सत्य-असत्याशी मन केले ग्वाही, देखियले नाही बहुमता -संत तुकाराम
Showing posts with label Marathi Blogs. Show all posts
Showing posts with label Marathi Blogs. Show all posts

Wednesday, March 16, 2011

ब्राम्हणांनी आत्मपरीक्षण करावे!

-महावीर सांगलीकर


माझ्यावर कांही वाचकांनी ब्राम्हणद्वेषाचा आरोप केलाय. कांही लोकांना खरेच मी ब्राम्हणद्वेषी आहे असे वाटत असेल. पण ते खरे नाही. मी कोणत्याच समाजाचा द्वेष करत नाही, तसेच कोणत्याच समाजाविषयी मला खास असी आपुलकी नाही. मला ब्राम्हण समाजाविषयी राग असता, तर माझ्या मित्रमडळींमध्ये एकही ब्राम्हण दिसला नसता. पण प्रत्यक्षात अगदी लहानपणापासून आजपर्यंत माझे अनेक ब्राम्हण मित्र आहेत. त्यात काश्मिरी पंडीतांपासून तमिळ ब्राम्हणांपर्यंत आणि कोकणस्थ ब्राम्हणांपासून बंगाली ब्राम्हणांपर्यंत सगळ्या प्रकारचे ब्राम्हण आहेत.

माझ्या लेखांमध्ये जी टीका असते ती ब्राम्हण समाजावर नसून ब्राम्हणवादावर, ब्राम्हणी अहंगंडावर, इतरांना तुच्छ लेखण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीवर, त्यांच्या वर्चस्ववादावर असते. ती टीका जर कोणाला एखाद्या समाजाविरुद्धची टीका वाटत असेल तर त्याला माझा नाईलाज आहे.

संत तुकाराम, कबीर, विवेकानंद, गाडगे महाराज. ओशो आणि इतर अनेक संतानी ब्राम्हणवादावर सडकून टीका केली आहे. महात्मा फुले, छ. शाहू महाराज, रामस्वामी पेरियार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांनी तर ब्राम्हणवादाच्या विरोधात लढण्यात आपले आयुष्य घालवले. या सगळ्यांचे काम आणि लिखाण यापुढे मी माझे लिखाण ’किरकोळ’ आहे. खरे म्हणजे माझ्या लिखाणाची दखल घेण्याचेही कारण नाही. तरीही ज्यांना माझे लिखाण आवडत नाही, त्यांनी वर दिलेल्या महात्म्यांचे साहित्य/ चरित्र वाचून आत्म्परीक्षण करावे.

येथे वाणगीदाखल प्रबोधनकार ठाकरे यांचे ब्राहणवादावरील कांही ’कोट्स’ देत आहे:

....भारत इतिहास संशोधक मंडळ नावाचे एक उपद्व्यापी मंडळ पुण्यास आहे. सगळ्या भारतखंडाचा इतिहास शोधून काढण्याच्या अहमहमिकेच्या काढण्या या मंडळातल्या उपद्व्यापांच्या मानेला लागल्या आहेत. पुण्याच्या चित्पावनी राष्ट्रीय रिवाजानुसार या मंडळालाही सार्वजनिकपणाचा मुलामा देण्याचे व जगातल्या सर्व अकलेचा कोठावळेपणा आपल्याकडे घेण्याची उत्पादकांनी व प्रवर्तकांनी पुष्कळच खटपट केली असल्यास त्यात फारसे नवल नाही....हे मंडळ सार्वजनिक म्हणवीत असले तरी त्यातले कार्यकारी व संशोधन म्हणजे एकजात एकरकमी एका पराचे ब्राह्मण. पुण्याची तर हीच मोठी विशेष आहे. येथील वाटेल ती संस्था किंवा चळवळ घ्या, तिचा गवगवा मात्र मोठ्या सार्वजनिकपणाचा. पण कारभारी पाहिले तर सगळे पेशवे सांप्रदायी ब्राह्मण ! उगाच नावाला एक दोन बावळट ब्राह्मणेतर असली की नाटक रंगले !....
(कोदण्डाचा टणत्कार)

हिंदवी स्वराज्याचा खून पाडण्यात दक्षिणी भिक्षुकशाहीच विशेषतः कारस्थानी ठरलेली आहे.
(कोदण्डाचा टणत्कार)

ब्राह्मण म्हणजे हिंदुधर्माचे डबोल्यावरचे भुजंग. अखिल हिंदुजनांच्या सामाजिक धार्मिक आचारविचारांचे सोल एजंट. किंवा वेदोक्ताच्या पंढरीतले बडवे.
(कोदण्डाचा टणत्कार)

निमकहरामपणाचे बीज  कोकणातून आले आहे आणि ते पेशव्यांच्या अमदानीत चित्पावनांनी आपल्या भोग्योदयार्थ जेव्हा कोकणातून घाटमाथ्यावर प्रयाण केले, त्यावेळीच ते त्यांनी बरोबर आणले, हे ऐतिहासिक सिद्ध तत्व कोणी कितीही मल्लीनाथ्या आणि व्युत्पत्त्या लढविल्या तरी खोडले जाणे शक्य नाही.
(कोदण्डाचा टणत्कार)

गेली २५-३० वर्षे भिक्षुकी वृत्तपत्रांनी हजारो गारगोट्या हिरे म्हणून लोकांच्या गळ्यात बांधल्या. देशभक्त, राष्ट्रसेवक देवर्षि, महर्षि, तपस्वी, वीर, पीर, समाजभूषण, शिक्षणालंकार इत्यादी नाना प्रकराचे शेंदूर माखून त्यांनी शेकडोदगडधोंडे देव म्हणून गावोगावच्या नाक्यानाक्यावर थापलेले आढळतात.
(सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्पपरिचय)

बोलून चालून भिक्षुकशाही हाच मुळी एक भयंकर गांधिलमाशांचा पोळा! मग त्यांच्या घोंगावण्याने जनतेची दिशाभूल का होणार नाही? आणि हि-यांच्या भावाने गारगोट्या का विकल्या जाणार नाहीत?
(सत्यशोधक भाऊराव पाटील यांचा अल्पपरिचय)

मी ब्राम्हण कां तर माझी आई आणि बाप हीं ब्राम्हण म्हणवितात किंवा ब्राम्हणाच्या सदराखाली मोडतात म्हणून मी ब्राम्हण जन्मसिद्ध ज्ञानी , जन्मसिद्ध श्रेष्ठ आणि जन्मसिद्ध पूज्य. मी कितीही महामूर्खं असलों, कितीहीं दुर्वर्तनी दुराचारी, भ्रष्ट , पतित , आहो फार काय पण खुद्द चांडाळालाहि लाज वाटेल अशी अनन्वित दुष्कृत्यें करण्यात निर्ढावलेला असलों तरी सुद्धा मी जन्मसिद्ध ब्राम्हण आहेया एकच आधारावर मी या लोकींचसा काय पण त्रैलोकींही वंद्यच आहे. (असा आजच्या ब्राम्हणांचा समज असतो)
(भिक्षुकशाहीचे बंड)

आत्मपरीक्षण करण्यासाठी गाईड म्हणुन आपल्याला माझे मित्र संजय सोणवणी यांची पुढील पुस्तके उपयोगी पडतील, ती आपण जरूर वाचावीत:
१. ब्राम्हण का झोडपले जातात
२. भारतीय ब्राम्हणांचे भवितव्य


Friday, March 11, 2011

सावरकरांच्या माफीनाम्याचे निर्लज्ज समर्थन

-महावीर सांगलीकर

वि.दा. सावरकर यांनी जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका होण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली. त्यानुसार इंग्रजांनी कांही अटींवर सावरकरांची सुटका केली. (बघा: सावरकरांचा माफीनामा ) सावरकरांचे अंधभक्त या माफीचे निर्लज्ज समर्थन करतात. इतकेच नव्हे तर सावरकरांची तुलना छ्त्रपती शिवाजी महाराजांशी करत म्हणतात की महाराजांनी देखील माफी मागितली होती. .

सावरकरांची तुलना महाराजांशी करणे म्हणजे एखाद्या लबाड लांडग्याची तुलना सिंहाशी करण्यासारखे आहे. छ्त्रपती शिवाजी महाराजांनी परिस्थिती बघून शत्रूशी तह केला, तेवढ्यापुरती माघार घेतली, पण कायमची माघार कधीही घेतली नाही. संधी मिळताच शत्रूवर पलटवार केला. याउलट सावरकरांनी दयेची भीक मागून सुटका करून घेतली आणि इंग्रजांना दिलेले वचन एखाद्या पतीव्रतेप्रमाणे शेवटर्यंत पाळले! सुटका झाल्यावर त्यांनी इंग्रजांच्या विरोधात कांहीही केले नाही. अशा सावरकरांची तुलना महाराजांशी करणे हा महाराजांचा धडधडीत अपमान आहे

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात सुभाषबाबूंनी इंग्रजांच्या विरोधात जागतीक पातळीवर सैन्य उभारले होते. त्यांना संपूर्ण भारतातून आणि भारताबाहेरील भारतीयांकडून मोठा पाठींबा मिळत गेला. जर्मनी, जपान आणि इतर अनेक देशांनी त्यांना मदत केली. मग का बरे सावरकरांनी त्यांच्या अनुयायांना आझाद हिंद सेनेत भरती होण्याचे आवाहन केले नाही? उलट त्यांनी भारतीय तरुणांना इंग्रजांच्या सैन्यात भरती होण्याचे आव्हान केले! हा सुभाषबाबुंच्या धाडसी कामाला शह देण्याचा प्रकार असावा अशी शंका येते.

अंदमानातील सुटकेनंतर सावरकरांची सारी जिंदगी गांधीविरोध आणि आंबेडकर विरोध यात गेली. आपल्या लिखाणातून मुस्लिमांविषयी लोकमत कलुषित करणे, गांधीजींच्या प्रत्येक गोष्टीला विरोध करत रहाणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांच्या धर्मांतराच्या घोषणेची टर उडवत रहाणे, दलितोद्धाराची नाटके करत रहाणे हीच सावरकरांची सुटकेनंतरची कामे आहेत. इंग्रजांना देश सोडायला लावायचे आहे ही गोष्ट ते विसरूनच गेले होते. किंबहुना त्यांच्या हातून/तोंडून/लेखनीतून इंग्रजांना मदत होईल अशाच गोष्टी होत होत्या.

सावरकरांनी माफी मागितली ती इंग्रजांना दिलेली एक हूल होती असा प्रचार त्यांचे आंधळे भक्त करतात. पण असा प्रचार हा फक्त खोटारडेपणा आहे. 

इंग्रजांचे हित होईल  असे वागणारा,  इंग्रजांना दिलेले वचन शेवटपर्यंत पाळणारा माणूस स्वातंत्र्यवीर कसा काय असू शकतो? उलट त्याला प्र. के. अत्रे म्हणतात त्याप्रमाणे स्वातंत्र्यवैरी किंवा अनेक लेखक व वक्ते म्हणतात त्याप्रमाणे माफीवीर म्हणायला पाहिजेल! पण सावरकरांचे अंधभक्त त्यांना महान ठरवण्याचा उद्योग इमाने-इतबारे करत आहेत. करोत बापडे, पण खोटा इतिहास लिहिणे अंगलट येते हे अलिकडेच सगळ्यांना बघायला मिळाले आहे हे त्यांनी ध्येनात घेतले तर त्यांच्यासाठी ते बरे होईल!




हेही वाचा:
पर्वती झाली हिमालयाहून मोठी
सावरकरांचा माफीनामा
सावरकरांचे गोमांसभक्षण आणि सावरकरवाद्यांचे कर्तव्य
सावरकर भक्तांचा थयथयाट
सावरकरांचा ब्राम्हणवाद

Sunday, March 6, 2011

सावरकर भक्तांचा थयथयाट


-महावीर सांगलीकर


माझे वि.दा. सावरकर यांच्यावरील तीन लेख या ब्लॉगवर प्रकाशित झाले आहेत. पहिला लेख प्रकाशित झाल्यापासून सावरकरांचे अंध भक्त माझ्यावर चवताळले आहेत व अगदी खालच्या पातळीवर जावून कॉमेंट्स देत आहेत. त्यांची संस्कृती खरेच किती उच्च आहे हे दाखवून देत आहेत. असो.

गंमत म्हणजे त्यातील कांही टिनपाट लोक, ज्यांना त्यांची जात आणि वर्ण यांच्याबाहेरचे जगच माहीत नाही, ते मला शहाणपण शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्यावर ते सावरकरद्वेष पसरवत असल्याचा आरोप करत आहेत. या म्हणजे चोरांच्या उलट्या बोंबा झाल्या. ज्या सावरकराने आपल्या लिखाणाद्वारे मुस्लिमद्वेष, बहुजनद्वेष, बौद्धद्वेष, आंबेडकर द्वेष, जैनद्वेष पसरवण्याचा उद्योग आयुष्यभर केला, आणि ज्याचे अनुयायी आताही तोच उद्योग करत आहेत, ते मला सावरकर द्वेषी म्हणतात. त्यांनी हे लक्षात ठेवावे की मला त्या लेखकाचा द्वेष वगैरे कांही नाही. मी फक्त तो किती छोटा आणि कोत्या मनोवृत्तीचा माणूस होता हे दाखवून देत आहे.

सावरकरांचे अंध भक्त डोळस कधीच होणार नाहीत हे मला माहीत आहे. त्यामुळे अंध भक्तांनी हे लेख वाचू नयेत, कारण त्यांच्या टीकेने मी कांही हे लिखाण बंद करणार नाही, आणि माझ्या लेखाने त्यांचेही मत कांही बदलणार नाही आहे. मुळात माझे हे लेख त्यांच्यासाठी नाहीच आहेत. हे लेख लिहिण्यामागे माझा उद्देश बहुजन तरूणांना सावरकराचे खरे स्वरुप दाखवून देणे हा आहे.ज्या माणसाने आपल्या लिखाणातून छ. शिवाजी महाराजांच्या कार्याची योग्य दखल घेतली नाही, ज्याला  बाजीराव-रघुनाथराव पेशवे छ. शिवाजी महाराजांपेक्षा मोठे वाटतात, ज्याने कांही ठिकाणी महाराजांचा धडधडीत अपमान केला आहे, त्या माणसाचे खरे स्वरूप बाहेर यायलाच पाहिजेल.

प्र.के. उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांनी वि.दा. सावरकर यांना स्वातंत्र्यवीर नव्हे स्वातंत्र्यवैरी असे म्हंटले होते. त्यांनी सावरकरांची टर उडवणारा अग्रलेख लिहिला होता. तसेच सावरकर युद्धास निघाले असा विडंबनात्मक संवादही लिहिला होता. त्यावर मी संदर्भासहित लेख लवकरच देत आहे. बघू या हे अंध भक्त मला जसे 'सूर्यावर थुंकणारा' 'मूर्ख' 'बुद्धीची कीव करावीशी वाटते'  असे म्हणतात, तसेच प्र.के.अत्रे यांच्याबद्दल म्हणतात का! पण नाहीच म्हणणार, कारण....तुम्हाला माहीत आहेच.

सावरकारांच्या बद्दल खुद्द पुण्यातील ब्राम्हण लोक त्याकाळी ’भलते सलते’ बोलत असत. काय बोलत असत हे पुढे लिहीनच. अंध सावरकर भक्तांनी हिम्मत असेल तर  त्या पुणेकर ब्राम्हणांना  मूर्ख म्हणावे. ते होत नसेल तर आपली सावरकर भक्ती ही जातीप्रेमातून आली आहे हे लक्षात घ्यावे.


हेही वाचा:
सावरकरांचा माफीनामा
पर्वती झाली हिमालयाहून मोठी
सावरकरांचे गोमांसभक्षण आणि सावरकरवाद्यांचे कर्तव्य

Saturday, March 5, 2011

सावरकरांचा माफीनामा


-महावीर सांगलीकर


भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळावे म्हणून हजारो लोकांनी ब्रिटीशांच्या गोळ्या खावून देशासाठी आपला जीव दिला. हजारो तरूण फासावर चढले. या फासावर चढणार्‍या वा जन्मठेप भोगणार्‍या तरूणांनी इंग्रजांची माफी मागितली असती तर तर त्यांची फासी /जन्मठेप टळली असती. पण तसे कोणी केल्याचे  ऐकिवात नाही. अपवाद फक्त एकच - वि.दा. सावरकर हे लेखक. त्यांनी आपल्या लेखकीय भाषेत इंग्रजांकडे दयेची भीक मागीतली. त्यांच्या त्या ऐतिहासिक माफीनाम्याचा मुख्य भाग वाचा त्यांच्याच शब्दात:

"मी घराबाहेर पडून घडलेला उधळ्या खर्चिक मुलगा आहे. मायबाप ब्रिटिश सरकारच्या पंखाखाली सुरक्षित रहाण्यासाठी माझी अंदमानच्या तुरंगातून सुटका करावी. मी १९११ मध्येही दयेचा अर्ज केला होता. त्याचाही सहानभुतीपूर्वक विचार करून दयाळू आणि परोपकारी असणार्‍या ब्रिटिश सरकारने माझी सुटक केली तर इंग्रज सरकारच्या घटनात्मक प्रगतीचा मी जन्मभर पुरस्कर्ता  राहीन. जोपर्यंत आम्ही (नागरीकच) तुरुंगात आहोत तोपर्यंत इंग्लंडच्या राजेसाहेबांच्या भारतातील रयतेच्या लाखो घरकुलीत आनंद आणि समाधान कसे लाभेल? कारण ते आणि आम्ही एकाच रक्ताचे आहोत. पण आमची सुटका झाली तर सारी रयत हर्षाने आरोळ्या ठोकील आणि शिक्षा सूडबुद्धी न ठेवता माफी आणि पुनर्वसनावर भर देणार्‍या सरकारचा जयजयकार करील."


"एकदा मी स्वत:च सरकारच्या बाजूने झालो की मला गुरूस्थानी मानून रक्तरंजित क्रांतीचे स्वप्न बघणारे भारतातील व परदेशातील हजारो तरुण पुन्हा ब्रिटिश सरकारच्या बाजूने येतील."


"माझी भविष्यातील वागणूक सरकारला अनुकूल राहील. इंग्रज सरकारला ज्या पद्धतीने माझ्याकडून सेवा करून घ्याविशी वाटेल त्या पद्ध्तीने  काम करण्यास मी तयार आहे. मला तुरुंगात ठेवून सरकारला काय मिळेल? यापेक्षा मला सोडाल तर त्याहीपेक्षा जास्त फायदा सरकारचा होईल. माझ्यासारखा वाट चुकलेला पुत्र आपल्या पितारुपी ब्रिटीश सरकारच्याच दरबारात नाही येणार तर कुठे जाणार?"


१४ नोव्हेंबर १९१३


सावरकरांचा हा माफीनामा भारत सरकारच्या अर्काईव्हज मध्ये सुरक्षित असून तो सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे प्रकाशितही करण्यात आला आहे. सावरकरांनी असे एकूण सहा माफीनामे लिहिले होते! असा माणूस स्वातंत्र्यवीर कसा काय असू शकतो? त्यापेक्षा त्याला माफीवीर ही पदवीच शोभून दिसते!

संदर्भ:
माफीवीर सावरकर: लेखक श्रीकांत शेट्ये, जिजाई प्रकाशन पुणे
उंडो सावरकर: लेखक श्रीकांत शेट्ये, मूळनिवासी पब्लिकेशन ट्रस्ट, पुणे
मुंबई चौफेर, ५ मे २००२
http://www.hinduonnet.com/fline/fl2207/stories/20050408001903700.htm


हेही वाचा:
पर्वती झाली हिमालयाहून मोठी
सावरकरांचे गोमांसभक्षण आणि सावरकरवाद्यांचे कर्तव्य
सावरकर भक्तांचा थयथयाट

महाविचार LATEST

Popular Posts This Week