हा पक्ष किंचित जागा झालेला आहे. या पक्षाचे संसदेत 115  खासदार आहेत. पण हे खासदार नेमके काय करत असतात हा संशोधनाचा विषय आहे. 

संसदीय लोकशाहीत सत्ताधारी पक्ष वात चुकू नये  म्हणून विरोधी पक्षाने संसदेत सत्ताधारी पक्षावर वचक ठेवायचा असतो. शिवाय संसदेबाहेरही सरकारच्या चुकीच्या धोरणांवर जन जागृती करायची असते. पण भारतीय जनता पक्ष या बाबतीत अपयशी ठरला आहे. त्यामुळेच विरोधी पक्षाचे काम आण्णा-बाबांना करावे लागत आहे! 

भारतीय जनता पक्ष विरोधी पक्ष म्हणूनही नीट काम करू शकत नाही, मग त्याने सत्ताधारी बनण्याचे स्वप्न बघणे हा एक मूर्खपणाच आहे! 

पुढील निवडणुकीत भारतीय जनता पक्षाची अवस्था कम्युनिष्ट पक्षा सारखीच होणार यात संशय नाही! काँग्रेस पक्ष भा.ज.प.ची अवस्था रामदेव बाबा सारखीच करून टाकेल.



महाविचार LATEST

Popular Posts This Week