सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
Showing posts with label हिंदुत्ववाद. Show all posts
Showing posts with label हिंदुत्ववाद. Show all posts

Thursday, October 4, 2012

गांधी विरोधकांची मानसिकता

-महावीर सांगलीकर 

आपल्या मनातील राग, द्वेष, तिरस्कार इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी माणसाला एखाद्या जिवंत अथवा मयत व्यक्तीची गरज असते. जिवंत व्यक्तिमध्ये आई, बाप, बायको, नवरा, मुलगा, भाऊ, बहिण, मित्र वगैरे ही गरज पूर्ण करतात. त्यानंतर नंबर येतो तो राजकारण्यांचा.  कुठल्या तरी राजकीय पक्षाला 'देशाचा' शत्रू मानून त्या पक्षाच्या एखाद्या किंवा सगळ्या नेत्यांना शिव्या देत बसणे हा अनेकांचा आवडता उद्योग असतो. पण हा उद्योग आजूबाजूला त्या पक्षाचे कोणी नाही हे पाहूनच केला जातो. सार्वजनिक ठिकाणी तर फारच जपून बोलले जाते. त्या पक्षाचा गल्ली-बोळातला एखादा किरकोळ कार्यकर्ता जरी तिकडे आला तर हे लोक त्याला अगदी लवून नमस्कार करतात.

राग व्यक्त करण्यासाठी मयत व्यक्तींमध्ये आपल्या येथे सगळ्यात जास्त लोकांकडून महात्मा गांधी यांना निवडले गेले आहे. यामागे या लोकांची भेकड मानसिकता हेच कारण आहे. भेकडांचे हिरो शस्त्रधारी क्रांतीकारक असतात. भेकडांना हिंसेचे टोकाचे आकर्षण असते, ते त्या क्रांतीकारकांच्या तत्वज्ञानामुळे नव्हे, तर त्यांच्याकडील शस्त्रांमुळे आलेले असते. (तसे नसते तर भगतसिंगाचे भक्त कम्युनिस्ट आणि नास्तिक विचारसरणीचे झाले असते, सुभाष बाबूंचे भक्त हिंदू-मुस्लीम एकतेचे समर्थक झाले असते आणि सावरकरभक्त विज्ञानवादी आणि गोमांस खाण्याचे समर्थन करणारे झाले असते). मयत क्रांतीकारकांकडील शस्त्रेदेखील भेकडांच्या सुप्त मनातून खुणवत असतात. याउलट गांधी हे निशस्त्र. त्यांच्याकडून कसली आली आहे भीती? त्यांचे जिवंत अनुयायीही मवाळ धोरण असणारे. तोड-फोड, नास-धूस, हिंसा असल्या गोष्टींपासून दूर रहाणारे. त्यामुळे त्यांचीही भीती बाळगण्याचे कांहीच कारण नाही. त्यामुळे कुणाला तरी शिव्या घालण्याची आपली गरज पूर्ण करण्यासाठी गांधी ही सगळ्यात बिनधोक व्यक्ती आहे. शिवाय एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण शिव्या देवू शकतो याचे त्यांना मिळणारे समाधान कांही औरच.

गांधी विरोधकांच्या पथ्यावर पडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे गांधीजींची जात. गांधीजी जर मराठा, रजपुत, जाट, पटेल, अशा एखाद्या मोठ्या जातीत जन्माला आले असते तर या विरोधकांची पंचाईतच झाली असती.

गांधीजींच्या  बेताल विरोधकांचे शारीरिक आणि मानसिक वय तुम्ही स्वत: तपासून पाहू शकता. ते नेहमी कमीच असते. तरुण वयात हिंसेचे जबरदस्त आकर्षण असते. या वयात मानसिक परिपक्वता आलेली नसते. जस जसे वय वाढते, तस तसे हिंसेचे आकर्षण कमी होत जाते. त्यांचे हिरोही बदलतात, किंवा हिरोंची गरज संपते. अनेकांना गांधी कळायला लागतो, कळला नाही तरी ते गांधी विरोध सोडून देतात. पण तोपर्यंत व्हायचे ते नुकसान झालेलेच असते.

सध्या गांधी विरोधक असणारे सगळ्यात मोठे समूह म्हणजे हिंदुत्ववादी आणि आंबेडकरवादी. त्यात अलीकडे संभाजी ब्रिगेडवाल्यांची भर पडली आहे. पण या तिन्ही समूहातील विचारी आणि परिपक्व लोक गांधीजींची निंदा-नालस्ती करत नाहीत ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.

Thursday, July 14, 2011

अजमल कसाबची फाशी

 -महावीर सांगलीकर

पाकिस्तानी अतिरेकी अजमल  कसाब याला भारत सरकार उगीचच पोसत आहे, तो सरकारचा जावई आहे, त्याला गोळ्या घालायला पाहिजेत असा विचार अनेकजन बोलून दाखवत असतात. असे बोलणा-यांमध्ये  देशभक्तीचा ठेका घेतलेले महान मध्यमवर्गीय आघाडीवर असतात. पण या लोकाना ही साधी गोष्ट कळत नाही की एखाद्या गुन्हेगारास फासावर चढवण्यापूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. कसाबची फाशी सुप्रीम कोर्टाकडून पक्की झाल्याशिवाय ही प्रक्रिया पूर्ण होवू शकत नाही.

जर कसाबला जागीच गोळ्या घातल्या असत्या तर त्याचे करवते धनी कोण आहेत हे कळणे अवघड होवून बसले असते. कसाब जिवंत राहिल्यामुळे सरकारला पाकिस्तानाच्या हाताचे अनेक पुरावे मिळू शकले. कसाबच्या सुरक्षेसाठी कोठ्यावधी रुपये खर्च झाले म्हणून जे ओरड करतात त्यांच्या हे लक्षात येत नाही, की हा खर्च कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी झाला आहे.

आपल्या येथील कायदेशीर प्रक्रियेत दिरंगाई होत असते. पण त्याला इलाज नाही, कारण जशी जनता तशी त्यांना सिस्टीम मिळते. बहुतांश भारतीय हे आळशी, भ्रष्ट आणि प्रत्येक गोष्टीचा वरवर विचार करणारे किंवा अजिबात विचार न करणारे आहेत. आपले सरकार, पुढारी, पोलीस, प्रशासन हे आपल्याच रक्ताच्या लोकांचे आहे.  प्रत्येकाने आत्मपरीक्षण करावे की आपण आपली स्वत:ची कामे किती वेळेवर करतो. 


भारतात जो दहशतवाद आहे तो हिंदुत्ववाद्यांनी बाबरी मशीद पाडल्यापासून सुरू झाला आहे. ही हिंदुत्ववाद्यांच्या कर्माचीच फळे आहेत. पण ती आपल्या सर्वांना भोगायला लागत आहेत.

ज्या लोकांना सध्याचे सरकार मूर्ख वाटते त्यांनी भा.ज.प.च्या राज्यात संसदेवर हल्ला झाला त्यावेळी त्या सरकारने काय दिवे लावले हे आठवून पहावे. 

खरे म्हणजे ज्यांच्या राज्यात संसदेवर हल्ला होतो, ज्या सरकारचा खुद्द परराष्ट्र  मंत्री तुरुंगातील अतिरेक्याना अफगाणीस्थानात सोडून येतो, ज्या सरकारच्या काळात पाकिस्तानी सैनिक अतिरेकी बनून काश्मिरातील अनेक टेकड्या काबीज करते आणि त्यावेळी त्या सरकारचे महान प्रधान मंत्री नेहमीप्रमाणे झोपलेले असतात,त्याच्याएवढे नालायक सरकार भारतात आज पर्यंत झाले नाही. पण हिंदुत्ववाद्यांना तेच सरकार महान वाटत असते. 


आपला तो बाळया... दुसरे काय?

Wednesday, March 9, 2011

सावरकरांचा ब्राम्हणवाद

-महावीर सांगलीकर


वि.दा सावरकर यांना कट्टर हिंदु्त्ववादी म्हणून ओळखण्यात येते. इतकेच नव्हे तर हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद या शब्दाचे निर्माते सावरकार हेच होते. ते हिंदुहृदयसम्राट (पहिले) होते ही गोष्ट अनेकांना माहीत नाही, कारण त्यांचे अनुयायी या गोष्टीचा फारसा उल्लेख करत नाहीत.

 असे असले तरी सावरकर हे हिंदुत्ववादी नसून ब्राम्हणवादी होते हे त्यांचे साहित्य आणि कार्य वाचले की दिसून येते.

 हिंदुत्ववाद हा ब्राम्हणवाद लपवण्याचा बुरखा आहे हे विचारी लोकांना माहीतच आहे.कारण हिंदू म्हणवून घेतले तर ब्राम्हण वेगळे पडत नाहीत, बहुजनांवर ब्राम्हणवाद लादू शकतात आणि त्यांच्यावर सांस्कृतिक राज्यही करू शकतात. आपल्या लिखाणात सावरकरांनी सनातन उर्फ वैदिक उर्फ ब्राम्हणी धर्माचा, चाणक्य, पुष्यमित्र शृंग, बाजीराव पेशवे या व इतर ’महान’ ब्राम्हणांचा आणि वैदिक साहित्य आणि संस्कृत भाषा या ब्राम्हणी प्रतिकांचा उदो-उदो केला असल्याचा दिसतो.

बौद्ध धर्म आणि ब्राम्हण यांच्यात प्राचीन काळापासून मोठा संघर्ष राहिला आहे. सावरकर हे कट्टर वैदिक ब्राम्हण असल्याने त्यांच्या लिखाणात वैदिकविरोधी आणि ब्राम्हणविरोधी असलेल्या बौद्ध धर्मावर व तो स्वीकारणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर कडक आणि जहरी टीका केलेली दिसते. या गोष्टी सावरकर हे हिंदुत्ववादाच्या आडून ब्राम्हणवाद जोपासणारे लेखक होते हे दाखवून देतात.

 सावरकरांचा हा ब्राम्हणवाद फक्त लिखाणापुरता मर्यादित नव्हता. एखादा माणूस किती जातीयवादी आहे हे त्याच्या खास लोकांमध्ये, सहकार्‍यांमध्ये त्याच्या जातीचे लोक किती प्रमाणात आहेत यावरून सहज कळून येते. सावरकरांचे बहुतेक सगळे खास लोक आणि सहकारी चित्पावन ब्राम्हण या जातीचे होते. यावरूनही सावरकर हे ब्राम्हणवादी होते हे दिसून येते. येथे हे सांगणे गरजेचे आहे की महात्मा फुले, राजर्षि शाहू महाराज, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, नेताजी सुभाष चंद्र बोस, कर्मवीर भाऊराव पाटील या व इतर खरोखरच्या महान लोकांच्या सहकार्‍यांमध्ये त्यांच्या-त्यांच्या जातीचे लोक क्वचितच दिसतात.

 ब्राम्हणवादाचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे ब्राम्हणवादी लोक बहुजनांच्या महापुरुषांना आपल्या बोलण्यातून आणि लिखाणातून अनुल्लेखाने टाळतात. उल्लेख केलाच तर तो त्यांच्यावर टीका करण्यासाठी करण्यासाठीच असतो. सावरकरांनी आपल्या लिखाणातून आणि भाषणांतून हेच केले आहे. यावरून सावरकर हे पक्के ब्राम्हणवादी होते हेच दिसून येते.

त्यामुळेच ते  आजच्या ब्राम्हणवाद्यांचे  हिरो ठरले आहेत.



हेही वाचा:
सावरकरांचा माफीनामा
पर्वती झाली हिमालयाहून मोठी
सावरकर भक्तांचा थयथयाट
सावरकरांचे गोमांसभक्षण आणि सावरकरवाद्यांचे कर्तव्य 

Monday, February 7, 2011

गांधीजी जर फाळणीला जबाबदार असतील तर.....| Gandhi and Partition of India

-महावीर सांगलीकर

अनेक हिंदुत्ववाद्यांचा असा समज आहे की गांधीजी हे भारताच्या फाळणीला जबाबदार होते. हे खरे असेल तर हिंदुत्ववाद्यांनी गांधीजींचे अनेकदा आभार मानले पाहिजेत. इतकेच न्हवे तर त्यांना तेहतीस कोटी एकवा देव मानून त्यांची रोज सकाळ - संध्याकाळ पूजा करायला पाहिजे. कारण भारताची फाळणी करून गांधीजींनी हिंदुत्ववाद्यांवर मोठेच उपकार केले आहेत! कसे ते पहा:

आज भारतात मुस्लिमांची संख्या सुमारे १२ टक्के आहे. हिंदुत्वावाद्यांना त्यांचे अस्तित्व सहन होत नाही. समजा भारताची फाळणी झाली नसती तर भारत, पाकिस्तान, बांगला देश हे एकत्र असते. म्हणजे 'अखंड' भारत असता तर तेथे मुस्लिमांची संख्या किमान ४० टक्के असती. आज १२ टक्के लोकांचा बाऊ करणार्यांची त्यावेळी काय अवस्था झाली असती याची कल्पना त्यांनीच करावी.

अखंड भारतात मुस्लिमांना सर्वच गोष्टीत किमान ४० टक्के वाटा द्यावा लागला असता. केवळ फाळणी झाल्यामुळेच भारतात हिंदूंना राजकारण, सत्ता, प्रसासन, सरकारी व खाजगी नोकर्‍या, उद्योगधंदे, मिडीया आणि इतर सगळ्याच ठिकाणी किमान ९० टक्के वाटा आहे. त्यापैकी बहुतेक वाटा हिंदुत्ववाद्यांचे पुढारपण करणार्‍या जातींकडे जातो. अखंड भारतात त्यांना देवळातील घंटाच मिळाली असती. शिवाय अखंड भारतात मुस्लीम धर्माचा प्रचार  फार जोरात झाला असता व हा देश मुस्लीम देश बनण्याकडे वेगात चालाला असता. 

अखंड भारतात दलित आणि मुस्लिमांची एकूण टक्केवारी ६० हुन जास्त झाली असती. त्यामुळे हिंदुत्ववाद्यांना दलितांचे अधिकार हिरवून घेणे, त्यांच्यावर अत्याचार करणे शक्यच झाले नसते.

तेंव्हा आज हिंदुत्ववाद्यांना जे काही अधिकार मिळत आहेत ते फाळणीमुळे मिळत आहेत. फाळणी जर गांधीजींनी केली असेल तर हिंदुत्ववाद्यांनी त्यांचे आभार मानायलाच पाहिजेत. पण तसे करण्या ऐवजी हे लोक गांधीजींना सतत शिव्या घालण्याचा उद्योग करत आहेत. ही कृतघ्नता नव्हे काय?

महाविचार LATEST

Popular Posts This Week